Tuesday, March 10, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi किंचित घट होऊनही भारत दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार देश: SIPRI

किंचित घट होऊनही भारत दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार देश: SIPRI

0
शस्त्रास्त्र
स्क्वॉड्रनची संख्या कमी होत असताना भारतीय हवाई दलाने आणखी 114 फ्रेंच लढाऊ राफेल विमानांची मागणी केली आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (SIPRI) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, 2021-2025 या पाच वर्षात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार म्हणून उदयास आला आहे, ज्याचे प्रमाण जागतिक शस्त्रास्त्र आयातीपैकी 8.3 टक्के आहे.

“भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार होता. 2016-20 आणि 2021-25 दरम्यान त्याची आयात किरकोळ (–4.0 टक्के) कमी झाली,” असे अहवालात म्हटले आहे.

ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर 2025” या अहवालात युक्रेनला जागतिक आयातीच्या 9.7 टक्के आयातीसह अव्वल स्थानावर ठेवले आहे, जे प्रामुख्याने रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे घडले आहे.

भारत परदेशी लष्करी उपकरणांचा प्रमुख खरेदीदार राहिला असला तरी, गेल्या दशकात त्याच्या आयातीत किरकोळ घट झाल्याचे अभ्यासात नमूद केले आहे, जे देशांतर्गत संरक्षण उत्पादनाच्या हळूहळू होणाऱ्या परिणामाचे प्रतिबिंब आहे. SIPRI च्या मते, 2816-20 आणि 2021-25 दरम्यान भारताची शस्त्रास्त्र आयात 4 टक्क्यांनी कमी झाली.

या घसरणीनंतरही, भारत आपल्या लष्करी आधुनिकीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशी पुरवठादारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अहवालात असे नमूद केले आहे की 2021-2025 दरम्यान भारताच्या आयातीचा सर्वात मोठा वाटा रशियाकडून होता, जो एकूण पुरवठ्याच्या 40 टक्के होता. तथापि, भारतीय शस्त्रास्त्र बाजारपेठेतील मॉस्कोचे वर्चस्व सातत्याने कमी होत गेले आहे, 2011-2025 दरम्यान 70 टक्के असलेलं हे प्रमाण 2016-2020 मध्ये 51 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

त्याच वेळी, भारताने पाश्चात्य आणि इतर भागीदारांकडून खरेदी वाढवली आहे. 2021-2025 दरम्यान भारताच्या आयातीपैकी फ्रान्सचा वाटा 29 टक्के होता, तर इस्रायलने 15 टक्के पुरवठा केला. SIPRI ने नमूद केले की गेल्या दशकात, भारताने हळूहळू रशियापासून युरोप आणि अमेरिकेतील पुरवठादारांकडे शस्त्रास्त्रांचा पुरवठा वळवला आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की भारताची शस्त्रास्त्र आयात मुख्यत्वे चीनशी असलेल्या धोरणात्मक स्पर्धेमुळे आणि पाकिस्तानशी असलेल्या सततच्या तणावामुळे होते, जे दोन्हीकडून वेळोवेळी सशस्त्र संघर्षात रूपांतरित झाले आहेत.

SIPRI ने मोठ्या नियोजित खरेदीकडे देखील लक्ष वेधले, जे नजीकच्या काळात परदेशी पुरवठादारांवर भारताचे अवलंबित्व टिकवून ठेवू शकतात. यामध्ये फ्रान्सकडून साधारणपणे 140 लढाऊ विमाने आणि जर्मनीकडून सहा पारंपरिक पाणबुड्यांची संभाव्य खरेदी समाविष्ट आहे.

त्याच वेळी, अहवालात नमूद केले आहे की भारताच्या विस्तारणाऱ्या देशांतर्गत संरक्षण उद्योगाने आयातीचा वेग कमी करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात स्वदेशी कार्यक्रमांना अनेकदा उत्पादन विलंबाचा सामना सहन करावा लागतो.

प्रादेशिकदृष्ट्या, आशिया आणि ओशनियामधील चार देश, भारत, पाकिस्तान, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी 2021-2025 मध्ये जगातील दहा सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र आयातदारांमध्ये स्थान मिळवले. युनायटेड स्टेट्स या प्रदेशाचा सर्वात मोठा पुरवठादार होता, जो आयातीच्या 35 टक्के होता, त्यानंतर रशिया 17 टक्के आणि चीन 14 टक्के वाटा  होता.

पाकिस्तान जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे, जो जागतिक आयातीपैकी 4.2 टक्के आयात करत आहे. 2016-2020 आणि 2021-2025 दरम्यान त्याच्या शस्त्रास्त्र खरेदीत 66 टक्क्यांनी वाढ झाली, तर इस्लामाबादच्या आयातीपैकी 80 टक्के पुरवठा चीनने केला.

जागतिक स्तरावर, अहवालात असे नमूद केले आहे की 2021-2025 दरम्यान शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण 2011-2015 कालावधीनंतर सर्वाधिक होते. अमेरिका जगातील सर्वात मोठा निर्यातदार राहिला, जागतिक शस्त्रास्त्र निर्यातीत 42 टक्के वाटा होता, जो मागील पाच वर्षांच्या कालावधीत 36 टक्के होता. या कालावधीत वॉशिंग्टनने 99 देशांना शस्त्रास्त्रे पुरवली.

जागतिक निर्यातीत फ्रान्स दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र निर्यातदार म्हणून उदयास आला, त्यानंतर रशियाचा क्रमांक लागतो, तर जर्मनी चीनला मागे टाकून प्रमुख शस्त्रास्त्रांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार बनला.

गुंतागुंतीच्या प्रादेशिक सुरक्षा वातावरणात स्वदेशी उत्पादन वाढवण्याचा आणि पुरवठादारांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत असतानाही, भारत परदेशी लष्करी हार्डवेअरवर सतत अवलंबून आहे हे या निष्कर्षांवरून स्पष्ट होते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleIndonesia Moves to Procure BrahMos Missiles from India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here