पाकिस्तानचे सर्वोच्च नेते आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ) चे अध्यक्ष मौलाना फजलुर रेहमान यांनी पाकिस्तानची तुलना भारताशी करताना म्हटले आहे की, भारत आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, तर आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? असा सवाल मौलाना यांनी उपस्थित केला. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या अधिवेशनाला मौलाना फझलुर रेहमान संबोधित करत होते.
मौलाना म्हणाले की, “पडद्यामागून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुर्दशेसाठी जबाबदार आहेत, ज्यांनी लोकांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना कठपुतळ्या बनवले आहे”. ‘भिंतींआडून आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या या शक्ती आहेत. ते निर्णय घेतात, तर आपण फक्त कठपुतळी बनतो.” पाकिस्तानी संसदेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मौलाना फजलुर रहमान म्हणाले की, “खासदारांनी तत्त्वे सोडून दिली आहेत आणि ते लोकशाही विकण्यात गुंतलेले आहेत”. संसद खरोखरच जनतेचा जनादेश प्रतिबिंबित करते का? राजवाडे आणि नोकरशहांद्वारे देशाचा पंतप्रधान कोण असेल हे ठरवले जाते.
“आणखी किती काळ आपत तडजोड करत राहणार आहोत? खासदार म्हणून निवडून येण्यासाठी आपण किती काळ बाह्य शक्तींची मदत मागत राहणार आहोत?” असा सवाल मौलाना फजलुर रेहमान यांनी उपस्थित केला. 2018 आणि 2024 या दोन्ही निवडणुकांमधील घोटाळ्याचा त्यांनी निषेध केला. खासदार स्वतंत्रपणे कायदे करण्यास असमर्थत असल्याबद्दल रेहमान यांनी खंत व्यक्त केली. “निवडणूकीत हरलेले आणि जिंकलेले दोघेही समाधानी नसल्याने या सभागृहात बसताना आपला अंतरात्मा शुद्ध कसा असू शकतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. मौलाना म्हणाले,”आम्ही आपल्या देशाला स्थैर्याचा बळी बनवले आहे. असे देश प्रगती करू शकत नाहीत.”
मौलाना फझलुर रेहमान यांनी लोकशाही हक्कांचे महत्त्व सांगून पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला (पीटीआय) जाहीर सभा घेण्यास परवानगी देण्याचे समर्थन केले. पीटीआयने 2 मे आणि 9 मे रोजी कराची आणि पेशावरमध्ये ‘मिलियन मार्च’चे ( आयोजन करण्याची घोषणा केली. मौलाना म्हणाले की “निदर्शनांमध्ये व्यत्यय आणले गेले तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.” रहमान म्हणाले, “लोकांचा मोठ्या प्रमाणात अपेक्षित असणारा सहभाग थांबवता येत नाही आणि जे असे प्रयत्न करतील त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.”
त्याआधी रविवारी लाहोर येथे आसमा जहांगीर परिषदेला संबोधित करताना देशाचे माजी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी पाकिस्तानच्या आर्थिक अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मागण्याचा सरकारचा निर्णय हा आपण अपयशी ठरलो याचाच पुरावा आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र नकारात्मक आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. “आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (आयएमएफ) झालेल्या करारांमुळे देशाचा आर्थिक विकास थांबतो आणि महागाई वाढते. जरी आयएमएफ तुम्हाला जिवंत ठेवण्यास मदत करत असले, तरी प्रत्येक उपायाने तुमची आर्थिक स्थिती खालावत जाते,” अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला.
त्याबरोबरच बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगलचे (बीएनपी-एम) प्रमुख अख्तर मेंगल यांनी सरकारला कानपिचक्या देताना म्हटले की, पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ किंवा लोकशाही दोन्ही अस्तित्वात नाही. ते म्हणाले की ही हिरव्या झेंड्यामागे लपलेली हुकूमशाही आहे. सर्व राजकीय पक्षांचा आता राष्ट्रवादी अजेंडा असून पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पंजाबी राष्ट्रवादाला पाठिंबा देत आहे आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधचे प्रतिनिधित्व करत आहे.
आराधना जोशी
(एएनआय आणि रॉयटर्स यांच्या इनपुट्सह)