SCO Summit: टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी–पुतिन यांच्यात चर्चा

0

तियानजिन येथे झालेल्या, ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ शिखर परिषदेतील (SCO Summit) द्विपक्षीय बैठकीमध्ये, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, यांनी रणनीतिक ऐक्य आणि वैयक्तिक मैत्रीचे ठळक प्रदर्शन केले. ऑक्टोबर 2024 नंतरची ही त्यांची  पहिली प्रत्यक्ष भेट ठरली असून, ही बैठक अशावेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेच्या भारतीय निर्यातींवरील वाढत्या टॅरिफमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढले आहेत.

बदलत्या भू-राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक प्रवास

SCO प्रक्रियांच्या समारोपानंतर, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना स्वतःच्या गाडीने द्विपक्षीय चर्चेच्या स्थळी येण्यासाठी आमंत्रित केले. पुतिन सुमारे 10 मिनिटे मोदींची वाट पाहत थांबले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान, त्यांच्यात अनौपचारिक पण सखोल चर्चा झाली जी त्यांनी, बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्यावरही 45 मिनिटांहून अधिक काळ चालू ठेवली.

हा क्षण, एका छायाचित्रकारांनी टिपला आणि मोदींनी तो सोशल मीडियावर शेअर देखील केला. अनेकांनी याला भारत-रशिया भागीदारीचा दृढ संदेश मानले, विशेषतः अशावेळी जेव्हा भारतावर, मॉस्कोकडून तेल खरेदी केल्यामुळे वॉशिंग्टनचा दबाव वाढत आहे.

धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक स्थैर्यावर केंद्रित चर्चा

या औपचारिक बैठकीत, एक तासाहून अधिक काळ विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी “विशेष आणि सन्माननीय धोरणात्मक भागीदारी” अधिक दृढ करण्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली, जिला यावर्षी 15 वर्षे पूर्ण होत आहेत.

आर्थिक, ऊर्जा आणि वित्तीय सहकार्याच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. रुपी-रुबल व्यापार यंत्रणा मजबूत करण्यावर आणि अमेरिकन डॉलरवरील अवलंबन कमी करण्यावर भर देण्यात आला.

युक्रेन संघर्ष आणि शांतता उपक्रम

या चर्चेत, युक्रेनमधील युद्धावर विशेष भर देण्यात आला. पंतप्रधान मोदींनी – संवाद आणि मुत्सद्देगिरीवर आधारित भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आणि अलीकडील शांतता प्रयत्नांचे स्वागत केले. त्यांनी या संघर्षाचा स्थायी आणि सर्वसमावेशक तोडगा लवकर निघण्याची गरज अधोरेखित केली.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, भारताच्या रचनात्मक भूमिकेचे कौतुक केले आणि भारत व चीन यांनी दिलेल्या शांततेच्या दिशेने योगदानाचे समर्थन केले.

अमेरिकन टॅरिफ आणि धोरणात्मक स्वायत्तता

ही बैठक अशावेळी झाली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ लावले आहेत. दरम्यान, भारताने ही टॅरिफ्स “अन्यायकारक आणि अविवेकी” ठरवली असून, त्याच्या ऊर्जा धोरणावर राष्ट्रीय हितानुसार निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, या बाह्य दबावांना न जुमानता भारत-रशिया संबंध मजबूत राहिले आहेत. 2022 मधील युक्रेन युद्धानंतर भारत रशियन खनिज तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार ठरला, ज्यावेळी पश्चिमेकडील देशांनी रशियावर बंदी घालत आपली खरेदी कमी केली होती.

मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर सन्मान

चर्चेदरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मोदींना “प्रिय मित्र” असे संबोधले आणि SCO Summit हा, ग्लोबल साऊथ आणि ईस्टला एकत्र आणणारा मंच आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधान मोदींशी प्रत्यक्ष भेट झाल्याचा आनंदही यावेळी व्यक्त केला.

पुतिन यांच्या मैत्रीपूर्ण उद्गारांना उत्तर देताना, मोदींनी भारत-रशिया संबंधांची ऐतिहासिक दृढता अधोरेखित केली. “योग्य वेळी आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहिलो,” असे मोदी यावेळी म्हणाले.

23वी वार्षिक शिखर परिषद भारतात

मोदींनी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना यावर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या 23 व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले. “भारतातील 140 कोटी लोक तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत,” असे मोदी यावेळी म्हणाले.

भारत बहुध्रुवीय (multipolar) जागतिक व्यवस्थेत अधिकाधिक पुढे जात असताना, रशियासोबतचा त्याचा दृढ सहभाग नवी दिल्लीच्या धोरणात्मक स्वायत्ततेच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. तसेच, हे दोन्ही देश प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एकत्र काम करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.

– हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleSCO: पहलगाम हल्ल्याचा निषेध, दहशतवादाविरोधातील जाहीरनामा प्रसिद्ध
Next articleअफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा हाहाकार; 600 ठार, 1500 जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here