Wednesday, March 4, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi Indonesia Protest: आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

Indonesia Protest: आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

0

मंगळवारी, इंडोनेशियाच्या बांदुंग शहरातील दोन विद्यापीठांच्या परिसराजवळ, आंदोलकांवर स्थानिक पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला, अशी माहिती विद्यार्थी संघटना आणि अधिकाऱ्यांनी दिली. मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून, परिस्थिती आता अधिकच चिघळली आहे.

या आंदोलनाची सुरुवात, गेल्या आठवड्यात इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झाली. खासदारांसाठी वाढवलेल्या सवलतींसारख्या सरकारी खर्चाविरोधात हे आंदोलन होते. नंतर हे आंदोलन देशभर पसरले. एका पोलीस वाहनाने मोटारसायकल टॅक्सी चालकाला चिरडून ठार केल्यानंतर काही ठिकाणी दंगल व लूटपाटीचे प्रकारही घडले.

किमान 8 जण या आंदोलनात मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती वरिष्ठ मंत्री एअरलंन्ग्गा हार्तार्टो यांनी सोमवारी दिली.

विद्यापीठांजवळ अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर

बांदुंगमधील इस्लामिक युनिव्हर्सिटी (UNISBA) आणि जवळच्या पसुंदन विद्यापीठाजवळ जमलेल्या गर्दीवर, पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या फेकल्या, अशी माहिती या संस्थांशी संबंधित गटांनी इन्स्टाग्रामवरुन दिली. ही ठिकाणे जकार्ताच्या पश्चिमेला सुमारे 140 किमी अंतरावर आहेत.

पोलिसांनी, विद्यापीठाच्या गेट बाहेरून अश्रुधुराच्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या, ज्यात एका विद्यार्थ्याला दोन रबरी बुलेट लागून तो जखमी झाला, असे पसुंदन विद्यापीठाचा विद्यार्थी मोहम्मद इल्हाम, यांनी मंगळवारी रॉयटर्सला सांगितले.

पोलीस अधिकारी हेन्द्रा रोचमावान यांनी सांगितले की, “पोलिसांनी विद्यापीठ परिसरात प्रवेश केला नाही. मात्र, परिसरात रस्ते अडवून ठेवलेल्या आणि विद्यापीठात आश्रय घेणाऱ्या बिगर-विद्यार्थी आंदोलकांची गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.”

UNISBA चे कुलगुरू हारित्स नू’मान यांनी पोलिसांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत सांगितले की, “विद्यापीठ परिसर हा आंदोलकांसाठी वैद्यकीय मदतीचा केंद्रबिंदू ठरला होता.”

UNISBA च्या विद्यार्थी संघटनेने सुरक्षा यंत्रणांवर दडपशाहीचा आरोप करत म्हटले की, त्यांनी “क्रूरपणे” परिसरावर अश्रुधूर फेकला, ज्यामुळे काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास अडचण झाली.

इंडोनेशियामधील विद्यार्थी अनेक दशकांपासून लोकशाहीचे रक्षक मानले जातात. 1998 मध्ये हुकूमशहा सुहार्तो यांच्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

प्रबोवो यांची कामगार संघटनांशी भेट

सध्याचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, जे सुहार्तो यांच्या काळात लष्करी नेते होते, त्यांनी काही कामगार संघटनांशी बैठक घेतली. या संघटनांनी किमान वेतन वाढीच्या मागणीसाठी मागील आठवड्यातील आंदोलनात सहभाग घेतला होता. आपल्या कार्यालयाच्या निवेदनानुसार, प्रबोवो यांनी खासदारांना कामगार कायद्यांवर चर्चा करण्यास सांगितले आहे.

इंडोनेशियन ट्रेड युनियन काँफेडरेशनचे प्रमुख सईद इक्बाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “त्यांनी प्रबोवो यांना स्वस्त मजुरी, नोकरीतील आऊटसोर्सिंग व उत्पन्नावरच्या करात कपात यांसारख्या कामगारांच्या मागण्या सांगितल्या.”

प्रबोवो यांनी इशारा दिला की, हिंसक आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि लष्कर ठामपणे पावले उचतील.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी आंदोलनांवरील सुरक्षादलांच्या कारवाईवर टीका केली आहे.

“इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी निदर्शनांकडे देशद्रोह किंवा दहशतवादाच्या दृष्टीने पाहून अत्यंत बेजबाबदारपणे वागणूक दिली,” असे न्यू यॉर्कस्थित Human Rights Watch च्या आशिया विभागाच्या उपसंचालक मीनाक्षी गांगुली यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने, सुरक्षादलांकडून झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत कोणतेही उल्लंघन झाल्यास त्याची त्वरीत, सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी,” असे या कार्यालयाच्या प्रवक्त्या रवीना शमदासानी यांनी सांगितले.

जकार्ता पोलिसांनी Lokataru Foundation या नॉन-प्रॉफिट कायदेशीर मदत संस्थेचे संचालक- डेलपेड्रो मार्हाएन यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अल्पवयीन मुलांमध्ये दंगल भडकावल्याचा आरोप आहे.

या संस्थेने लगेच याबाबत प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचे आधी म्हटले होते.

या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, अनेक इंडोनेशियन नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलमधील चित्रांना गुलाबी आणि हिरव्या रंगाचे टोन दिले असून, काही जणांनी #ResetIndonesia या हॅशटॅगचा वापर करत सरकारकडे विविध मागण्या मांडल्या आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleबीजिंगच्या संचलनात नवीन पिढीच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन
Next articleभूस्खलनामुळे गाव उद्ध्वस्त, एक हजार नागरिक ठार झाल्याची भीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here