बांगलादेश निवडणुकांपूर्वी हसीना यांचा युनूस यांच्यावर हल्लाबोल

0
हसीना

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना, शुक्रवारी नवी दिल्लीतून रेकॉर्ड केलेले त्यांचे राजकीय भाषण प्रसारित करण्यासाठी, राजधानीतील एका प्रमुख मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची परवानगी भारताने दिली. याद्वारे नवी दिल्ली ढाका प्रशासनाला कोणता संदेश देऊ पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हसीना यांचे रेकॉर्ड केलेले ऑडिओ भाषण, अवामी लीगचे नेते आणि समर्थकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘फॉरेन कॉरस्पॉन्डेंट्स क्लब ऑफ साउथ एशिया’ (FCC) येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांसमोर ऐकवण्यात आले.

ऑगस्ट 2024 मध्ये, हिंसक निदर्शनांनंतर बांगलादेश सोडल्यापासून भारतातील आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना उद्देशून केलेले हे त्यांचे पहिलेच भाषण होते.

बांगलादेशातील 2024 च्या राजकीय उलथापालथीबाबत, अमेरिकेवर नवे आरोप करणारे एक राजनैतिक रेकॉर्डिंग लीक झाल्यानंतर, अवघ्या एका दिवसाने हा कार्यक्रम झाला. दरम्यान, हे आरोप अवामी लीगशी संबंधित व्यक्तींनी केले आहेत.

हसीना यांच्या अवामी लीगला, 12 फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुका लढवण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.

हसिना यांनी यापूर्वीही भारतातून बांगलादेशातील समर्थकांसमोर आपले विचार मांडले होते, ज्यावर ढाका येथील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाने निषेध नोंदवला होता. या प्रशासनाने हसीना यांच्या अनुपस्थितीत त्यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली आहे.

शुक्रवारच्या भाषणात, हसिना यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर जोरदार हल्ला चढवला, त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि बांगलादेशी जनतेला त्यांनी “बेकायदेशीर, परकीयांची सेवा करणारे कटपुतली सरकार” असे संबोधले, तसेच या राजवटीविरुद्ध एकत्र येण्याचे जनतेला आवाहन केले.

“ज्या दिवसापासून मला बळजबरीने हटवण्यात आले, त्या दिवसापासून देश दहशतीच्या युगात ढकलला गेला आहे, लोकशाही आता वनवासात आहे,” असे त्या म्हणाल्या.

त्यांचे वक्यव्य एखाद्या माध्यम संवादापेक्षा, निवडणूक प्रचारातील भाषणासारखे होते. त्यांनी अंतरिम प्रशासनावर कायदाहीनता माजवणे, विरोध दडपणे आणि बांगलादेशच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केल्याचे आरोप केले. एका टप्प्यावर त्यांनी, “बांगलादेशची जमीन आणि संसाधने परदेशी हितसंबंधांना विकण्याचा हा एक विश्वासघातकी कट आहे,” असा इशाराही दिला.

मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या अधिकाराला थेट आव्हान देताना हसीना म्हणाल्या की, “युनूस जनतेच्या मतांनी सत्तेवर आलेले नाहीत, तर त्यांनी बळजबरीने सत्ता काबीज केली. मग त्यांना वैधता कोणी दिली?”

या भाषणाचे ठिकाण आणि वेळ याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. ‘एफएफसी’ (FCC), ही जरी सरकारी संस्था नसली तरी, राजनैतिक आणि राजकीय संदेशवहनासाठी वारंवार वापरले जाणारे एक हाय-प्रोफाइल व्यासपीठ आहे.

एका पदच्युत नेत्याने रेकॉर्ड केलेले राजकीय भाषण, त्यांच्या देशातील राष्ट्रीय निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी तिथे ऐकवण्याची परवानगी देणे, यावरून नवी दिल्ली बांगलादेशातील सध्याच्या व्यवस्थेबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आहे का, अशा अर्थाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हसीना यांनी बांगलादेशच्या 1971 च्या मुक्ती संग्रामातील नवी दिल्लीच्या भूमिकेचे स्मरण करून देत, भारतातून बोलण्याच्या प्रतीकात्मकतेवर भर दिला. त्या म्हणाल्या की, “आमच्या सर्वात कठीण काळात भारत बांगलादेशच्या पाठीशी उभा राहिला आहे.” त्यांनी यावेळी लोकशाही शक्तींना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

हसीना यांनी संयुक्त राष्ट्रांनाही हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. पदावरून हटवणे आणि त्यानंतर झालेल्या अशांततेचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “केवळ नवीन आणि खऱ्या अर्थाने निष्पक्ष तपासच काय घडले याचे सत्य उघड करू शकतो.”

या भाषणात त्यांनी पाच मागण्या मांडल्या, ज्यामध्ये युनूस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला हटवणे, रस्त्यावरील हिंसाचार थांबवणे, महिला आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देणे, पत्रकार आणि विरोधी नेत्यांवरील राजकीय हेतूने प्रेरित कायदेशीर कारवाई थांबवणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली नवीन चौकशी करणे यांचा समावेश आहे.

यावेळी दिल्लीत अवामी लीगशी संबंधित अनेक वरिष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या, ज्यात ह्युमन राईट्स वॉचचे सरचिटणीस इंजिनिअर मोहम्मद ए. सिद्दीकी आणि शिक्षण मंत्री मोहिबुल हसन चौधरी नौफेल यांचा समावेश होता. माजी खासदार प्रा. डॉ. हबीबे मिलात, माजी खासदार आणि माहिती व प्रसारण मंत्री मोहम्मद अली अराफत, माजी परराष्ट्र मंत्री डॉ. ए.के. अब्दुल मोमेन आणि प्रा. डॉ. एस.एम. मासूम बिल्ला या माजी मंत्र्यांनी आणि पक्षनेत्यांनी व्हर्च्युअली पत्रकारांना संबोधित केले.

भारतीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही.

दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम नेतृत्वाने हसिना यांच्यावर परदेशातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे आणि निवडणुका ठरल्यानुसारच पार पडतील असे ठामपणे सांगितले आहे.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleउत्तर कोरियाविरोधात ‘अधिक मर्यादित’ भूमिका घेतली जाईल; पेंटागॉनचा अंदाज
Next articleUS Defence Strategy Shifts Burden to Allies, as Pentagon Focuses on Deterring China in Indo-Pacific

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here