केरळच्या किनारपट्टीनजीकची घटना
दि. ०८ मे: आपत्कालीन मदतीला अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊन भारतीय तटरक्षक दलाने फुफ्फुसात पाणी गेल्याने प्रकृती अतिशय गंभीर झालेल्या मच्छीमाराचे प्राण वाचविले. केरळमधील बेपोरच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात सुमारे ४० सागरी मैलांवर ही घटना घडली.
In a race against time, @IndiaCoastGuard‘s swift response saves a life at sea yet again.
The motto ‘Vayam Rakshama’ rings true as #ICG rescues a critically-ill fisherman off the coast of Kerala. #ICG #RescueMission #HeroesAtSeaMore: https://t.co/kFcqZe1DzQ@giridhararamane pic.twitter.com/9A3PImFhe1
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) May 8, 2024
जझिरा या भारतीय मच्छीमार नौकेकडून आपत्कालीन मदतीसाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या आपत्कालीन हाकेला भारतीय तटरक्षक दलाने प्रतिसाद दिला. कोची येथून आर्यमन आणि सी-४०४ ही जहाजे, वैद्यकीय पथक व हलके प्रगत हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी रवाना केले. तटरक्षकदलाच्या पथकाने या मच्छिमार नौकेचा शोध घेतला आणि नौकेवरील रुग्णाला हवाईमार्गे कोची येथे नेले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तटरक्षक दलाने ‘वयम् रक्षामः’ या आपल्या ब्रीदवाक्याला अनुसरून जलद आणि तत्परतेने समन्वय साधून, समुद्रामध्ये आणखी एकाचे प्राण वाचवले. समुद्रात पडून वाहून जात असलेल्या या मच्छीमाराचे प्राण नौकेवरील खलाशांनी वाचवले होते, मात्र फुफ्फुसात जास्त पाणी गेल्याने त्याची प्रकृती खालावली होती.
तटरक्षकदलाकडून सातत्याने मच्छीमार बोटींना मानवीय मदत केली जात आहे. भारतीय तटरक्षकदलाच्या सावित्रीबाई फुले या गस्ती नौकेने १६ एप्रिल रोजी कारवारपासून २१५ सागरी मैलांवर रोझरी हे मच्छीमार नौका इंजिनात बिघाड झाल्यामुळे भर समुद्रात फसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तटरक्षकदलाच्या नौकेने या फसलेल्या बोटीचा माग काढला व त्या बोटीला समुद्रात गाठले होते. बोट पूर्णपणे बंद होऊ नये या साठी तटरक्षकदलाच्या अभियंत्यांनी बोटीच्या इंजिनाची समुद्रातच तातडीने तात्पुरती दुरुस्ती केली होती. या बोटीला नंतर तटरक्षकदलाच्या कर्नाटक जिल्हा मुख्यालयाच्या समन्वयाने कारवार बंदराकडे ओढून आणण्यात आले. त्यानंतर ही बोट लक्ष्मीनारायण नावाच्या मच्छीमार नौकेच्या ताब्यात देण्यात आली. या बोटीने इंजिनात बिघाड झालेल्या बोटीला सुखरूप बंदरात पोहोचविले होते. सागरी तस्करी रोखणे, सागरी प्रदूषण नियंत्रण अशा उपक्रमातही तटरक्षकदल सातत्याने आघाडीवर राहून काम करीत असते.
विनय चाटी