ब्रिटनचे नवे संरक्षणमंत्री युक्रेन दौऱ्यावर

0
ब्रिटनचे
ब्रिटनचे नवे संरक्षणमंत्री जॉन हेली आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की (झेलेन्स्की यांच्या एक्स अकाउंटवरून साभार)

ब्रिटनचे नवे संरक्षणमंत्री जॉन हेली यांनी रविवारी युक्रेनला अधिक तोफा, दारूगोळा आणि क्षेपणास्त्रं  देण्याचे वचन दिले. दक्षिणेकडील ओडेसा शहरात अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ब्रिटनकडून युक्रेनला यानंतरही पाठिंबा देणे सुरूच राहिल असं आश्वासन दिलं.

ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी शुक्रवारी संरक्षणमंत्री म्हणून जॉन हेली यांची नियुक्ती केली. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आलेल्या हेली यांनी रशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे वारंवार लक्ष्य बनलेल्या ओडेसा या बंदर शहराला भेट दिली.

“सरकारमध्ये बदल झाला असेल, परंतु ब्रिटन युक्रेनच्यामागे खंबीरपणे उभा आहे,” असं ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हेली यांनी तोफा, दारूगोळ्याच्या 2 लाख 50 हजार राऊंडस्, डी-माइनिंग वाहने, लहान लष्करी नौका, क्षेपणास्त्रे आणि इतर साधनसामग्रीसह मदतीचे नवीन पॅकेज देण्याचे वचन दिले.

ओडेसा येथे जॉन हेली यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि संरक्षणमंत्री रुस्तम उमरोव्ह यांची भेट घेतली.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने आक्रमण केल्यापासून ब्रिटन हा युक्रेनच्या खंबीर समर्थकांपैकी एक आहे.

युक्रेनच्या नौदल दिनानिमित्त स्मारकावर हेली फुले वाहतानाचा व्हिडिओ झेलेन्स्की यांनी पोस्ट केला.

झेलेन्स्की यांनी सांगितले की त्यांनी हेली आणि डच संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकलमन्स-ज्यांनी गेल्याच आठवड्यात हे पद स्वीकारले आहे – यांना युद्धभूमीवरील परिस्थितीची माहिती देण्यात आली.

आठवड्याच्या शेवटी राजधानी कीवमध्ये, नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांनी “विलंब न करता” युक्रेनला एफ-16 लढाऊ विमाने पाठविण्याचे वचन दिले.
याशिवाय एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेले ब्रिटनचे एक मोठे मदत पॅकेज “पुढील 100 दिवसांत युक्रेनला पूर्ण वितरित केले जाईल,” असे ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

पाश्चिमात्य देशांकडून लष्करी मदत उशीरा मिळत असल्याबद्दल युक्रेन सातत्याने तक्रार करत असतो. ही लष्करी मदत रशियन आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या त्यांच्या सैन्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleTDF Scheme: Boosting Innovation And Atmanirbharta In Defence
Next articleचिनी शास्त्रज्ञांनी मंगळावर वाढू शकणाऱ्या ‘सुपर मॉस’ची ओळख पटवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here