संरक्षण विषयक संयुक्त कार्यकारी गटाच्या बैठकीत चर्चा
दि. १७ मे: द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबत सुरु असलेले विद्यमान प्रकल्प सुरु ठेवण्याबरोबरच, हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत भारत आणि मंगोलियात एकमत झाले. भारत आणि मंगोलियादरम्यान संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कार्यकारी गटाची १२ वी बैठक मंगोलियातील उलनबतार येथे पार पडली, त्या बैठकीत उभयपक्षी सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. भारताच्या संरक्षण मंत्रालायचे सहसचिव अमिताभ प्रसाद आणि मंगोलीयाचे संरक्षण राज्यमंत्री ब्रिगेडीअर जनरल गान्खुयाग दवाग्दोर्ज यांनी या बैठकीचे संयुक्त अध्यक्षस्थान भूषविले. भारताचे मंगोलियातील राजदूत अतुल मल्हारी गोतसुर्वे या बैठकीला हजार होते.
उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याबाबत दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, दोन्ही देशांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा आढावाही घेण्यात आला व त्या मार्गाने संरक्षण सहकार्य वृद्धींगत करण्याबाबत विचार करण्यात आला. विद्यमान जागतिक स्थिती आणि भूराजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत उभय बाजूंनी आपापली मते व्यक्त करण्यात आली. भारताच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रातील क्षमता आणि गुणवत्तेबाबत अमिताभ प्रसाद यांनी माहिती दिली व मंगोलियाच्या सशस्त्रदलांबरोबर अधिक फलदायी भागीदारी करण्यास भारताला नक्की आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंगोलियानेही या क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत विश्वास व्यक्त केला. उभय देशांत वाढत असलेल्या सहकार्याबाबतही दोन्ही बाजूनी समाधान व्यक्त करण्यात आले.
अमिताभ प्रसाद आणि गोतसुर्वे यांनी या बैठकीनंतर मंगोलियाचे उपसंरक्षणमंत्री बी. बायार्माग्नाई यांचीही न्हेत घेतली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यात आली. या नंतर भारतीय शिष्टमंडळाने उलनबतार येथील विविध लष्करी प्रशिक्षण संस्थाना भेट दिली व विद्यमान सहकार्याची पाहणी केली. भारत आणि मंगोलिया यांच्यात पूर्वापार ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नागरी संपर्क आणि दृढ संबंध आहे. दोन्ही देश परस्परांना ‘आध्यात्मिक शेजारी’ समजतात. तर, आधुनिक जगात लोकशाही, स्वातंत्र्य व मुक्त आणि बाजारकेंद्री अर्थव्यवस्था दोन्ही देशांना जोडणारे समान मूल्य आहे. भारताचे तत्कालीन राजदूत कुशक बकुला रिम्पोचे यांनी भारत आणि मंगोलियाचे उभयपक्षी संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंगोलिया आणि रशियात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. मध्य आशियायी गणराज्ये आणि भारत यांच्यातील समान सांस्कृतिक संबंध त्यांच्या भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आल्याचे या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी