पाकिस्तानविरुद्धच्या ‘ग्रे झोन’ मध्ये, भारताची बुद्धिबळाची खेळी: लष्करप्रमुख

0
ग्रे झोन
IIT मद्रास येथे बोलताना, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत काही नवे तपशील उघड केले आहेत. त्यांनी या ऑपरेशनचे वर्णन – पाकिस्तानविरुद्धच्या ‘ग्रे झोन’ मधील (युद्धाच्या अगदी जवळचा पण थेट नसलेला संघर्ष) भारताची धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण ‘खेळी’ असे केले आहे. 22 एप्रिल रोजी, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सशस्त्र दलांना निर्णायक कारवाई करण्यासाठी सरकारने ‘पूर्ण स्वातंत्र्य’ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

IIT मद्रास येथे ‘अग्निशोध’ (Agnishodh), या भारतीय लष्कराच्या संशोधन कक्षाचे (IARC) उद्घाटन करताना जनरल द्विवेदी यांनी या महत्त्वपूर्ण वळणाची आठवण करून दिली.

ते म्हणाले, “२३ एप्रिल रोजी, दुसऱ्याच दिवशी, आम्ही सर्वजण एकत्र बसलो. त्यावेळी संरक्षण मंत्री (राजनाथ सिंह) पहिल्यांदाच म्हणाले होते की, ‘आता खूप झाले.’ त्यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुखांना स्पष्ट झाले होते की काहीतरी करणे आवश्यक आहे.”

“राजकीय नेतृत्वाकडून मिळालेल्या या स्पष्टतेमुळे, सैन्याचे मनोधैर्य वाढले आणि थिएटर कमांडरना (theater commanders) कार्यात्मक स्वायत्ततेने (operational autonomy) काम करण्याचे बळ मिळाले,” असेही त्यांनी पुढे सांगितले.

7 मे रोजी, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले आणि दहशतवादी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.

जनरल द्विवेदी यांनी, त्यानंतर झालेल्या लष्करी संघर्षाची तुलना ‘ग्रे झोन’ मधील बुद्धिबळाच्या खेळाशी केली. हा ‘ग्रे झोन’ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाच्या अगदी जवळची परिस्थिती असते.

“शत्रूची पुढची त्यांची चाल काय असेल, हे आम्हाला माहीत नव्हते आणि आमची चाल काय असेल हे त्यांना माहीत नव्हते. आम्ही बुद्धिबळाच्या चाली खेळत होतो. काही ठिकाणी त्यांना शह देत होतो, तर काही ठिकाणी स्वतःच्या नुकसानीचा धोका पत्करूनही शत्रूचा खात्मा करत होतो. जीवन असेच असते,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या युद्धानंतरच्या भूमिकेची खिल्लीही उडवली.

“जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला विचारले की, तुम्ही हरलात की जिंकलात, तर तो म्हणेल, ‘माझ्या प्रमुखांना आता ‘फिल्ड मार्शल’ बनवण्यात आले आहे. याचा अर्थ आम्ही जिंकलो असणार, म्हणूनच त्यांना बढती मिळाली आहे,” असा टोला लगावत, जनरल द्विवेदी यांनी आधुनिक युद्धात माहितीच्या व्यवस्थापनाची (narrative management) भूमिका किती महत्त्वाची असते हे स्पष्ट केले.

हवाई दल प्रमुख- एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील अभूतपूर्व हवाई यशाची माहिती दिल्यानंतर काही तासांनी, लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य आले.

बंगळुरू येथे, 16 व्या एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना, हवाई दल प्रमुखांनी पुष्टी केली की, भारताने पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान, बहुधा AEW&C (हवाई चेतावणी आणि नियंत्रण) प्लॅटफॉर्म पाडले. हे भारताच्या इतिहासातील पृष्ठभागावरून हवेत मारा करून मिळवलेले सर्वात मोठे यश आहे.

ते म्हणाले की, “आम्ही कमीत कमी पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान 300 किलोमीटरच्या अंतरावर पाडल्याची पुष्टी करतो. हे पृष्ठभागावरून हवेत मारा करून मिळवलेले सर्वात मोठे यश आहे, ज्याबद्दल आम्ही बोलू शकतो.”

या हल्ल्यांना तीन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर, पाकिस्तानला झालेल्या नुकसानीचे हे पहिले अधिकृत तपशील आहेत.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleदेशात लवकरच दोन नवीन ‘संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर’ उभारले जाणार
Next articleAustralian Army Chief in Delhi, Focus on Defence Alumni Diplomacy Ahead of Quad Summit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here