Tuesday, March 10, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची इंडोनेशियाची तयारी

भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची इंडोनेशियाची तयारी

0
ब्राह्मोस
ब्राह्मोस क्षेपणास्त्रे 

इंडोनेशियाने ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी भारताशी करार केला आहे, जे जकार्ताच्या सागरी हल्ला क्षमता बळकट करण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रिको रिकार्डो सिरैत यांनी सोमवारी रॉयटर्सला सांगितले की, हा करार सागरी क्षेत्रात संरक्षण क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या इंडोनेशियाच्या व्यापक लष्करी आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे. अर्थात त्यांनी या कराराचे एकूण मूल्य उघड करण्यास नकार दिला.

भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या ब्राह्मोस एरोस्पेसकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाते. 2023 मध्ये, कंपनीने जकार्तासोबत 200 दशलक्ष ते 350 दशलक्ष डॉलर्सच्या संभाव्य करारावर प्रगत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले.

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन महिन्यांत या करारावर औपचारिक स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री स्जाफ्री स्जामसोएद्दीन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील वाटाघाटींना वेग आला. या भेटीदरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या इंडोनेशियन समकक्षांना ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे मॉडेल सादर केले, ज्यामुळे चर्चेची प्रगती दिसून आली.

जर हे पूर्ण झाले तर, 2022 मध्ये करारावर स्वाक्षरी करणाऱ्या फिलीपिन्सनंतर इंडोनेशिया हा क्षेपणास्त्राचा दुसरा परदेशी ग्राहक बनेल.

गेल्या आठवड्यात, फिलीपिन्सच्या सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल रोमियो एस. ब्राउनर ज्युनियर यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या रायसीना संवाद 2026 च्या वेळी बोलताना इंडोनेशियाने खरेदी सुरू केल्याचे संकेत दिले.

“ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणारा फिलीपिन्स हा पहिला देश होता. आता इंडोनेशियानेही तीच प्रणाली खरेदी केली आहे,” असे ते म्हणाले. “आम्ही आमच्या खरेदीवर खूश आहोत आणि आशा आहे की आम्ही भारतासोबत अधिक व्यवसाय करू शकू.”

अर्थात इंडोनिशायाकडून अशा प्रतिक्रिया येऊनही, भारताने अद्याप या कराराबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

संरक्षण सूत्रांच्या मते, ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यात आवृत्त्यांचा पल्ला 290 किमी आहे. जहाजविरोधी हल्ला, किनारी संरक्षण आणि जमिनीवरील हल्ला मोहिमांसह अनेक भूमिकांसाठी डिझाइन केलेले, हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या जवळजवळ तिप्पट वेगाने प्रवास करू शकते, ज्यामुळे ते जगातील सर्वात वेगवान ऑपरेशनल सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनले आहे.

ही प्रणाली 1998 मध्ये भारताच्या DRDO आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांच्या संयुक्त उपक्रमातून विकसित करण्यात आली होती.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleकिंचित घट होऊनही भारत दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार देश: SIPRI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here