AI Crash प्राथमिक अहवाल: कॉकपिटमधील इंजिन स्विचबाबतचा गोंधळ उघड

0
AI Crash

मागील महिन्यात, अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात, 260 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघात तपासणीचा प्राथमिक अहवाल नुकताच समोर आला असून, त्यातून अपघाताच्या काही क्षणांपूर्वी फ्लाइट क्रूमध्ये गोंधळ झाल्याचे संकेत मिळाले आहेत. अहवालानुसार, विमानाच्या इंजिन फ्युएल कटऑफ स्विचेस जवळपास एकाचवेळी सक्रिय झाले, ज्यामुळे इंजिनला होणारा इंधनपुरवठा थांबला आणि अपघात झाला.

12 जून रोजी, अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाने, उड्डाणानंतर लगेचच आपली उंची गमवायला सुरुवात केली आणि काही क्षणात ते कोसळले, असे भारताच्या ‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने’ शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अपघात गेल्या दशकातील जगातील सर्वात मोठा हवाई दुर्घटना मानला जातो.

या दुर्घटनेच्या प्राथमिक अहवालात, इंजिनमधील इंधन कटऑफ स्विचच्या स्थितीवर नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत, तर बोईंग आणि इंजिन निर्माता GE ची या अपघातासाठी कोणतीही स्पष्ट जबाबदारी नसल्याचे सूचित केले आहे.

या अपघातामुळे टाटा समूहासाठी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यांनी 2022 मध्ये, सरकारकडून एअर इंडिया कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा आणि नवीन विमाने विकत घेण्याचा धडाका लावला आहे.

इंधन स्विचेसमध्ये बिघाड?

CCTV फुटेजनुसार, विमानाने उड्डाण करताच लगेच ‘रॅम एअर टर्बाइन’ने आपोआप काम करायला सुरुवात केली, याचा अर्थ मूळ इंजिनने आपली पॉवर गमावली होती.

अहवालानुसार, शेवटच्या क्षणी, एका पायलटने कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर दुसऱ्या पायलटला विचारले:
“तू इंधन का कट केलेस?”
त्यावर दुसऱ्या पायलटने उत्तर दिले की “त्याने ते केले नव्हते.”

यांपैकी कुठले संवाद कॅप्टनचे होते आणि कुठले फर्स्ट ऑफिसरचे, किंवा अपघाताच्या आधी “Mayday, Mayday, Mayday” संदेश कोणत्या पायलटने पाठवला होता, हे अहवालात स्पष्ट केलेले नाही.

विमानाचे मुख्य पायलट सुमीत सभरवाल (वय 56) यांना एकूण 15,638 तासांचा अनुभव होता आणि ते एअर इंडियाचे प्रशिक्षक देखील होते. तर, सह-पायलट क्लाईव्ह कुंदर (वय 32) यांचा 3,403 तासांचा एकूण अनुभव होता.

उड्डाणानंतर कटऑफ स्विचेस लगेचच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ स्थानावर गेले. अहवालात मात्र हे स्पष्ट केलेले नाही की. स्विचेसने स्वतःहून ही स्थिती कशी घेतली.

तज्ज्ञांचे मत आहे की पायलटकडून चुकून हे स्विच हलणे शक्य नाही.

“जर पायलटने हे स्विच हलवले असतील, तर त्यांनी असे का केले?” असा प्रश्न, अमेरिकन हवाई सुरक्षा तज्ज्ञ अँथनी ब्रिकहाऊस यांनी उपस्थित केला आहे.

तज्ञ जॉन नान्स यांच्या मते, ‘दोन्ही स्विच एक सेकंदाच्याच फरकाने बदलले, ज्याचा अर्थ ते जाणीवपूर्वक एकामागोमाग एक हलवले गेले असावेत. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, उड्डाणाच्या सुरुवातीला स्विचेस बंद करणे अतिशय असामान्य आहे.’

अहवालात कोणतीही आणीबाणी नमूद नाही

‘कटऑफ’ मोडमध्ये स्विच गेल्यावर इंजिन लगेच बंद होतात. ही स्थिती विमान गेटवर पोहोचल्यावर किंवा आपत्कालीन प्रसंगी (जसे की इंजिनमध्ये आग लागल्यास) वापरली जाते. मात्र, अहवालात अशी कोणतीही आणीबाणी झाली होती, असे स्पष्ट केलेले नाही.

अपघाताच्या स्थळी, दोन्ही स्विच ‘रन’ मोडमध्ये सापडले आणि इंजिन पुन्हा सुरू होण्याच्या काही खुणाही दिसून आल्या, पण विमान त्या वेळी खूपच कमी उंचीवर होते.

एअर इंडियाने या अहवालाची दखल घेतली असून, तपास यंत्रणांना सहकार्य सुरू असल्याचे निवेदनात म्हटले, मात्र अधिक भाष्य करण्यास टाळले.

अमेरिकेच्या राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाने (NTSB), भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि हेही स्पष्ट केले की, या अहवालात बोईंग 787 किंवा GE इंजिन वापरणाऱ्या विमान कंपन्यांसाठी कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही.

अमेरिकेच्या FAA (Federal Aviation Administration) ने सांगितले की, “तथ्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील आणि जोखमींचा सामना तात्काळ केला जाईल.”

बोईंग कंपनीने म्हटले की, ‘ती तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. GE Aerospace कडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.’

अपघाताचा तपास

भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत AAIB ही संस्था या अपघाताचा तपास करत आहे. अपघातात विमानातील २४२ पैकी फक्त एक व्यक्ती वाचली, तर जमिनीवरचे १९ जणही मृत्युमुखी पडले.

बहुतेक अपघात हे अनेक कारणांमुळे होतात. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्राथमिक अहवाल ३० दिवसांत, आणि अंतिम अहवाल एका वर्षाच्या आत प्रसिद्ध होतो.

विमानाचे ब्लॅक बॉक्स – कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर – अपघातानंतर काही दिवसांत मिळवले गेले आणि भारतात त्यांचा डेटा डाउनलोड करण्यात आला.

ब्लॅक बॉक्सद्वारे उंची, वेग, अंतिम संभाषण इत्यादी तपशील मिळतात, ज्यामुळे अपघाताचं मूळ कारण शोधण्यात मदत होते.

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने, एअर इंडियाच्या बजेट फ्लाइट सेवा एअर इंडिया एक्सप्रेसवर तपास सुरू केला आहे. कारण कंपनीने A320 विमानांचे इंजिन पार्ट वेळेत बदलले नाहीत आणि दस्तऐवजांत चुकीची माहिती दिल्याचं आढळले.

भारताच्या विमानवाहतूक नियामक संस्थेनेही एअर इंडियाला तीन एअरबस विमानांबाबत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा दिला आहे, आणि पायलट ड्युटी वेळेबाबतही गंभीर तक्रारी केल्या आहेत.

सरकार भारतात हवाई वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास व्यक्त करत आहे आणि दुबईप्रमाणे भारतही जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याचा निर्धार करत आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या सहकार्याने)

+ posts
Previous articleरशियन हल्ल्याचा खार्किवच्या प्रसूती रुग्णालयाला तडाखा, रुग्णांची पळापळ
Next articleIndia Strengthens Naval Ties with Greece Amid Rising Tensions in the Region

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here