भारतीय नौदलाने 22 मार्च रोजी, गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे प्रोजेक्ट 1135.6 अतिरिक्त फॉलो-ऑन जहाजांपैकी, दुसरी युद्धनौका ‘तवस्य’ चे लाँचिंग केले. या निमित्ताने भारतीय नौदलाने एक महत्वपूर्ण टप्पा गाठला असून, स्वदेशी बनावटीचे हे जहाज संरक्षण उत्पादनातील भारताच्या आत्मनिर्भरतेची वचनबद्धता अधोरेखित करते.
‘तवस्य’ हे नाव महाभारतातील महान योद्धा भीमाच्या गदेवरून ठेवण्यात आले आहे, जे भारतीय नौदलाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. भारतीय नौदलाने, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंह यांच्या उपस्थितीत हा लाँचिंग सोहळा पार पाडला.
समारंभात मंत्र्यांनी, ‘तवस्य’ युद्धनौकेचे महत्व अधोरेखित करत सांगितले की, “भारताच्या नौदल इतिहासातील हा एक निर्णायक क्षण आहे, जो आपल्या तांत्रिक क्षमता आणि स्वावलंबनातील अढळ वचनबद्धतेचे प्रदर्शन करतो.” भारताच्या वाढत्या जहाजबांधणी क्षमतेचा पुरावा म्हणून त्यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, टॉर्पेडो लाँचर्स, सोनार प्रणाली आणि सहाय्यक नियंत्रण प्रणालींसह महत्त्वाच्या घटकांचे यशस्वी स्थानिकीकरण करण्यावर भर दिला.
25 जानेवारी 2019 रोजी, संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात, दोन 1135.6 फॉलो-ऑन जहाजांच्या निर्मितीचा करार झाला. या प्रकल्पातील पहिले जहाज ‘ट्रिपुट’ (Triput), 23 जुलै 2024 रोजी लाँच करण्यात आले. दोन्ही जहाजे पृष्ठभागावर, जमिनीखाली आणि हवाई लढाईतील ऑपरेशन्ससाठी डिझाइन केली आहेत, ज्यात स्टिल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्र प्रणाली आणि अत्याधुनिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली सामाविष्ट आहेत.
124.8 मीटर लांबी, 15/2 मीटर रुंदी आणि 4.5 मीटर ड्राफ्टसह, ‘ट्रिपुट’ आणि ‘तवस्य’ ही दोन्ही जहाजे, अंदाजे 3,600 टन विस्थापित करतात आणि 28 नॉट्सचा कमाल वेग गाठू शकतात. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही जहाजांमधील उपकरणे, शस्त्रे आणि सेन्सर्सचा मोठा भाग स्वदेशी बनावटीचा आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेला बळकटी मिळते आणि देशातील रोजगार तसेच क्षमता वाढीस हातभार लागतो.
‘तवस्य’ चे लाँचिंग भारताच्या धोरणात्मक संरक्षण महत्त्वाकांक्षेतील आणखी एक पाऊल आहे, जे देशाच्या सागरी पराक्रमाला आणि स्वदेशी जहाजबांधणीद्वारे नौदल दलांना बळकट करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते.
टीम भारतशक्ती