अमेरिका, युक्रेन, रशिया शांतता कराराच्या जवळ पोहचले आहेत: दिमित्रीव्ह

0

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी शुक्रवारी असा दावा केला की, ‘रशिया, अमेरिका आणि युक्रेन हे देश युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यासाठी राजकीय तोडगा काढण्याच्या निर्णयाजवळ पोहचले आहेत.’ दिमित्रीव्ह हे पुतिन यांच्या गुंतवणूका आणि आर्थिक बाबी सांभाळणारे दूत आहेत. 

अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचल्यानंतर, सीएनएन वृत्तसंस्थेशी बोलताना दिमित्रीव्ह म्हणाले की, “अमेरिकेच्या अध्यक्षांनी वर्णन केल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठक रद्द झालेली नाही आणि दोन्ही नेते पुढील तारखेला भेटतील अशी शक्यता आहे.”

रशियाने तात्काळ युद्धबंदी नाकारल्याने, वाटाघाटींच्या प्रयत्नांमध्ये अनिश्चितता पसरली, आणि त्यामुळे मंगळवारी नियोजित शिखर परिषद स्थगित करण्यात आली. युद्ध संपवण्याच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये प्रगतीचा अभाव आणि वेळेची कमतरता जाणवल्यामुळे, बुडापेस्टमध्ये पुतिन यांच्यासोबतची नियोजित बैठक रद्द केल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.

तथापि, दिमित्रीव्ह यांनी सांगितले की, “मला वाटते की रशिया, अमेरिका आणि युक्रेन प्रत्यक्षात राजनैतिक तोडग्याच्या अगदी जवळ आहेत.”

मात्र त्यांनी याबाबत अधिक खोलात जाऊन बोलणे टाळले.

युद्धबंदीसाठी नवीन प्रस्ताव

युरोपीयन राष्ट्रे युक्रेनसोबत, सध्याच्या संघर्षरेषांवर युद्धविराम  करण्यासाठी एका नवीन प्रस्तावावर काम करत आहेत, ज्यात अमेरिकेला मध्यवर्ती भूमिकेत ठेवण्याचा दबाव आहे.

दिमित्रीव्ह म्हणाले की, “राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी हे मान्य केले आहे की, हा विषय मुख्यत: संघर्षरेषेसाठीच आहे, मात्र त्यांची पूर्वीची भूमिका मात्र अशी होती की रशियाने पूर्णपणे इथून मघार घ्यावी. म्हणून मला वाटते की, आपण एका राजनैतिक तोडग्याच्या अगदी जवळ येऊन पोहचलो आहोत, जो फायदेशीर ठरू शकतो.”

रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये, युक्रेनवर मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू केले.

ट्रम्प यांनी मागील आठवड्यात जाहीर केले की, ते आणि पुतिन लवकरच हंगेरीमध्ये भेटणार आहेत, जिथे ते युद्ध समाप्त करण्याचा प्रयत्नांवर चर्चा करतील. मात्र, पुतिन तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसते. रशियाने मागणी केली आहे की, युक्रेनने कोणत्याही तात्पुरत्या शांततेपूर्वी अधिक भूभाग रशियाला सोपवावा.

दिमित्रीव्ह यांची अमेरिकेची भेट, ही आधीपासून नियोजित होती. या भेटीदरम्यान, अमेरिकेने दोन रशियन मोठ्या तेल कंपन्यांवर नव्या निर्बंधांची घोषणा केली असून, हा निर्णय पुतिन याच्यांवर युद्ध समाप्तीसाठी दबाव आणण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे.

“या निर्णयानंतरही, रशिया आणि अमेरिकेतील संवाद सुरू राहील,” असे दिमित्रीव्ह म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, की “तोडगा निघणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा रशियाच्या हितांचा विचार केला जाईल आणि त्यांचा सन्मान केला जाईल.”

दिमित्रीव्ह यांनी भेटीदरम्यान, ते अन्य कुणाची भेट घेणार आहेत, हे सांगितले नाही. त्यांनी अमेरिकेचे तेलावरील निर्बंध अपयशी ठरतील असे केवळ भाकीत केले.

“अमेरिकेच्या या निर्णयामुळे फक्त अमेरिकन पेट्रोल पंपांवर गॅसच्या किंमत वाढतील,” असे ते म्हणाले.

अमेरिकन वृत्तसंस्थेचे आउटलेट ‘अॅक्सिओस’ने सांगितले की, ‘दिमित्रीव्ह ट्रम्प यांचे खास प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांची शनिवारी मियामी येथे भेट घेणार आहेत.’ तर, रशियन स्टेट न्यूज एजन्सी ‘तास्स’ने दिमित्रीव्ह यांचा उल्लेख करत सांगितले की, ‘ते अजून काही व्यक्तींचीही भेट घेतील’, परंतु, त्यांची नावे त्यांनी उघड केली नाहीत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसंयुक्त राष्ट्र महासचिवपदासाठी, खुल्या जागतिक निवडीचा अमेरिकेचा प्रस्ताव
Next articleIndia Set to Launch GSAT-7R: New Military Satellite to Boost Maritime Security

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here