ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांकात भारताची 129व्या स्थानावर घसरण

0
ग्लोबल

ग्लोबल जेंडर गॅप (जागतिक लिंग अंतर) निर्देशांकात भारताच्या 129 व्या स्थानावर झालेल्या घसरणीवर रेड डॉट फाऊंडेशनच्या संस्थापक एल्समेरी डिसिल्वा यांनी प्रकाश टाकला आहे. जागतिक आर्थिक मंचाकडून हा निर्देशांक मागील आठवड्यात प्रसिद्ध झाला. आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव हा सामाजिक हिंसाचाराचाच एक प्रकार आहे यावर भर देत, त्यांनी भारतातील लिंग असमानतेच्या बहुआयामी स्वरूपावर चर्चा केली. वित्तीय सेवांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी, आर्थिक निरक्षरता आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या सहभागावरील निर्बंध यांसारखे अडथळे या समस्येत लक्षणीय योगदान देणारे आहेत असे डी सिल्वा यांनी स्पष्ट केले.

भारतात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखणे आणि प्रसूती काळातील लाभ यासाठी प्रगतीशील कायदे असले तरी पितृसत्ताक दृष्टिकोन समाजात इतका खोलवर रुजला आहे की या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. धोरणे आणि सामाजिक निकष यांच्यात असणाऱ्या गंभीर परस्परसंबंधावरही डी सिल्वा यांनी  प्रकाश टाकला. हानिकारक लिंग निकषांमुळे महिलांना अनेकदा मर्यादित संधीच मिळतात आणि शिक्षणाच्या माध्यमातूनही त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, या मुद्द्यांवरही त्यांनी आपले विचार मांडले.

भारताची तुलना बांगलादेश आणि श्रीलंकेसारख्या देशांशी करताना, डी सिल्वा यांनी नमूद केले की या देशांमध्ये वस्त्रोद्योगासारखे महिला-केंद्रित नोकऱ्या असलेले अनेक उद्योग असू शकतात. पण भारताने त्याच्या अद्वितीय संदर्भांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला. लिंग समानतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी भारताच्या धोरणांचे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे सखोल पुनर्मूल्यांकन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शिवाय, महामारीच्या काळात महत्त्वपूर्ण असलेल्या सामुदायिक आरोग्य कार्यासारख्या महिलांनी कोणताही मोबदला मिळत नसूनही आणि कमी पगाराची जी कामे केली त्यांना मान्यता देणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डी सिल्वा अधोरेखित करतात.  वेतनातील पारदर्शकता आणि अधिक समावेशक असणाऱ्या कॉर्पोरेट पद्धतींचे त्यांनी समर्थन केले आहे.

महिलांमध्ये, विशेषत: सूक्ष्म-उद्योगांसाठी, त्यांना भांडवल, कौशल्ये आणि मार्गदर्शन प्रदान करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्याचे महत्त्वही डी सिल्वा यांनी स्पष्ट केले. महिलांमध्ये उपजतच काळजी घेण्याचा गुण असतो. हा गुण सामावून घेण्यासाठी लवचिक नोकरीच्या संधीं ज्यामध्ये असतील अशा बहु-आयामी दृष्टिकोनाची गरज असण्यावर त्यांनी जोर दिला आहे.

एल्समेरी डी सिल्वा यांचा याविषयी असणारा अभ्यास भारतातील लिंग समानता सुधारण्यामध्ये असणारी आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपायांचे सर्वसमावेशक विश्लेषण आपल्यासमोर मांडते. रेड डॉट फाऊंडेशनबरोबरचे त्यांचे कार्य देशभरातील महिलांमध्ये बदल घडवून आणण्यात आणि त्यांच्या सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

नीलंजना बॅनर्जी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here