भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे वेगळेपण ‘प्रथम वापर नाही आणि (गरज पडली तर) चोख प्रत्युत्तर’, या तत्त्वावर आधारित असल्याचा पुनरुच्चार सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केला. जनरल अनिल चौहान 26 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे, सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज – IISS (CAPS – IISS) द्वारे आयोजित परिषदेत बोलत होते. जनरल अनिल चौहान यांनी आपल्या भाषणात पारंपरिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला. अण्वस्त्रांचा धोका भू-राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचे त्यांनी नमूद केले.
‘आण्विक धोरण: समकालीन विकास आणि भविष्यातील शक्यता’, या विषयावर बोलताना जनरल चौहान यांनी भर दिला की सध्याच्या भू-राजकीय वातावरणात आण्विक शस्त्रांमुळे निर्माण झालेला धोका हा एक केंद्रीय चिंतेचा विषय म्हणून पुन्हा समोर आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रथम वापर नाही’ या धोरणाचे पालन आणि गरज पडली तर चोख प्रत्युत्तर या सिद्धांताचा अवलंब केल्यामुळे भारताच्या आण्विक कार्यक्रमाचा मार्ग अद्वितीय आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
संरक्षण दल प्रमुखांनी सखोल विचार, नवीन सिद्धांतांचा विकास, प्रतिकार क्षमतेचा पुनर्विचार आणि आण्विक (सी4आय2एसR अर्थात ताबा घेणे, नियंत्रण करणे, परस्पर संवाद, कॉम्प्युटर, गुप्तचर यंत्रणा, माहिती, पाळत ठेवणे आणि शोध) पायाभूत सुविधांचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला.
ऐतिहासिक संदर्भांबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, 1998 मध्ये करण्यात आलेल्या पाच आण्विक चाचण्यांनंतर भारताने आपला आण्विक सिद्धांत तयार केला. 1999 मध्ये अधिकृतपणे प्रसिद्ध झालेल्या या सिद्धांताने ‘प्रथम वापर नाही’ धोरणाप्रती असणारी भारताची बांधिलकी जाहीर केली. हे धोरण ठामपणे सांगते की भारत अण्वस्त्र हल्ला सुरू करणारा पहिला देश नसेल, पण त्याच्या विरोधातील कोणत्याही अण्वस्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा अधिकार तो राखून ठेवेल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध समुदायांची लष्करी शक्ती आणि आण्विक प्रतिबंधाच्या गतिमानतेत लक्षणीय बदल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनरल चौहान यांची ही टिप्पणी आली आहे. अनेक दशकांपासून भारताची आण्विक भूमिका स्पष्ट करणाऱ्या मूलभूत तत्त्वांशी वचनबद्ध राहून समकालीन आव्हानांशी जुळवून घेण्याचे महत्त्व यामुळे परत एकदा अधोरेखित झाले. प्रतिबंध घालणे, ते वाढवणे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यावर दिला जाणारा भर हा स्थिरता आणि शांतता राखण्याच्या भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून दिसून येतो.
भू-राजकीय तणाव वाढत असताना, भारताच्या आण्विक तत्त्वांबद्दलची दृढ बांधिलकी आणि त्याच्या धोरणात्मक सिद्धांतांची निरंतरनिरंतर होत जाणारी उत्क्रांती ही येत्या काही वर्षांत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षाविषयक धोरणांना आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
टीम भारतशक्ती