Armed Forces Flag Day : का साजरा होतो हा खास दिवस?

0
Armed

आज ७ डिसेंबर म्हणजे ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ (Armed Forces Flag Day). या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला सलाम एक खास पोस्ट ‘X’ (ट्विटर) द्वारे शेअर केली.

X वरील पोस्टद्वारे PM Modi म्हणतात:

“सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला सलाम करण्याचा दिवस. देशाच्या वीर सैनिकांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देते, त्यांचे बलिदान आपल्याला नम्र करते आणि त्यांचे समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवते.’’ या पोस्टद्वारे पंतप्रधान मोदीजींनी ‘सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त जमा करण्यात येणाऱ्या निधीतही आपले योगदान देऊया’, असे आवाहान देशातील जनतेला केले आहे.


पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारत रक्षा मंत्रालयानेही भारतीय जनतेला ‘सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात’, सढळ हस्ते योगदान करण्याचे आवाहन केले आहे. संरक्षण मंत्रायलाकडून याबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनात ते म्हणतात की “आमच्या तिनही दलातील सेवारत सैनिक आणि निवृत्त सैनिकांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण सुनिश्चित करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकलनामध्ये भारतीयांच्या नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने योगदान करावे अशी आम्ही विनंती करतो.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, लोकांना पुढे येऊन सशस्त्र सेना ध्वज दिन (AFFD) निधीसाठी सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन केले आहे. आज ७ डिसेंबर रोजी ‘AFFD’ च्या निमित्ताने X वर प्रदर्शित करण्यात व्हिडिओ संदेशात, सिंह यांनी या दिवसाचे वर्णन करताना तसेच जनतेला आवाहन करताना म्हटले आहे की, ‘सैनिकांचे अतुलनीय धैर्य, त्यांचा त्याग आणि समर्पण ओळखण्याची आणि त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी एकजूट होण्याची ही एक चांगली संधी आहे.’’

ते पुढे म्हणतात की, “आमच्या तिनही दलातील सशस्त्र सेना ही भारताचे अभेद्य सुरक्षा कवच म्हणून काम करते, कितीही बिकट परिस्थिती असली तरी देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असते. केवळ शत्रूकडून उद्भवणारे धोकेच नाही तर नैसर्गिक संकटांमध्येही देशाचे, देशवासीयांचे संरक्षण करण्यासाठी जी पाय रोवून उभी असते, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देते अशा आमच्या सर्व सेना दलांची आणि त्यातील प्रत्येक सैनिकाची कथा ही सर्व भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,”

यावेळी माजी सैनिकांच्या कल्याणाबाबत सरकारच्या वचनबद्धतेविषयी बोलताना, सिंह म्हणाले की, ‘’भारतीय सैन्यातील आजी (सेवेत असलेले) आणि माजी (निवृत्त) सैनिक तसेच दिवंगत सैनिकांचे कुटुंब यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकार नेहमीच प्रयत्नशील असते आणि कायम राहील. मात्र त्या सोबतच भारताच्या सुजाण नागरिकांनी सैनिकांप्रती असलेला त्यांचा आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी स्वत:हून पुढे यावे आणि या निधी संकलनात योगदान द्यावे’’, असे आवाहन त्यांनी संदेशाद्वारे केले. ‘आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी शंभर हातांनी कमावणे आणि हजार हातांनी दान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’, असेही सिंह यावेळी म्हणाले.

सशस्त्र सेना ध्वज दिन का साजरा होतो?

प्रतिवर्षी ७ डिसेंबर रोजी, भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा, साहसाचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या धैर्याचा सन्मान करण्यासाठी- ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ (Armed Forces Flag Day) साजरा केला जातो. त्यासोबतच देशवासीयांच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, भारतीय सेनेत आपले योगदान देऊन निवृत्त झालेल्या जवानांसाठी आणि देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी निधी उभारण्याच्या उदात्त हेतूने देखील आजचा हा ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ साजरा केला जातो.

संकलन, अनुवाद – वेद बर्वे


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here