पाकिस्तानने कारगिल युद्ध घडवून आणले :  नवाझ शरीफ यांची कबुली

0
पाकिस्तानने

“पाकिस्तानने 28 मे 1998 रोजी पाच आण्विक चाचण्या केल्या. त्यानंतर वाजपेयी सत्तेत आले आणि त्यांनी आमच्याशी करार केला. पण आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले. ती आमची चूक होती.”

फेब्रुवारी 1999 मध्ये त्यांनी आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या लाहोर जाहीरनाम्याच्या संदर्भात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही कबूली दिली आहे.

कारगिलमधील पाकिस्तानच्या दुष्कृत्यांची नवाज शरीफ यांनी दिलेली ही पहिलीच कबुली आहे का? अर्थात त्यांनी दिलेली माहिती पूर्णतः अचूक असल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यांनी खरेतर यापूर्वी सार्वजनिकरित्या तसेच खाजगीरित्या कारगिलबद्दल बरेच काही सांगितले आहे.

इस्लामाबादमधील भारताचे माजी उच्चायुक्त शरत सभरवाल यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलशी बोलताना सांगितले की, शरीफ यांना हे समजले होते की ‘भारताविषयीच्या भीती’ मुळेच पाकिस्तानी सैन्य त्या देशातील राजकारणावर वर्चस्व गाजवू शकले.

कारगिल युद्ध त्यांचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आपल्याला अंधारात ठेवून केले होते, असे शरीफ यांनी आपल्याला खाजगीरित्या सांगितल्याचे सभरवाल यांनी सांगितले. “पण मला वाटते की त्यांना आणखी काहीतरी अधिक माहीत होते, अर्थात त्याचा तपशील कदाचित माहित नसला तरी,” असेही सभरवाल यांनी स्पष्ट केले.

शरीफ यांनी 2013च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांना वेगळा सल्ला देऊनही भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या बाजूने प्रचार केला होता.
“सहकाऱ्यांनी सल्ला दिला होता की भारताबद्दल बोलू नका त्यामुळे आपण काही मते गमावू शकतो. पण असे न केल्यानेच आपण काही अतिरिक्त मते जिंकली आहेत असा शरीफ यांना विश्वास होता”, असे सभरवाल आठवणींना उजाळा देत म्हणाले. “शरीफ एका व्यावसायिकाप्रमाणे प्रतिक्रिया देत नव्हते, तर समाजाचे सखोल भान असलेला राजकारणी म्हणून प्रतिक्रिया देत होते.”

2018 आणि 2024च्या निवडणूक प्रचारादरम्यान शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत भाष्य केले.

शरीफ यांची बहुतेक मते त्यांची मुलगी मरियम हिच्याशी जुळतात, असे सभरवाल यांचे निरीक्षण आहे.  2013 मध्ये मरियमसोबत आपली भेट झाल्याचे सांगत सभरवाल यांनी सांगितले की भारत पाकिस्तान संबंध पुढे नेण्याची गरज असल्याचे मत तिनेही मांडले होते.

मरियमच्या राजकीय प्रवासाचा परिघ मोठा झाला असून सध्या ती पंजाबची मुख्यमंत्री आहे. शरीफ यांचा उत्तराधिकारी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

शरीफ यांचा धाकटा भाऊ शहबाज, जे पाकिस्तानी सैन्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे ओळखले जातात, त्यांना कदाचित शरीफ यांची ही मते मान्य नसतील. पण मोठा भाऊ हद्दपार असतानाच्या काळामध्येही हे भाऊ नेहमीच एकत्र असल्याचे बघायला मिळाले होते.

सूर्या गंगाधरन


Spread the love
Previous articleलष्कराकडून आंतरराष्ट्रीय शांतीदूतदिन साजरा
Next articleपाकिस्तानात अटकेत असलेल्या दोन भारतीय तरुणांची उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी घेतली भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here