इराणी तुरुंगातून इटालियन पत्रकार सेसिलिया सालाची मुक्तता

0
इटालियन
इटालियन पत्रकार सेसिलिया साला 8 जानेवारी 2025 रोजी रोम, इटली येथे इराणमध्ये नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर तिच्या घरी पोहोचल्यावर प्रतिक्रिया देताना. (रॉयटर्स/रेमो कॅसिली)

तीन आठवड्यांपूर्वी तेहरानमध्ये वृत्तांकनासाठी दौऱ्यावर असताना ताब्यात घेण्यात आलेली इटालियन पत्रकार सेसिलिया साला इराणच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बुधवारी घरी परतली.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी 29 वर्षीय तरुणीचे स्वागत करण्यासाठी रोमला उपस्थित होते. या प्रकरणाशी संबंधित असलेले राजकीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

लेखक, पॉडकास्टर असणाऱ्या इटलीच्या या पत्रकाराला 19 डिसेंबर रोजी तेहरानमध्ये इस्लामिक रिपब्लिकच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले, त्यावेळी ती इराणमध्ये नियमित पत्रकार व्हिसा घेऊन काम करत होती.

अबेदीनीही अटकेत

जॉर्डनमध्ये तीन अमेरिकी सेवा सदस्यांना ठार मारणाऱ्या 2024 च्या हल्ल्यात वापरलेल्या ड्रोनचा पुरवठा केल्याच्या आरोपाखाली इराणी व्यापारी मोहम्मद अबेदीनी याला अमेरिकेच्या वॉरंटवर मिलानमध्ये अटक करण्यात आल्यावर तीन दिवसांनी साला हिला अटक करण्यात आली होती.

गेल्या वर्षीच्या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचे इराणने नाकारले असून अबेदीनीच्या मुक्ततेसाठी इटलीवर दबाव आणण्याच्या हेतूने सालाला तुरुंगात टाकल्याचा आरोप फेटाळून लावला होता.

इटालियन सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, “तेहरानच्या कुख्यात एविन तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलेल्या सालाची “मुत्सद्दी आणि गुप्तचरांनी केलेल्या अविरत प्रयत्नामुळे” सुटका करण्यात आली.” त्यात अबेदीनीचा उल्लेख नव्हता.

अबेदीनीची बुधवारी मिलान तुरुंगातून सुटका झालेली नसून, अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याच्या अंतिम कार्यवाहीपूर्वी नजरकैदेत ठेवण्याच्या त्याच्या विनंतीवर न्यायालय पुढील आठवड्यात निर्णय देणार आहे.

मिलानच्या सरकारी वकील फ्रान्सेस्का नानी यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या अबेदीनीला मिलानच्याच तुरूंगात ठेवण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्याशी भेट

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी मेलोनी यांनी अचानक फ्लोरिडाला भेट दिल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी सालाची सुटका करण्यात आली. या भेटीचा किंवा त्यात झालेल्या चर्चेचा कोणताही तपशील जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र उपपंतप्रधान माटेओ साल्विनी यांनी सांगितले की त्यांनी सालाशी चर्चा केली आहे.

सालाचा जोडीदार काम करत असलेल्या इटालियन news website II Post  च्या बातमीनुसार, ट्रम्प यांनी इराणशी वाटाघाटी करण्यासाठी इटलीला “एक प्रकारचा हिरवा कंदील” दिला आहे आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मावळत्या प्रशासनासोबत या समस्येबाबत कोणतेही राजकारण न करण्याचे आश्वासन दिले आहे.

एका वरिष्ठ राजकीय सूत्राने या बैठकीबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला मात्र फ्लोरिडा येथे झालेली बैठक महत्त्वाची होती आणि सालाची सुटका होण्यामागे याने महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले.

इराणच्या सामाजिक बदलांचे वृत्तांकन

‘इल फोग्लिओ’ या वृत्तपत्रासाठी आणि ‘चोरा मीडिया’ या पॉडकास्ट कंपनीसाठी काम करणारी साला इराणी समाजातील अलीकडील बदलांचे वृत्तांकन करण्यासाठी तेहरानमध्ये आली होती. तिचे वडील रेनाटो साला म्हणाले की जेव्हा त्यांनी ऐकले की ती घरी जात आहे तेव्हा ते भारावून गेले.

“मी माझ्या आयुष्यात फक्त तीन वेळा रडलो आहे,” असे सांगत ते पुढे म्हणालेः “या काळात, मला असे वाटले की बुद्धिबळाचा खेळ खेळला जात आहे, मात्र यात दोनपेक्षा जास्त खेळाडू होते.”

अलिकडच्या वर्षांत इराणच्या सुरक्षा दलांनी डझनभर परदेशी आणि दुहेरी नागरिकत्व असलेल्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर मुख्यतः हेरगिरी आणि सुरक्षेशी संबंधित आरोप ठेवण्यात आले आहेत. अशा अटकेद्वारे इराण इतर देशांकडून सवलती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मानवाधिकार गटांनी केला आहे. मात्र इराणने हे आरोप नाकारले आहेत.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघाई यांनी रविवारी सांगितले की, अबेदीनीला अटक करणे म्हणजे ओलीस ठेवण्यासारखे आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleचीनने शोधला Mpox विषाणूचा नवीन स्ट्रेन, काय आहेत लक्षणे?
Next article100,000 Troops for Russia? North Korea’s Growing Role In Ukraine Sparks Regional Alarm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here