रशियाची युद्धनौका मॉस्क्वाला काळ्या समुद्रात जलसमाधी मिळाली. काळ्या समुद्रातील रशियाच्या आरमारी ताफ्यातील आघाडीची ही युद्धनौका क्षेपणास्त्र, शस्त्रास्त्रे व अन्य सामग्रीने तैनात होती.
मॉस्क्वाचे आधीचे नाव स्लाव्हा होते आणि 1976मध्ये हे जहाज युक्रेनच्या मायकोलायव्ह येथील जहाजबांधणी प्रकल्पात होते. योगायोगाने मायकोलायव्ह या शहरात धुमश्चक्री सुरू आहे आणि रशिया व युक्रेन सैनिक येथील इंच-इंच जागेसाठी लढत आहे.
मॉस्क्वा ही युद्धनौका जानेवारी 1983मध्ये रशियन सैन्यात दाखल झाले. तर, एप्रिल 2000 रोजी काळ्या समुद्रातील रशियाच्या आरमारातील आघाडीची युद्धनौका बनली. 2008मध्ये रशियाने जॉर्जियावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी मॉस्क्वा युद्धनौका सहभागी झाली होती. रशियाच्या ताब्यात जाण्यापूर्वी जॉर्जियाच्या नौदलाने मॉस्क्वावर हल्ला केला होता. तर, 2014मध्ये क्रिमियाला ताब्यात घेण्याच्या रशियाने केलेल्या कारवाईदरम्यान युक्रेनच्या नौदलाला रोखण्यासाठी मोस्क्वा सहभागी झाले होते.
रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनविरोधात विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यापासून युक्रेनच्या किनारपट्टी भागात रशियाच्या नौदलाचे नेतृत्व मॉस्क्वा युद्धनौका करत होती. ताफ्यातील विमानवाहू जहाजांच्या संरक्षणाची जबाबदारी अशा युद्धनौकांवर असते, पण शत्रूच्या विमानवाहू जहाजावर देखील आक्रमण करू शकेल, अशी ती तयार करण्यात आली होती. 16 सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल वाहून नेण्याची क्षमता मॉस्क्वाची होती. सध्या या युद्धनौकेवर P-1000 वल्कन मिसाइल तसेच S 300 मिसाइल, एके 130 ट्विन ड्युअल पर्पज गन व एके 630 क्लोज-इन वेपन सिस्टीम व टॉर्पेडो हे देखील होते.
युद्धाच्या वातावरणात मॉस्क्वाला मिळालेली जलसमाधी हा चर्चेचा विषय ठरली आहे. 611.5 फूट लांबीची, कमाल 32 नॉट्स वेग असलेली तसेच त्रिस्तरीय हवाई संरक्षण बबल तयार करणारी मॉस्क्वा या युद्धनौकेवर 13 एप्रिल 2022 रोजी दोन नेपच्यून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर, ‘मॉस्क्वा मिसाइल क्रूझरला आग लागल्याने त्यावरील युद्धसामग्रीचा स्फोट झाला,’ असा दावा रशियन वृत्तसंस्था टासने रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. मॉस्क्वाला बंदराकडे नेण्यात येत होते आणि त्यावरील क्रूला बाहेर काढण्यात आले. तथापि, बंदरात नेत असताना खवळलेल्या समुद्रात हे जहाज बुडाले, अशी माहिती रशियाने दिली. मॉस्क्वावर सुमारे 500 खलाशी होते, त्यांना सुखरूपपणे स्थलांतरित करण्यात आले, असेही रशियाने म्हटले आहे. हे सर्व सुखरूप असून ते रशियन आहेत की, युक्रेनचे नागरिक आहेत, हे जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. ते सर्व 500 जण बचावले आहेत, हेच महत्त्वाचे आहे. तथापि, 400हून अधिक समुद्रात बुडाले असावेत, असा अंदाज पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तविला आहे.
मॉस्क्वा अण्वस्त्रे वाहून नेत होती की नाही, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. दोन अण्वस्त्रे या युद्धनौकेवर असू शकतात, असे काही तज्ज्ञांना वाटते.
– ब्रिगेडिअर एस के चॅटर्जी (निवृत्त)
संपादक, Bharatshakti.in
अनुवाद : मनोज शरद