Thursday, March 5, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi EU व्यापार वाटाघाटींना गती देण्यासाठी, भारताला जर्मनीचा पाठिंबा

EU व्यापार वाटाघाटींना गती देण्यासाठी, भारताला जर्मनीचा पाठिंबा

0

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी सांगितले की, “भारत युरोपियन युनियन (EU) सोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आणि व्यापार चर्चांना गती देण्यासाठी, जर्मनीच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्याचवेळी, त्यांनी बर्लिनसोबतचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे आवाहनही केले.

जयशंकर यांनी, त्यांचे जर्मन समकक्ष जोहान वेडफुल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. जोहान हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही मंत्र्यांनी यावेळी संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचे आवाहन केले.

“युरोपियन युनियनसोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींना गती देण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थनावर अवलंबून आहोत,” असे जयशंकर यांनी जोहान यांच्याशी चर्चा सुरू करण्यापूर्वी सांगितले.

व्यापार वाटाघाटी

भारत आणि युरोपियन युनियन, यांच्यातील व्यापार वाटाघाटी 8 वर्षांच्या स्थगितीनंतर 2021 मध्ये पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यात अनेक अडचणी येत आहेत. युरोपियन युनियनला कार आणि दुग्धजन्य पदार्थांवरील आयात कर कमी करायचा आहे, तर भारतीय वस्तूंवर असंतुलित हवामान आणि कामगार नियमांची अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे. याउलट, भारताला स्थानिक शेतकऱ्यांचे संरक्षण करायचे आहे, कठोर पर्यावरण नियमांमधून सुटका हवी आहे आणि कायदेशीर विवादांवर आपले नियंत्रण ठेवायचे आहे.

बुधवारी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताला पुढील काही दिवसांत मुक्त व्यापार कराराचा “निर्णायक निष्कर्ष” काढायचा आहे, तर जर्मन मंत्र्यांनी हा करार पुढील काही महिन्यांत पूर्ण होऊ शकतो, असे म्हटले.

वेडफुल म्हणाले, “जर इतर कोणी व्यापारी अडथळे निर्माण करत असतील, तर आपण ते कमी करून त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.”

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी सांगितले होते की, व्यापार अधिकारी ब्रुसेल्समध्ये चर्चा करत आहेत.

जोहान यांचा हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेने भारताच्या वस्तूंवरील शुल्क दुप्पट केले आहे. जुलैमध्ये जाहीर झालेल्या 25% शुल्काव्यतिरिक्त, अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त 25% शुल्क लावले आहे. वॉशिंग्टनच्या मते, या खरेदीमुळे मॉस्कोच्या युक्रेनमधील युद्धाला आर्थिक मदत मिळत आहे.

भारताने अमेरिका आणि युरोपियन युनियन दोघांवरही जोरदार टीका केली आहे. दोन्ही देश युक्रेनमधील युद्ध सुरू असूनही मॉस्कोसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करत असताना, रशियन तेल खरेदीवरून भारताला ‘एकटे पाडले जात आहे’, असे भारताचे म्हणणे आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारतावरील ‘दुय्यम निर्बंधांचा’ ट्रम्प यांच्याकडून पुनरुच्चार
Next articleट्रम्प यांनी शुल्क आकारणीसाठी, सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन मागितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here