भारत आणि ब्राझील 2030 पर्यंत, 20 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य गाठणार

0

भारत आणि ब्राझीलने 2030 पर्यंत, द्विपक्षीय व्यापार $20 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेकडून वाढत्या व्यापार दबावाचा दोन्ही देशांना सामना करावा लागत असताना, हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भारत आणि ब्राझील यांच्यातील द्विपक्षीय व्यापार $12 अब्ज डॉलर्स इतका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनासिओ लुला दा सिल्वा, यांच्यात गुरुवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात व्यापार वाढीवर सखोल चर्चा झाली. दोन्ही बड्या नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक सहभाग वाढवण्याची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. या चर्चेमध्ये सध्याच्या द्विपक्षीय संरचनेचा आढावा घेण्यात आला आणि एकीकरणासाठीच्या नवीन क्षेत्रांचा शोधही घेण्यात आला.

व्यापार, डिजिटल पेमेंट्सवर लक्ष

या संभाषणातील एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, यावेळी ‘मर्कोसुर-भारत प्राधान्य व्यापार कराराची’ (MERCOSUR-India Preferential Trade Agreement) व्याप्ती वाढवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. याचा उद्देश शुल्क सवलतींसाठी (tariff concessions) अधिक क्षेत्रे खुली करणे आणि एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करणे हा आहे.

दोन्ही देशांनी आपल्या राष्ट्रीय झटपट पेमेंट प्रणाली – भारताचा ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (UPI) आणि ब्राझीलचा ‘पिक्स’ (PIX) – बद्दल माहितीची देवाणघेवाण केली. यामुळे भविष्यात क्रॉस-बॉर्डर इंटरऑपरेबिलिटीसाठी (cross-border interoperability) मार्ग शोधण्यास मदत होईल.

हे प्रयत्न पाश्चिमात्य-प्रभुत्व असलेल्या वित्तीय प्रणालींना पर्याय निर्माण करण्याच्या ‘ब्रिक्स’ (BRICS) च्या व्यापक प्रयत्नांशी जुळतात, विशेषतः ‘ग्लोबल साऊथ’ (Global South) मधील प्रमुख अर्थव्यवस्थांना लक्ष्य करणाऱ्या अमेरिकेच्या शुल्क उपायांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे आहे.

लुला यांचा पुढीलवर्षी भारत दौरा

ब्राझीलचे अध्यक्ष लुला हे 2026 मध्ये, भारताचे अतिथी म्हणून देशाचा दौरा करणार असल्याची शक्यता आहे. ही भेट भारताच्या ‘BRICS’ शिखर परिषदेच्या यजमानपदाच्या वेळीच होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये, उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन ‘भारत-ब्राझील व्यापार निरीक्षण यंत्रणेअंतर्गत; (India-Brazil Trade Monitoring Mechanism) मंत्री आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळासह भारताला भेट देणार आहेत. या भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य, डिजिटल समावेश (digital inclusion) आणि महत्त्वपूर्ण खनिजे (critical minerals) यांमध्ये सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

‘ब्रिक्स’ मधील वाढता समन्वय

या वाढत्या भारत-ब्राझील संबंधांमागे ‘ब्रिक्स’ चे व्यापक भू-राजकीय पुनर्संरेखन आहे. अमेरिका केवळ चीनच नाही, तर भारत आणि ब्राझीलच्या विरोधातही शुल्क कारवाई वाढवत असल्यामुळे, हा गट स्थानिक चलनांमध्ये व्यापार करण्यासाठी, न्यू डेव्हलपमेंट बँकची भूमिका वाढवण्यासाठी आणि ‘स्विफ्ट’ (SWIFT) वित्तीय मेसेजिंग प्रणालीला पर्याय विकसित करण्यासाठीच्या योजनांना गती देत आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय अभ्यास विद्यालयाचे प्राध्यापक राजन कुमार यांच्या मते, “सध्या, भारत अमेरिकेशी योग्य शुल्कासाठी कठोर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, सवलती मिळवण्यात अपयश आल्यास, भारत ‘ब्रिक्स’ देशांसोबत पर्यायी व्यापार यंत्रणा शोधू शकतो.”

अमेरिकेचा व्यापार दबाव, विशेषतः सध्याच्या प्रशासनाखाली, ‘ब्रिक्स’ ची अंतर्गत एकसंधता आणखी मजबूत करत आहे आणि जागतिक आर्थिक प्रशासनाला पुन्हा आकार देण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रेरणा देत आहे. राजकीय विश्लेषक अँजेलो जियुलियानो यांच्या मते, ‘ग्लोबल साऊथ’ “एकतर्फी दबावाला सक्रियपणे विरोध करत आहे” आणि आता बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या कल्पनेभोवती एकत्र येत आहे.

उद्योजकांमधील वाढती भागीदारी

या आठवड्यात, मुंबईत ‘ब्राझील-इंडिया लिडे फोरम’ (Brazil-India LIDE Forum) अंतर्गत, 120 हून अधिक भारतीय आणि ब्राझीलियन व्यावसायिक नेत्यांनी भेट घेतली. यामुळे तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऊर्जा, खाणकाम, औषधनिर्माण आणि विमानचालन यामध्ये खाजगी क्षेत्राची आवड दिसून आली. साओ पाउलोचे (São Paulo) माजी गव्हर्नर जोआओ डोरिया (João Doria), जे आता ‘लिडे’ (LIDE) उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये “व्यावहारिक पूल बांधण्याचे” महत्त्व अधोरेखित केले. “ब्राझीलियन उद्योगांसाठी भारत हे सर्वात आशादायक नवीन बाजारपेठांपैकी एक आहे. आणि आमच्या व्यावसायिक संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी ही योग्य वेळ आहे,” असे ते म्हणाले.

एका लवचिक व्यापारासाठी पाऊल

अमेरिकेच्या व्यापार उपायांचा भारत आणि ब्राझीलने घेतलेला अनुभव, अधिक लवचिक आणि सार्वभौम आर्थिक फ्रेमवर्कसाठीच्या प्रयत्नांना आणखी गती देत आहे. ब्राझील अजूनही वॉशिंग्टनसोबत स्वतंत्र व्यापार करारासाठी वाटाघाटी करण्यास तयार असला तरी, अध्यक्ष लुला यांनी ब्राझीलचे न्यायिक स्वातंत्र्य आणि बाह्य हस्तक्षेपाला नकार देण्याबद्दल जोरदार भूमिका घेतली आहे – विशेषतः देशांतर्गत राजकीय बाबींवर अमेरिकेच्या टीकेच्या संदर्भात.

दरम्यान, भारताने यामध्ये अधिक सावध मुत्सद्दी भूमिका घेतली आहे. आपल्या समविचारी ‘ग्लोबल साऊथ’ भागीदारांसोबतचे संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले असून, भारत आता व्यापार आणि तंत्रज्ञान भागीदारीचा विस्तार करण्यालाही प्राधान्य देत आहे.

– हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleAir Chief Confirms Major Pakistani Losses in Operation Sindoor, Six Aircraft Downed, Key Bases Crippled
Next articleऑपरेशन सिंदूरमध्ये 6 पाकिस्तानी विमाने, मुख्य तळ उद्ध्वस्त: हवाई दल प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here