उत्तर कोरियाविरोधात ‘अधिक मर्यादित’ भूमिका घेतली जाईल; पेंटागॉनचा अंदाज

0
पेंटागॉनचा


शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका धोरणात्मक दस्तऐवजांनुसार, उत्तर कोरियाला रोखण्यासाठी आपली भूमिका “अधिक मर्यादित” असेल असा अंदाज पेंटागॉनने वर्तवला आहे. सैनिकांच्या दृष्टीने बाबतीत दक्षिण कोरियाने मुख्य जबाबदारी घ्यावी असे या दस्तऐवजात नमूद करण्यात आले असून; या हालचालीमुळे कोरियन द्वीपकल्पावर तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरियाच्या लष्करी धोक्याविरुद्ध संयुक्त संरक्षणासाठी, दक्षिण कोरियामध्ये सुमारे 28,500 अमेरिकन सैनिक तैनात आहेत आणि सिओलने या वर्षासाठी आपल्या संरक्षण बजेटमध्ये 7.5 टक्क्यांनी वाढ केली आहे.

पेंटागॉनने आपल्या धोरणांना दिशा देणाऱ्या 25 पानी ‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी’ नामक दस्तऐवजात म्हटले आहे की, “दक्षिण कोरिया, अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण परंतु अधिक मर्यादित समर्थनासह उत्तर कोरियाला रोखण्याची प्राथमिक जबाबदारी घेण्यास सक्षम आहे.”

“जबाबदारीच्या संतुलनातील हा बदल कोरियन द्वीपकल्पातील अमेरिकन सैन्याची स्थिती अद्ययावत करण्याच्या अमेरिकेच्या हिताशी सुसंगत आहे.”

अमेरिकेच्या गृह सुरक्षेवर लक्ष केंद्रित

अलिकडच्या वर्षांत, अमेरिकन अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरियातील अमेरिकन सैन्याला अधिक लवचिक बनवण्याची इच्छा दर्शविली आहे, जेणेकरून तैवानचे संरक्षण करणे आणि चीनच्या वाढत्या लष्करी प्रभावाला रोखणे यांसारख्या व्यापक धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी ते कोरियन द्वीपकल्पाच्या बाहेरून संभाव्यपणे कार्य करू शकतील.

दक्षिण कोरियाने अमेरिकन सैन्याची भूमिका बदलण्याच्या कल्पनेला विरोध केला आहे, परंतु गेल्या 20 वर्षांत त्यांनी आपली संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी काम केले आहे, ज्याचे उद्दिष्ट अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलांचे युद्धकाळातील कमांड स्वतःकडे घेण्यास सक्षम असणे हे आहे. दक्षिण कोरियाकडे 4,50,000 सैनिक आहेत.

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात तळ ठोकून असलेले अमेरिकन सैन्य हे त्या युतीचा “गाभा” आहे, ज्याने उत्तर कोरियाचे आक्रमण रोखले आहे आणि द्वीपकल्पावर तसेच या प्रदेशात शांतता सुनिश्चित केली आहे.

“आम्ही त्याच दिशेने विकास सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेसोबत जवळून सहकार्य करत राहू,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

उत्तर कोरिया नियमितपणे दक्षिण कोरियातील अमेरिकन लष्करी उपस्थिती आणि संयुक्त सरावांवर टीका करत असतो. हे सराव संरक्षणात्मक असल्याचे मित्रदेश सांगतात, मात्र प्योंगयांग त्यांना वॉशिंग्टनच्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षांमधून प्रेरित, आपल्याविरुद्ध आक्रमणाची रंगीत तालीम असल्याचे म्हणतो.

चिनी वर्चस्व नको

पेंटागॉनचे उच्च धोरण अधिकारी एलब्रिज कोल्बी, पुढील आठवड्यात आशिया दौऱ्यावर जाणार असून ते दक्षिण कोरियाला भेट देण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली.

प्रत्येक नवीन प्रशासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या या व्यापक दस्तऐवजात म्हटले आहे की, पेंटागॉनचे प्राधान्य मायभूमीचे संरक्षण करणे हे आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात, पेंटागॉन हे सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे की,अमेरिका किंवा अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर चीन वर्चस्व गाजवू शकणार नाही, असे या दस्तऐवजात नमूद केले आहे.

“यासाठी सत्तापालट किंवा इतर कोणत्याही अस्तित्वाच्या संघर्षाची आवश्यकता नाही. त्याउलट, अमेरिकन लोकांच्या हिताला पोषक आणि चीनलाही स्वीकारता येईल असा सन्माननीय शांततेचा मार्ग शक्य आहे,” असे दस्तऐवजात म्हटले आहे. यात तैवानचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही.

चीन तैवानला अमेरिकेसोबतच्या संबंधांतील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा मानतो. लोकशाही पद्धतीने शासित तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करतो आणि बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर नाकारलेला नाही. तैवान मात्र बीजिंगचे सार्वभौमत्वाचे दावे फेटाळतो आणि आपल्या भवितव्याचा निर्णय केवळ तैवानचे लोकच घेऊ शकतात, असे सांगतो.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने वारंवार म्हटले आहे की, “तैवान प्रश्नाचे” निराकरण करणे ही चीनची अंतर्गत बाब आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleदावोस: ‘एआय’ (AI) मंत्राचा वाढता प्रभाव, नोकरी कपातीची भीती ओसरली
Next articleबांगलादेश निवडणुकांपूर्वी हसीना यांचा युनूस यांच्यावर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here