रमजान आणि Passover periods काळात गाझामध्ये तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा प्रस्ताव इस्रायल स्वीकारेल, असे पंतप्रधान कार्यालयाने रविवारी पहाटे सांगितले. यापूर्वी मान्य झालेल्या शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्याची मुदत संपल्यानंतर काही तासांमध्येच इस्रायलकडून ही घोषणा करण्यात आली.
विटकॉफ यांच्या प्रस्तावानुसार पहिल्या दिवशी, गाझामध्ये असलेल्या जिवंत आणि मृत अशा दोन्ही ओलिसांपैकी निम्म्या लोकांना सोडण्यात येईल, असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले.
त्यात पुढे म्हटले आहे की कायमस्वरूपी शस्त्रसंधीवर सहमती झाल्यानंतर उर्वरित ओलिसांचीही सुटका केली जाईल.
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, कायमस्वरुपी शस्त्रसंधीवरील चर्चेसाठी अधिक वेळ आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर विटकॉफ यांनी सध्याच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला.
हमासचे प्रवक्ते हेझेम कासिम यांनी शनिवारी सांगितले की, गाझामधील शस्त्रसंधीचा पहिला टप्पा वाढवण्याचा इस्रायलचा “प्रस्ताव” आम्ही नाकारला आहे. मात्र विटकोफच्या योजनेबाबत हमासची काय भूमिका आहे याचा स्पष्टपणे उल्लेख केला नाही.
हमासने सहमती दर्शवली तर विटकॉफ यांच्या प्रस्तावावर इस्रायल त्वरित वाटाघाटी करेल, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले.
हमासने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत नेतान्याहू यांच्या कार्यालयाने असेही म्हटले की, “करारानुसार, इस्रायलला जर वाटाघाटी अप्रभावी वाटल्या तर आम्ही 42व्या दिवसानंतर लढाईला परत सुरूवात करू शकतो.
दोन्ही बाजूंनी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की इस्रायलने कराराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यास किंवा त्याविषयी वाटाघाटी सुरू करण्यास नकार दिला.
त्याऐवजी, इस्रायलने पहिल्या टप्प्याच्या कराराचा कालावधी आणखी वाढवावा अशी विनंती केली, ज्यात प्रत्येक आठवड्याच्या कालावधी वाढवण्यात अनेक जिवंत कैदी आणि मृतदेह यांची अदलाबदल करण्याची अट होती.
मात्र हमासने याला नकार दिला आणि कराराचे पालन करण्याचा आग्रह धरला, दुसऱ्या टप्प्यातील करारासाठी आम्ही तयार असल्याचे म्हटले आणि या आधी जे मान्य झाले ते करण्यास इस्रायलला भाग पाडले.
शनिवारी, हमासच्या सशस्त्र शाखेने गाझामध्ये इस्रायली ओलिस अजूनही आपल्या ताब्यात असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या टप्प्याटप्प्याने शस्त्रसंधी करारात नमूद केल्याप्रमाणे उर्वरित ओलिस केवळ कराराद्वारेच अदलाबदल झाल्याने मुक्त होऊ शकतात यावर जोर दिला.
युद्धविराम करारामुळे 15 महिन्यांचे युद्ध थांबले आहे, ज्यामुळे सुमारे 2 हजार पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 33 इस्रायली ओलिस आणि पाच थाई लोकांची देवाणघेवाण होऊ शकली.
युद्धविराम करार आणखी पुढे जावा यासाठी पुढील वाटाघाटी करण्याचा यामागे हेतू होता.
युद्धविरामाबाबत अगदी अलीकडे कैरोमध्ये चर्चा सुरू आहे, पण त्यातून कोणताही निर्णय झालेला नाही.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)