उत्तर गाझामधील हजारो गाझियन्स त्यांच्या घरी परतण्यासाठी रविवारी रस्त्यावर उतरले. हमासने गाझा युद्धबंदीचा भंग केल्याचा आरोप इस्रायलने केल्यानंतर तसेच क्रॉसिंग पॉइंट उघडण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांचे मध्य पूर्व दूत, स्टीव्ह विटकॉफ गाझा युद्धविरामाची देखरेख करण्यासाठी बुधवारी इस्रायलला जाणार आहेत. इस्रायलच्या चॅनल 13 ने रविवारी, दोन इस्रायली अधिकाऱ्यांचा हवाला देऊन या संबंधित अहवाल सादर केला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, रविवारी मध्य गाझामध्ये लोकांच्या मोठ्या झुंडी उत्तरेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरुन पुढे सरकत होत्या, ज्यामध्ये वाहनांचा तसेच पायी जाणाऱ्या लोकांचा समावेश होता.
“गाझा शहर आणि उत्तरेकडे परत जाण्यासाठी लोकांची मोठी लाट पसरली आहे,” असे गाझा शहरातील विस्थापित नागरिक तामेर अल-बुराई यांनी सांगितले. “हाच करार झाला होता, नाही का?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“स्थलांतर करणाऱ्या बऱ्याच लोकांना अजून त्यांची घरे उभी राहिली आहेत की नाही याची कल्पना देखील नाही, पण त्याची पर्वा न करता ते पुढे सरकत आहेत. ते त्यांच्या घरांच्या नेस्तनाभूत झालेल्या मलब्याजवळ तंबू लावू इच्छितात, ते घरी जाण्याची भावना अनुभवू इच्छितात”, असे मत बुराई यांनी रॉयटर्सशी चॅटिंग अॅपद्वारे बोलताना व्यक्त केले.
या घटनेच्या साक्षीदारांनी सांगितले की, रविवारी अनेक लोक सलाहुद्दीन रोडवर संपूर्ण रात्र झोपले होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग आणि उत्तरेकडे जाणाऱ्या कोस्टल रोडवर, गाझा पट्टीच्या मध्यभागी असलेल्या नेत्झारिम कॉरिडॉरमध्ये इस्रायली लष्करी ठाणे पार करण्यासाठी वाट पाहत होते.
अल्-आवदा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी बोलताना सांगितले की, इस्रायली गोळीबारात एक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाला आणि अन्य 15 जण जखमी झाले. सैनिकांनी किनारपट्टीच्या रस्त्यावर लोकांना जवळ येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी आपल्या सैन्याला धोका निर्माण करणाऱ्या संशयितांवर चेतावनी पूर्वक गोळ्या झाडल्या.
गाड्या, ट्रक आणि रिक्षांवर लोक गाद्या, खाद्यपदार्थ आणि तंबूं ओव्हरलोड करुन जात होते. हे सामान त्यांना एन्क्लेव्हच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात एक वर्षापेक्षा जास्त काळ निवारा म्हणून कामास येणार होते.
इजिप्शियन आणि कतारी मध्यस्थांसह केलेल्या आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने केलेल्या करारानुसार, इस्रायलचा उद्देश उत्तरेकडून विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनींना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी देण्यासंबंधी होता.
परंतु इस्रायलने सांगितले की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यादरम्यान, किबुत्झच्या घरात ओलिस ठेवलेल्या अर्बेल येहूद या इस्रायली महिलेला सोडवण्यात तसेच अजून किती ओलिस जिवंत आहेत याची माहिती देण्यात हमासला अपयश आले, ज्यामुळे या कराराचे उल्लंघन झाले.
याचा परिणाम म्हणून, मध्य गाझातील चेकपॉइंट्स उत्तर गाझामध्ये प्रवेशासाठी उघडले जाणार नाहीत, असे इस्रायलने एक निवेदनात म्हटले. हमासने इजरायलवर मुद्दामहून विलंब केल्याचा आरोप केला.
दरम्यान दोन्हीकडील मध्यस्थी, वादाचे निराकरण करण्यासाठी गहन चर्चा करत असून, यामुळे विवाद सोडवला जाऊ शकतो आणि येहुदला पुढील शनिवारी होणाऱ्या अदलाबदलीच्या आधीच मुक्त केले जाऊ शकते, असे पॅलेस्टिनी आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.
गाझा दहशतवादी गट- इस्लामिक जिहादच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या राहण्याची व्यवस्था ठरवली गेली आहे. मात्र दुसरीकडे इजरायली अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत चर्चेची प्रक्रिया अद्याप सुरु आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)