नौदल आणि तटरक्षक दलात, स्वदेशी ‘C295 वाहतूक विमानांचा’ समावेश होणार

0

भारतीय वायुदल (IAF) आपल्या ताफ्यात C295 वाहतूक विमानांचा समावेश करत असताना, त्यापाठोपाठ आता भारतीय नौदल (Indian Navy) आणि भारतीय तटरक्षक दल (ICG) देखील लवकरच स्वदेशी बनावटीच्या या विमानांची खरेदी करण्याची शक्यता आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, C295MW च्या सागरी प्रकारासाठी प्रस्ताव विनंती (RFP) जारी केल्यानंतर, हे पाऊल उचलण्यात आले असून, याची खरेदी प्रक्रिया आधीच सुरू आहे. देशाच्या सामरिक विमानवाहू ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून, नौदलासाठी 9 तर तटरक्षक दलासाठी 6 विमानांसह एकूण 15 विमाने खरेदी करण्याचे नियोजन आहे. या अधिग्रहणासाठी डिसेंबर 2025 पर्यंत व्यावसायिक बोली पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सागरी विमान वाहतूक क्षमतेत वाढ

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांच्या अध्यक्षतेखालील Defence Acquisition Council ने मार्च 2024 मध्ये, C295 सागरी वाहतूक विमानांसाठी ‘Acceptance of Necessity’ (AoN) मंजूर केली होती. ही खरेदी अंतिम झाल्यानंतर, भारताच्या समुद्री दलांची युद्धतयारी लक्षणीयपणे सुधारेल. यात जलद तैनाती, शोध आणि बचाव मोहिमा तसेच लॉजिस्टिक ऑपरेशन्ससाठी महत्त्वाची मदत होणार आहे, विशेषतः हिंद महासागर परिसरात (IOR).

हे विमान लहान आणि तात्पुरत्या धावपट्ट्यांवर उड्डाण आणि लँडिंग करू शकते. ही सुविधा बेटांवरील आणि किनारपट्टीवरील ऑपरेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त आहे, जी नौदल आणि तटरक्षक दलासाठी अत्यावश्यक बाब आहे.

C295 वायुसेनेत आधीच समाविष्ट

भारतीय वायुदलाने 2021 मध्ये, Airbus आणि Tata Advanced Systems Limited (TASL) सोबत, 56 C295MW विमानांसाठी करार केला होता. त्यातील 15 विमाने स्पेनमधून थेट मिळाली असून त्यांचा वापर सध्या सुरू आहे. ही विमाने जुन्या झालेल्या Avro विमानांची जागा घेणार आहेत.

बाकीची 40 विमाने वडोदरा (गुजरात) येथील खासगी क्षेत्रातील प्रकल्पात तयार केली जात आहेत, यामुळे भारतातील खाजगी क्षेत्रात प्रथमच लष्करी विमानांची निर्मिती होत आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्णतः भारतात बनलेले पहिले  C295 विमान, 2026 च्या उत्तरार्धात वायुसेनेला सुपूर्द केले जाणार आहे.

हा उपक्रम ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळकटी देणारा आहे.

C295 ची प्रमुख वैशिष्ट्ये:

C295 हे मध्यम क्षमतेचे टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमान असून, 70 सैनिक किंवा 50 पॅराट्रूपर्स वाहून नेण्याची क्षमता ठेवते. विमानाची वजन उचलण्याची सर्वाधिक क्षमता 10 टन असून, रिअर रॅम्प डोअर मुळे हे विमान: एअर ड्रॉप फॅसिलिटी, वैद्यकीय आपत्कालीन सेवा (24 स्ट्रेचर कॉन्फिगरेशनसह) यासह सुसज्ज असून,  लो-लेव्हल टॅक्टिकल फ्लाइट्सच्या सर्व मोहिमा सक्षमरित्या पार पाडू शकते.

हे विमान 670 मीटरमध्ये उड्डाण घेऊ शकते आणि 320 मीटरमध्ये लँड होऊ शकते, जे सीमा भागांतील तैनाती आणि आपत्ती निवारणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

त्याची कमाल सहनशक्ती (एन्ड्युरन्स) 11 तासांची असून, क्रूझिंग स्पीड 480 किमी/तास आहे, जो लांब पल्ल्याच्या समुद्री गस्तीसाठी सुयोग्य आहे. यामध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली बसवण्यात आली आहे, जी युद्धजन्य परिस्थितीत त्याच्या टिकून राहण्यास मदत करते.

भविष्यासाठी महत्वाचे पाऊल

भारत सध्या दोन आघाड्यांवर संभाव्य संघर्षाच्या तयारीत असून, त्यासाठी टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट क्षमतेचे आधुनिकीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या वायुसेनेकडे C-17 ग्लोबमास्टर III आणि C-130J सुपर हर्क्युलीस यांसारखी मोठी विमाने आहेत, पण AN-32 आणि IL-76 सारखी जुनी विमाने सेवेच्या अंतिम टप्प्यावर आहेत.

C295 ही विमाने आधुनिक, लवचिक आणि स्वावलंबी वायुसेनेच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहेत.

नौदल आणि तटरक्षक दल देखील आता C295 कार्यक्रमात सामील होत असल्याने, ही विमाने तीनही सैन्य शाखांसाठी एकसंध टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहणार आहेत, ज्यामुळे संयुक्त ऑपरेशन्समधील समन्वय व लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढेल.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleजगभरातील Microsoft सर्व्हर्सवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला
Next articleSecond Major Failure of Chinese Fighter Jets: Bangladesh College Crash Exposes Cracks in Beijing’s Defence Dreams

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here