उत्तर कोरियाने लष्करी परेडमध्ये, नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले

0

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी, परदेशी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य लष्करी परेडचे अध्यक्षत्व केले, ज्यामध्ये त्यांनी देशाच्या नवीन आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले, अशी माहिती कोरियाची शासकीय वृत्तसंस्था KCNA ने शनिवारी दिली.

शुक्रवारी उशिरा सुरू झालेल्या या परेडमध्ये, सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या स्थापनेचा 80वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी अन्य कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

वर्धापनदिनानिमित्त प्योंगयांगमध्ये आयोजित या कार्यक्रमात, चीनच्या पीपल्स रिपब्लिकचे प्रमुख ली कियांग, माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्या नेतृत्वाखालील रशियाचे शिष्टमंडळ तसेच व्हिएतनामचे कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख तो लाम या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता.

लष्करी परेडमध्ये, अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाने त्यांचे सर्वात प्रगत ‘ह्वासॉन्ग-20’ (Hwasong-20) हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रदर्शित केले, ज्याचे वर्णन KCNAने देशाची “सर्वात शक्तीशाली धोरणात्मक अण्वस्त्र प्रणाली” असे केले.

ह्वासॉन्ग मालिकेतील या नव्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रामुळे, उत्तर कोरियाला अमेरिकेच्या मुख्य भूमीवर कुठेही लक्ष्य साधण्याची क्षमता मिळाली आहे, परंतु लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गदर्शन प्रणालीची सूक्ष्मता आणि त्यातील वार्हेडची वातावरणात पुनःप्रवेश सहन करण्याची क्षमता, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहेत.

लांब पल्ल्याचे आण्विक क्षेपणास्त्र

“ह्वासॉन्ग-20 हे उत्तर कोरियाच्या, लांब पल्ल्याच्या आण्विक वितरण क्षमतांसंबंधी महत्त्वाकांक्षांचे प्रतीक आहे. “वर्षाअखेरीपर्यंत या क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी होईल, अशी आपण अपेक्षा करु शकतो,” असे यूएस-स्थित कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसच्या अंकित पांडा यांनी म्हटले.

“ही प्रणाली मल्टी-वार्हेड्सच्या वितरणासाठी डिझाइन केली असण्याची शक्यता आहे. मल्टी-वार्हेडमुळे विद्यमान अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींवरील ताण वाढेल आणि वॉशिंग्टनविरुद्ध अर्थपूर्ण प्रतिबंधात्मक प्रभाव साध्य करण्याची किम जोंग यांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण होण्यास मदत होईल,” असेही ते म्हणाले.

KCNA ने दिलेल्या वृत्तानुसार, लष्करी परेडमध्ये, किम जोंग यांनी आपल्या भाषणात, परदेशातील कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर कोरियाच्या लष्कराप्रति आपले “प्रेमळ प्रोत्साहन” व्यक्त केले, तसेच सांगितले की, “त्यांच्या सैन्याचा पराक्रम केवळ उत्तर कोरियाच्या संरक्षणापुरता दिसणार नाही, तर “समाजवादी उभारणीच्या चौकटीतही तो दिसेल.”

“आमच्या सैन्याने सर्व धोके नष्ट करणाऱ्या अजेय प्रवासात अशीच वाढ सुरू ठेवली पाहिजे,” असेही ते यावेळी म्हणाले.

शुक्रवारी, किम यांनी राष्ट्रपती मेदवेदेव यांच्याबरोबर चर्चा देखील केली, ज्यात त्यांनी म्हटले की “युक्रेनमधील त्यांच्या लष्करी मोहिमेत रशियासाठी लढणाऱ्या, उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या बलिदानामुळे दोन देशांमधील परस्पर संबंधांवरचा विश्वास सिद्ध झाला आहे.”

KCNA च्या म्हणण्यानुसार, किम यांनी मेदवेदेव यांना सांगितले की, “ते रशियासोबतचे सहकार्य पुढे नेण्यासाठी आणि सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, विविध देवाणघेवाणी करण्याची आशा व्यक्त करतात.” 

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीन: तरुण पीएलए सैनिक तिबेटमध्ये सेवा देण्यास अनुत्सुक
Next articleचीनची बाजारपेठेवरील पकड घट्ट, शी यांच्याशी होणारी भेट ट्रम्प यांच्याकडून रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here