इस्रायलच्या गाझा पाडावामुळे पॅलेस्टिनी कायमचे विस्थापित होण्याची भीती

0
गाझा सिटीतील आपल्या 93 हजार अमेरिकन डॉलर्स एवढ्या रकमेच्या गृहकर्जाचे पैसे फेडण्यात दशक घालवल्यानंतर, पॅलेस्टिनी बँकर शॅडी सलामा अल-रयेस यांना, इस्रायली हल्ल्यात इमारत कोसळल्यानंतर आता आपले कुटुंब निराधार झाल्याचे बघायला मिळाले.

या आठवड्यात सुरू झालेल्या दाट लोकवस्तीच्या शहरातील मध्यभागी जमिनीवर हल्ला करण्यापूर्वी, 5 सप्टेंबर रोजी 15 मजली मुश्ताहा टॉवरवर झालेल्या हल्ल्यामुळे उंच इमारतींना लक्ष्य करून इस्रायली लष्कराने केलेल्या तीव्र पाडाव मोहिमेची सुरुवात झाली.

गेल्या दोन आठवड्यांत, इस्रायलच्या सशस्त्र दलांनी सांगितले की त्यांनी 20 गाझा सिटी टॉवर ब्लॉक पाडले आहेत जे त्यांच्या दाव्यानुसार हमास वापरते‌. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की आतापर्यंत 50 “दहशतवादी टॉवर” पाडण्यात आले आहेत.

विनाश आणि विस्थापन

या मोहिमेमुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत. त्याच काळात, इस्रायली सैन्याने शहरातील झीतौन, तुफाह, शेजैया आणि शेख अल-रदवान परिसरातील भागांवर हल्ले करून ते पाडले आहेत, असे दहा रहिवाशांनी रॉयटर्सला सांगितले. ऑगस्टपासून शेख अल-रदवानमधील अनेक इमारतींचे झालेले नुकसान वृत्तसंस्थेने पुनरावलोकन केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये दिसून येते.

अल-रदवान म्हणाले की त्यांना भीती आहे की हा विनाश गाझा शहरातील लोकसंख्या कायमची हटवण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे, असे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने देखील (OHCHR) बोलून दाखवले आहे. त्यांचे प्रवक्ते, थमीन अल-खेतान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की लोकसंख्या स्थलांतरित करण्याचा असा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न वांशिक शुद्धीकरणासारखा असेल.

“मी कधीही विचार केला नव्हता की मी गाझा शहर सोडेन, परंतु स्फोटांची मालिका न थांबता सुरूच आहे,” अल-रदवान यांनी बुधवारी सांगितले. “मी माझ्या मुलांची सुरक्षितता धोक्यात घालू शकत नाही, म्हणून मी सामान बांधत आहे आणि दक्षिणेकडे निघून जाईन.”

मात्र, अल-रयेसने कधीही गाझा पूर्णपणे सोडणार नाही अशी शपथ घेतली.

इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी मे महिन्यात सांगितले होते की गाझाचा बहुतांश भाग लवकरच “पूर्णपणे नष्ट” होईल आणि लोकसंख्या इजिप्तच्या सीमेजवळील एका अरुंद जमिनपट्ट्ट्यापर्यंतच मर्यादित राहील.

हल्ल्यादरम्यान गाझा शहरातील सर्व नागरी रहिवाशांना तेथून निघून जाण्याचे आवाहन करणाऱ्या इस्रायलने गेल्या आठवड्यात उत्तर गाझामध्ये जाणारा क्रॉसिंग मार्ग बंद केला, ज्यामुळे अन्न पुरवठा आणखी मर्यादित झाला.

या बातमीसाठी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट-कर्नल नदाव शोशानी म्हणाले की, “गाझा नष्ट करण्याची कोणतीही रणनीती नाही.” त्यांनी सांगितले की लष्कराचे उद्दिष्ट हमासचा नाश करणे आणि ओलिसांना घरी आणणे एवढ्यापुरतेच आहे.

हमासने इस्रायली सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी उंच इमारतींचा वापर केला होता, असे त्यांनी सांगितले, इस्लामी दहशतवादी गटाने नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला आणि इमारतींमध्ये बुबी-ट्रॅप देखील लावले. गाझामध्ये आयईडीने इस्रायली सैनिक नियमितपणे मारले जातात.

हमासने इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी निवासी टॉवर्सचा वापर केल्याच्या आरोपाला नकार दिला आहे.

इस्रायलच्या लष्कराची आणि राजकारण्यांची उद्दिष्टे नेहमीच जुळतात असे नाही, असे इस्रायली सुरक्षा सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले. गाझा भागातून पॅलेस्टिनींना भविष्यातील पुनर्विकासासाठी बाहेर काढणे यासारख्या कल्पना लष्करी उद्दिष्टांपासून वेगळ्या असल्याचे एका सूत्राने नमूद केले. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने टिप्पणीसाठी केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांपासून, ज्यामध्ये 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आले, त्यानंतर, गाझामधील इस्रायलच्या युद्धातील हा हल्ला हा नवीनतम टप्पा आहे. या हल्ल्यात 65 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे, दुष्काळ पडला आहे आणि बहुतेक लोकसंख्येला अनेक वेळा विस्थापित केले जात आहे. एकूण 48 ओलिस अजूनही गाझामध्ये आहेत आणि सुमारे 20 जण जिवंत असल्याचे मानले जाते.

गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्रांच्या चौकशीत असे आढळून आले की इस्रायलने गाझामध्ये नरसंहार केला आहे. इस्रायलने या निष्कर्षाला पक्षपाती आणि “निंदनीय” म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नागरी निवासस्थाने आणि पायाभूत सुविधांचा नाश युद्ध गुन्हा ठरू शकतो.

इस्रायली प्रवक्ते शोशानी म्हणाले की, या इमारती गुप्तचर अधिकारी आणि कायदेशीर अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या कायदेशीर लष्करी लक्ष्यभेद होत्या.

निर्वासन आदेशानंतर भीती, गोंधळ

युद्धापूर्वी, मुश्ताहा टॉवर गाझा शहरातील व्यावसायिक वर्गात लोकप्रिय होता आणि विद्यार्थी इथून दिसणारी समुद्राची दृश्ये आणि सार्वजनिक उद्यान तसेच दोन विद्यापीठांजवळील सोयीस्कर ठिकाण यामुळे इथे आकर्षित होत असत.

सुरुवातीला येथे सुमारे 50 कुटुंबे राहत होती, परंतु अलिकडच्या काही महिन्यांत गाझाच्या इतर भागातून विस्थापित झालेल्या नातेवाईकांना आश्रय दिल्याने ही संख्या तिप्पट झाली आहे, असे अल-रेयेस म्हणाले.

टॉवरच्या तळाभोवती अधिक विस्थापित कुटुंबांना राहण्यासाठी अनेक तंबू पसरले आहेत. मागील हल्ल्यांमुळे इमारतीचे वरचे मजले खराब झाले होते.

5 सप्टेंबर रोजी सकाळी, एका शेजाऱ्याला इस्रायली लष्करी अधिकाऱ्याचा फोन आला ज्यामध्ये त्याला काही मिनिटांत इमारत रिकामी करण्याची सूचना सगळ्यांना देण्याचा आदेश होता नाहीतर बॉम्ब “आमच्या डोक्यावर पाडतील,” असे अल-रेयेस म्हणाले.

रॉयटर्स स्वतंत्रपणे त्यांच्या निर्वासन आदेशाची पडताळणी करू शकले नाहीत. इस्रायली हल्ल्यांपूर्वी इतर इमारतींमधील रहिवाशांच्या वृत्तांशी ते सुसंगत आहे. शोशानी म्हणाले की लष्कराने रहिवाशांना स्थलांतर करण्यासाठी वेळ दिला आणि इमारतींवर हल्ला करण्यापूर्वी नागरिक निघून गेले आहेत याची खात्री केली.

“भीती, गोंधळ, नुकसान, निराशा आणि वेदनांनी आम्हाला सर्वांना ग्रासले. मी लोकांना अनवाणी धावताना पाहिले; काहींनी त्यांचे मोबाईल फोन किंवा कागदपत्रेही घेतली नाहीत. मी देखील पासपोर्ट किंवा ओळखपत्र घेतले नाही,” असे अल-रेयेस म्हणाले, ज्यांना या वर्षीपर्यंत त्यांचे कर्ज फिटेल अशी आशा होती.

“आम्ही आमच्यासोबत काहीही घेतले नाही, माझी पत्नी आणि माझी दोन मुले, 9 वर्षीय आदम आणि 11 वर्षीय शाहद, पायऱ्या उतरून पळून गेले.”

रॉयटर्सने चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये पुढे काय घडले ते दाखवले आहे. हवेतून, टॉवरच्या तळाशी जवळजवळ एकाच वेळी दोन क्षेपणास्त्रे फुटली आणि सुमारे सहा सेकंदात तो टॉवर उद्ध्वस्त झाला. रस्त्यावर आणि विस्थापित लोकांच्या तंबूंवर धूळ, धूर आणि कचरा पसरला, या स्फोटामुळे तिथे उपस्थित असलेले सगळे विखुरले गेले, ते धावत आणि ओरडत होते.

रॉयटर्सच्या प्रश्नाच्या उत्तरात, इस्रायली सैन्याने सांगितले की मुश्ताहा टॉवरच्या खाली हमासची “भूमिगत पायाभूत सुविधा” होती जी ते इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी वापरत होते. यासंबंधी पुरावे देण्याची विनंती मात्र लष्कराने नाकारली.

बुधवारी रॉयटर्सला दिलेल्या उत्तरात, संयुक्त राष्ट्रांच्या OHCHR ने म्हटले आहे की इस्रायली सैन्याने दहशतवादी पायाभूत सुविधा म्हणून वर्णन केलेल्या इतर इमारतींना कोणत्या कारणांनी लक्ष्य केले ते सिद्ध करणारे पुरावे देखील दिलेले नाहीत.

इमारतीच्या रहिवाशांच्या संघटनेचे प्रमुख असलेले अल-रयेस म्हणाले की, हमासची उपस्थिती असली तरीही संपूर्ण इमारत पाडण्याची युक्ती “अर्थपूर्ण नाही.” मात्र त्यांनी ते करण्याचे नाकारले.

“रहिवाशांना कोणतेही नुकसान न पोहोचवता 16 मजली इमारत उद्ध्वस्त करण्याऐवजी, हमासच्या अतिरेक्यांना तिथून बाहेर काढणे अशा पद्धतीने ते ही संपूर्ण परिस्थिती हाताळू शकले असते,” असे त्यांनी सांगितले.

शहरातील सब्रा जिल्ह्यात कुटुंबासह काही आठवडे राहिल्यानंतर, ऑगस्टपासून शहरातील इतर लाखो रहिवाशांप्रमाणे अल-रयेस निघून गेले आहे आणि गुरुवारी मध्य गाझाच्या देईर अल-बलाहमध्ये तंबू उभारत आहे.

गाझा शहराच्या बाहेरील भागातील घरांचा सैन्याकडून पाडाव

जमिनीवरील हल्ल्याच्या तयारीसाठी, अलिकडच्या आठवड्यात, झेइतौन, तुफाह आणि शेजैया येथे दररोज एक डझन घरे उद्ध्वस्त केली जात आहेत, असे रॉयटर्सशी बोललेल्या रहिवाशांनी सांगितले.

पॅलेस्टिनी स्थानिक एनजीओ नेटवर्कचे प्रमुख अमजद अल-शावा यांनी अंदाज लावला आहे की युद्धादरम्यान गाझा शहरातील 65 टक्क्यांपेक्षा जास्त इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलिकडच्या आठवड्यात उपनगरीय भागात मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान इथल्या परिसराच्या उपग्रह प्रतिमांमध्ये दिसून आले आहे.

जगभरातील संघर्षांचा डेटा गोळा करणारी एक ना-नफा संस्था द कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटाने (एसीएलईडी) ऑगस्टच्या सुरुवातीपासून गाझा शहरात इस्रायलच्या सशस्त्र दलांनी केलेल्या 170 हून अधिक विध्वंस घटनांचे दस्तऐवजीकरण केले आहे, प्रामुख्याने पूर्वेकडील भागात तसेच झेइतौन आणि सब्रामध्ये नियंत्रित स्फोटांद्वारे.

“मागील काळात विध्वंसाची गती आणि व्याप्ती अधिक व्यापक दिसते,” असे एसीएलईडीच्या वरिष्ठ मध्य पूर्व विश्लेषक अमेनेह मेहवर यांनी रॉयटर्सला सांगितले. त्या तुलनेत, युद्धाच्या पहिल्या 15 महिन्यांत गाझा शहरात 160 पेक्षा कमी अशा विध्वंसांची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

रॉयटर्सशी बोलताना रहिवाशांनी असेही सांगितले की, इस्रायली सैन्याने शेख रदवान आणि तेल अल-हवा परिसरात स्फोटकांनी भरलेली रिमोटली चालणारी वाहने उडवली आहेत, ज्यामुळे गेल्या दोन आठवड्यात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

लष्करी प्रवक्ते शोशानी यांनी लष्करी लक्ष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतींवर जमिनीवर आधारित स्फोटकांचा वापर केल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे स्फोटकांनी भरलेल्या वाहनांची विशेष माहिती नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या OHCHRने सांगितले की त्यांनी निवासी पायाभूत सुविधांचे नियंत्रित विध्वंस केले आहे. याशिवाय काही ठिकाणी संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाले आहेत.

गाझा शहरावरील सध्याच्या हल्ल्यापूर्वीही, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील जवळजवळ 80 टक्के इमारती – अंदाजे 2 लाख 47 हजार 195 रचना – खराब झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या उपग्रह केंद्राच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये गोळा केले गेले. यामध्ये 213 रुग्णालये आणि 1 हजार 29 शाळा समाविष्ट आहेत.

ऑक्सफॅममध्ये गाझा धोरणाचे नेतृत्व करणाऱ्या बुशरा खालिदी म्हणाल्या की टॉवर ब्लॉक्स हा आश्रय घेण्याच्या शेवटच्या प्रकारांपैकी एक आहे आणि लोकांना बाहेर काढल्याने दक्षिण बाजूला गर्दी “वेगाने” वाढेल असा इशारा दिला.

साब्रा येथील फायनान्सचा 23 वर्षीय विद्यार्थी तारिक अब्देल-अल, युद्धात अनेक वेळा स्थलांतर करण्याचे आदेश मिळाल्याने थकून गेला होता, तरीही तो त्याच्या कुटुंबासह त्याचे घर सोडण्यास कचरत होता, असे तो म्हणाला. 19 ऑगस्टच्या सकाळी, त्याच्या 3 मजली घराशेजारील घरे पाडल्यानंतरच ते घर सोडून निघून गेले.

फक्त 12 तासांनंतर, इस्रायली हल्ल्यात आपल्या कुटुंबाचे घर उद्ध्वस्त झाले, असे तो म्हणाला.

“आम्ही तिथेच राहिलो असतो तर कदाचित त्या रात्री आमचा मृत्यू झाला असता,” अब्देल-अलने मध्य गाझा येथील नुसेरत छावणीतून फोनवरून रॉयटर्सला सांगितले, इथे संपूर्ण रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

“त्यांनी परतण्याच्या आमच्या आशा नष्ट केल्या आहेत,” असे तो म्हणाला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleकॅनडा: आयर्लंडच्या तीन रॅपर्सना प्रवेश नाकारला
Next articleIndia’s Theatre Command Reform: From Rhetoric to First Steps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here