इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत 492 जणांचा मृत्यू, दशकातील सर्वात भीषण दिवस

0
हवाई
23 सप्टेंबर, 2024 रोजी दक्षिण लेबनॉनमधील टायर येथील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे उध्वस्त झालेल्या इमारतींमधून धूर निघताना दिसत आहे. (अझीझ ताहेर/रॉयटर्स)

इस्रायलने सोमवारी हिजबुल्लाच्या शेकडो ठिकाणांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले केले. यात किमान 492 लोक ठार झाले असून हजारो लोक सुरक्षित स्थळी पळून गेले आहेत. लेबनॉनच्या आतापर्यंतच्या इतिहासात कालचा दिवस हा दशकातील सर्वात भीषण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल हमास युद्ध भडकल्यानंतर सीमेपलीकडून हमासच्या समर्थनार्थ हिजबुल्लाकडून अनेकदा मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या भागात हिजबुल्ला शस्त्रे साठवत असल्याचे म्हटले जाते, ते भाग रिकामे करण्याचा इशारा इस्रायलने लेबनॉनमधील लोकांना दिला होता.

या संकटाच्या वेळी जीवनावश्यक गोष्टींसाठी समन्वय करणारे लेबनॉनचे मंत्री नासीर यासीन यांनी रॉयटर्सला सांगितले की, या हल्ल्यांनंतर 89 तात्पुरते निवारे सुरू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 26 हजारांहून अधिक नागरिक राहण्याची क्षमता आहे.  ‘इस्रायली अत्याचार’ पासून लेबनॉनचे नागरिक दूर पळून जात आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनच्या नागरिकांना उद्देशून एक लहान व्हिडिओ निवेदन जारी केले आहे. त्यात ते “इस्रायलचे युद्ध तुमच्याशी नाही तर हिजबुल्लाहशी आहे. खूप काळापासून हिजबुल्ला तुमचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे,” असे ते म्हणताना दिसत आहेत.

आपल्या दक्षिणेच्या सीमेवरील गाझामध्ये हमासविरुद्ध जवळपास वर्षभर चाललेल्या युद्धानंतर, इस्रायलने आता आपले लक्ष उत्तरेकडील सीमेवर केंद्रित केले आहे. इथे इराण समर्थित हिजबुल्ला हमासला पाठिंबा देत इस्रायलवर रॉकेटहल्ले करत आहे. ज्याला इराणचाही पाठिंबा आहे.

इस्रायलच्या सैन्याने सांगितले की त्यांनी लेबनॉनच्या दक्षिण, पूर्व आणि उत्तरेकडील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ला केला.

या हल्ल्यात 24 मुले आणि 42 महिलांसह किमान 492 लोक मारले गेले असून 1हजार 645 जण जखमी झाल्याचे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. लेबनॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 1975 ते 1990 या काळातील यादवी युद्धामुळे लेबनॉनमध्ये होणाऱ्या दैनंदिन मृत्युंनंतर कालच्या एका दिवसात ठार झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी सांगितले की जवळजवळ वर्षभर चाललेल्या संघर्षातील हा एक “महत्त्वपूर्ण टप्पा” आहे.

“या दिवशी आम्ही दहा हजार क्षेपणास्त्रे आणि अचूक शस्त्रास्त्रांच्या मदतीने मारा केला. दुसऱ्या लेबनॉन युद्धानंतर गेल्या  20 वर्षांच्या काळात हिजबुल्लाने जे काही उभारले आहे ते आयडीएफद्वारे उध्वस्त केले जात आहे,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

इस्रायली हवाई दलाने एक्सवर सांगितले की त्यांनी गेल्या 24 तासांत हल्ल्याच्या सुमारे 650 मोहिमा राबवल्या आहेत, 1हजार 400हून अधिक शस्त्रास्त्रांचा वापर करून 1हजार 100हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केला आहे, इमारती, वाहने आणि  जिथे शस्त्रे साठवली गेली होती त्या त्या ठिकाणी हल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी हवाईहल्ले होण्याची शक्यता

इस्रायलने सोमवारी संध्याकाळी बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर हल्ला केला, ज्याचा उद्देश दक्षिणेकडील आघाडीचा प्रमुख, हिजबुल्लाचा वरिष्ठ नेता अली काराकी याला लक्ष्य करणे हा होता. मात्र तो या हल्ल्यात मारला गेला की निसटला हे अद्याप अस्पष्ट असल्याचे सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले.

त्याआधी, गॅलंट म्हणाले की “उत्तरेकडील रहिवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत आणण्याचे आमचे ध्येय आम्ही साध्य करेपर्यंत” ही मोहीम सुरू राहील. हिज्बुल्लाहने आपल्या बाजूने गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत लढा चालूच ठेवण्याचे वचन दिले आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यातील हिजबुल्लाहशी संबंधित सुमारे 800 ठिकाणांवर हल्ला केला. हल्ल्याच्या लक्ष्यांमध्ये अशा इमारती होत्या जिथे हिजबुल्लाहने रॉकेट, क्षेपणास्त्रे, प्रक्षेपक, यूएव्ही आणि अतिरिक्त दहशतवादासाठी आवश्यक पायाभूत सुविधा लपवल्या होत्या, असे निवेदनात म्हटले आहे.

घरांमध्ये शस्त्रे लपवल्याच्या इस्रायली दाव्यावर हिजबुल्लाने कोणतेही भाष्य केलेले नाही, परंतु नागरी वस्तीजवळ दहशतवादासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आपण ठेवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, हिजबुल्लाने सांगितले की त्याने उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर डझनभर क्षेपणास्त्रे डागली आहेत.

लष्कराने सांगितले की, हिजबुल्लाच्या रॉकेट हल्ल्याचा इशारा देणारे सायरन हायफा बंदर शहरासह संपूर्ण उत्तर इस्रायलमध्ये आणि वेस्ट बँकच्या उत्तरेकडील भागात वाजले होते.

इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की इस्रायली विमाने बेका खोऱ्यातील घरांमध्ये लपवून ठेवलेल्या हिजबुल्लाच्या महत्त्वाच्या शस्त्रसाठ्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते आणि म्हणूनच त्यांनी नागरिकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले.

रिअर ॲंडमिरल डॅनियल हागारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आता दक्षिण लेबनॉनमधील ही दृश्ये हिजबुल्लाहच्या दुय्यम शस्त्रांच्या स्फोटांची आहेत, जी घरांमध्ये लपवून ठेवली होती आणि तिथेच त्यांचे स्फोट होत आहेत.”

‘आम्ही ज्या ज्या घरांवर हल्ला करत होतो, तिथे तिथे आम्हाला शस्त्रे सापडली. रॉकेट, क्षेपणास्त्रे, मानवरहित हवाई वाहने ही सगळी इस्रायली नागरिकांना ठार मारण्याच्या उद्देशाने तिथे ठेवण्यात आली होती.

हवाई हल्ल्यांमुळे हिजबुल्लाहवरील दबाव वाढला

या हवाई हल्ल्यांमुळे हिजबुल्लाहवरील दबाव आणखी वाढला आहे. हिजबुल्लाहचे सदस्य  वापरत असलेल्या हजारो पेजर आणि वॉकी-टॉकीजचा मागच्याच आठवड्यात स्फोट झाल्याने आधीच त्याचे भारी नुकसान झाले आहे. या मागे इस्रायलचा हात असल्याचे सांगत त्याला मोठ्या प्रमाणावर दोषी मानण्यात आले. इस्रायलने मात्र या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी आरोपांचे खंडणही केलेले नाही.

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन न्यूयॉर्कमध्ये बोलताना म्हणाले की, इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षात सामील होण्यासाठी इराणला चिथावणी देऊन इस्रायलला संपूर्ण मध्य पूर्व भागाला युद्धात ओढायचे आहे.

“हा संपूर्ण संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यामागे इस्रायल आहे,” असे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर पत्रकारांना सांगितले. अशा अस्थिरतेचे परिणाम थांबवता येणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

बैरूतच्या दक्षिणेकडील उपनगरावर शुक्रवारी करण्यात आलेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात गटाच्या वरिष्ठ कमांडरांवर हल्ला करण्यात आला, ज्यात 45 लोक ठार झाले. हा हिजबुल्लाहसाठी मोठा धक्का होता असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

या हल्ल्यांमुळे अमेरिका हा इस्रायलचा जवळचा सहकारी, आणि इराण हा मोठा शत्रू या व्यापक युद्धात सहभागी होतील अशी भीती आता निर्माण झाली आहे.

रामानंद सेनगुप्ता

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleडझनभर ‘इस्रायली एजंट्स’ना इराणमध्ये अटक, संभाषण साधनांवरही बंदी
Next articleटांझानियातील निदर्शनांसाठी विरोधी पक्ष नेते, पत्रकारांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here