रशियाच्या अति पूर्वेकडील भागात 8.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी

0
बुधवारी रशियाच्या अति पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.7 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे 4 मीटर उंचीपर्यंत त्सुनामी आली, यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आणि या प्रदेशात तसेच जपानच्या पूर्व किनारपट्टीच्या बहुतेक भागातील नागरिकांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गंभीर आणि सर्वात शक्तिशाली’

“आजचा भूकंप गंभीर आणि दशकांच्या भूकंपांमध्ये हा सर्वात शक्तिशाली होता,” असे कामचटका राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, ज्यामध्ये एका लहान मुलांसाठी असलेल्या शाळेचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

कामचटका येथील काही भागात 3 ते 4  मीटर (10 ते 13 फूट) उंचीची त्सुनामी नोंदली गेली, असे आपत्कालीन परिस्थितीचे प्रादेशिक मंत्री सर्गेई लेबेदेव यांनी सांगितले, त्यांनी लोकांना द्वीपकल्पाच्या किनाऱ्यापासून दूर जाण्याचे आवाहन केले.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 19.3  किमी (12 मैल) खोल होता आणि पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की या अवाचा खाडीच्या किनाऱ्यावरील 1 लाख 65 हजार  लोकसंख्येच्या शहरापासून 126 किमी (80 मैल) पूर्व-आग्नेय दिशेला होते. आधीची तीव्रता 8.0 वरून सुधारून 8.7 केली.

जपान हवामान संस्थेने आपल्या इशाऱ्यात सुधारणा केली आहे. त्यांच्या मते 01.00 GMT च्या सुमारास 3 मीटर (10 फूट) उंचीच्या त्सुनामी लाटा मोठ्या किनारी भागात पोहोचण्याची शक्यता आहे. NHK या वृत्तवाहिनीने सांगितले की काही भागात सरकारने स्थलांतराचे आदेश जारी केले आहेत.

TBS वृत्तवाहिनीच्या फुटेजमध्ये दाखवण्यात आले आहे की जपानच्या उत्तर होक्काइडोमधील कारखाना कामगार आणि रहिवाशांना एका टेकडीवर हलवण्यात आले आहे.

‘धोकादायक त्सुनामी लाटा’

“जर तुम्ही लवकरात लवकर जमिनीपासून उंचावर आणि किनाऱ्यापासून दूर जाऊ शकत असाल तर कृपया लवकर स्थलांतर करा,” असे जपानी सार्वजनिक वृत्तवाहिनी NHK वरील एका वृत्तात सांगितले.

अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने देखील रशिया, जपान, अलास्का आणि हवाईच्या काही किनाऱ्यांवर पुढील तीन तासांत “धोकादायक त्सुनामी लाटा” येण्याचा इशारा जारी केला आहे. अमेरिकेच्या गुआम बेट प्रदेश आणि मायक्रोनेशियाच्या इतर बेटांवर देखील त्सुनामीचा इशारा लागू करण्यात आला आहे.

हवाईने काही किनारपट्टीच्या भागातून लोकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. “त्वरित हालचाल करा! विनाशकारी त्सुनामीच्या लाटा अपेक्षित आहेत,”  असे होनोलुलु आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने एक्सवर सांगितले.

कामचटका द्वीपकल्पाच्या दक्षिणेस असलेल्या सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरात त्सुनामीच्या धोक्यामुळे स्थलांतराचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत, असे सखालिनचे गव्हर्नर व्हॅलेरी लिमारेन्को यांनी टेलिग्रामवर सांगितले.

वैद्यकीय मदतीची गरज

भूकंपानंतर अनेक लोकांनी वैद्यकीय मदतीची मागणी केली, असे प्रादेशिक आरोग्य मंत्री ओलेग मेलनिकोव्ह यांनी रशियाच्या तास या  राज्य वृत्तसंस्थेला सांगितले.

“दुर्दैवाने, भूकंपाच्या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. काही जण बाहेर पळताना जखमी झाले आणि एका रुग्णाने खिडकीतून उडी मारली आणि त्यात तो जखमी झाला. नवीन विमानतळ टर्मिनलमध्ये एक महिला देखील जखमी झाली,” असे मेलनिकोव्ह म्हणाले.

“सर्व रुग्णांची स्थिती सध्या समाधानकारक आहेत आणि आतापर्यंत कोणत्याही गंभीर दुखापतीची नोंद झालेली नाही.”

रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या भूभौतिकीय सेवेच्या कामचटका शाखेने सांगितले की हा एक अतिशय शक्तिशाली भूकंप होता.

“तथापि, भूकंपाच्या काही वैशिष्ट्यांमुळे, भूकंपाची तीव्रता इतकी जास्त नव्हती … जितकी एवढ्या तीव्रतेपासून अपेक्षा केली जाऊ शकते,” असे टेलिग्रामवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

“अजूनही भूकंपाचे धक्के बसत आहेत… त्यांची तीव्रता बरीच मोठी असेल. मात्र येत्या काही काळात आणखी मोठे भूकंप अपेक्षित नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आहे.”

कामचटका आणि रशियाचा अति पूर्व भाग हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेला आहे, हा भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय प्रदेश आहे जो मोठ्या भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकांना सहज बळी पडतो.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleइंडो-पॅसिफिक सागरी संबंध दृढ करण्यासाठी नौदल प्रमुख जपान दौऱ्यावर
Next articleधोरणात्मक मतभेदांमुळे ट्रम्प, G20 शिखर परिषदेला गैरहजर राहण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here