सीमावाद आणि धर्मावर आधारलेल्या राजकारणामुळे 1947 साली झालेल्या फाळणीचे परिणाम आजही अनेकांसाठी न विसरता येणारे आहेत. मात्र अशा काही घटना अनुभवायला मिळतात की, माणूसकी,मैत्री यावरचा विश्वास वाढतो. फाळणीमुळे सुरेश कोठारी आणि ए. जी. शाकिर या बालपणीच्या दोन जिवलग मित्रांची ताटातूट झाली, गुजरातमधील डीसा येथे एकत्र वाढलेले हे दोन मित्र लाखो इतर लोकांबरोबर विस्थापित झाले होते.
वयाच्या 12 व्या वर्षी फाळणीमुळे वेगळे झाल्यानंतर, 1982 मध्ये हे दोन्ही मित्र न्यूयॉर्कला पहिल्यांदा अगदी थोड्या वेळासाठी एकमेकांना भेटले होते. या भेटीसाठी या दोघांच्या एका कॉमन मित्राने पुढाकार घेतला होता. या भेटीमुळे मनाचे समाधान झाले नसले तरी एवढ्या वर्षांनंतरही हे मैत्रीचे बंध कसे होते याची झलक उपस्थितांना मिळाली होती.
View this post on Instagram
मात्र त्यानंतर 41 वर्षे म्हणजे 2023 पर्यंत त्यांची पुन्हा भेट झाली नाही. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत हे बालपणीचे दोस्त एकमेकांना भेटले. सुरेश कोठारी यांची नात मेगन कोठारी यांनी या भेटीचे चित्रीकरण केले होते. या भेटीचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला आणि अनेक नेटकऱ्यांनी ही भावनिक भेट अनुभवली. या व्हिडिओत दोन्ही मित्र एकमेकांना आलिंगन देताना बघायला मिळाले. बालपणाच्या या मैत्रीवर राजकारण, सीमावाद, वय अशा कशाचाही परिणाम झाला नसल्याचे स्पष्टपणे बघायला मिळाले.
“भौगोलिक आणि राजकीय अडथळ्यांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे करूनही त्यांच्यात आजही एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि आदर कायम आहे. कोणत्याही सरकार किंवा सीमारेषेद्वारे माणसांमधले हे बंध तोडले जाऊ शकत नाही. 2024 च्या एप्रिलमध्ये न्यू जर्सी येथे माझ्या आजोबांच्या 90 व्या वाढदिवसाला ते पुन्हा एकत्र येतील अशी आशा आहे,” असा मजकूर या व्हिडिओबरोबर वाचायला मिळतो.
कोठारी आणि शाकीर यांची ही मैत्री अनेक अडथळे पार करून आजही कायम आहे. या पुनर्मिलनामुळे फक्त त्यांच्याच नाही जगभरातील अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. जेव्हा त्यांनी एकमेकांचे हात धरून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला, तेव्हा खऱ्या मैत्रीला कशाचीही सीमा नसते याचा पुनर्प्रत्यय आला.