सिंगापूरमध्ये भारतीय युद्धनौकांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
दि. १० मे: दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग म्हणून सिंगापूरच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील ‘आयएनएस दिल्ली,’ ‘आयएनएस शक्ती,’ आणि ‘आयएनएस किल्तन,’ या नौकांनी सिंगापूरचा दौरा पूर्ण करून त्यांच्या पुढील प्रवासाला प्रारंभ केला. भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली या नौकांचा सिगापूर दौरा आयोजित करण्यात आला होता.
भारत आणि सिंगापूरदरम्यान द्विपक्षीय संबंध, तसेच परस्पर हित आणि सहकार्याबाबत या दौऱ्यात चर्चा करण्यात आली. तसेच, दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रात सागरी सुरक्षा आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारतीय नौदलाच्या कटिबद्धतेची ग्वाही देण्यासाठी भारतीय नौदलातील दिल्ली, शक्ती व किल्तन या युद्धनौकांचा सिंगापूर दौरा सहा मे पासून आयोजित करण्यात आला होता. दक्षिण चीनजवळील समुद्रात भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याच्या परिचालनात्मक नेमणुकीचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती.
भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याचे ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग’ रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्यासह जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी सिंगापूर नौदलाच्या मुख्यालयात सिंगापूरच्या नौदलातील ‘फ्लीट कमांडर’ पदावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. जहाजांच्या या भेटीमुळे नौदलसहकार्य आणि आंतरपरिचालन वाढवण्याबाबत चर्चा करण्याची संधी भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलांना लाभली. ‘आयएनएस शक्ती’ या युद्धनौकेवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभात दोन्ही देशांच्या नौदलांतील कर्मचारी, तसेच सिंगापूरमधील भारतीय समुदायाचे नागरिक आणि स्थानिक राजनैतिक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने दोन्ही देशांतील उपस्थितांना मैत्री आणि परस्पर सन्मानाचे नाते आणखी दृढ करत एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
सागराशी संबंधित शिक्षण आणि माहिती प्रसार करण्याबाबत भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून भारतीय युद्धनौकांना भेट देण्यासाठी सिंगापूरमधील स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मुलांना मार्गदर्शकाच्या मदतीसह जहाजांचा फेरफटका घडवण्यात आला. तेथे मुलांनी नौदलाची विविध कार्ये, भारताचा समृद्ध सागरी इतिहास आणि वारसा व सागरी सुरक्षेचे महत्त्व याविषयी माहिती घेतली. युवा पिढीला प्रेरित करून त्यांच्यात सागरी घडामोडींची अधिक समज निर्माण व्हावी, या उद्देशाने हा परस्पर संवाद घडवण्यात आला. भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांच्या नौदलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, इतर व्यावसायिक विचारविनिमयासह परस्परांच्या जहाजांना भेटी देण्याचा तसेच विषय तज्ञांच्या विचारांच्या आदानप्रदानाचा (एसएमईई) उपक्रम देखील पार पाडला.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)