देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रविवारपासून दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आणि भारत या दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या दृष्टीने तसेच अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा करण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे.
येत्या १० डिसेंबरला मॉस्कोमध्ये रशियन संरक्षणमंत्री आंद्रे बेलोसोव्ह आणि राजनाथ सिंह यांच्यामध्ये एक बैठक होणार आहे. भारत आणि रशिया यांच्यातील ‘आंतर-सरकारी कमिशन ऑन मिलिटरी अँड मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन’ (IRIGC-M&MTC) ची ही २१ वी बैठक असणार आहे. ही बैठक या दौऱ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण असेल.
या दौऱ्याचे आणखी एक प्रयोजन म्हणजे, सध्या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संरक्षण प्रकल्पांबाबत तसंच S-400 प्रणालीच्या उर्वरित दोन युनिट्सच्या वितरणाबाबत चर्चा होणार आहे. भारताच्या संरक्षण शस्त्रागाराचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या ‘S-400 ट्रायम्फ’ या प्रगत क्षेपणास्त्राच्या संरक्षण प्रणालीच्या वितरणास गती देण्याच्या उद्देशाने या भेटीसाठी भारताने रशियाला विनंती केली होती. त्याच धर्तीवर आता ही विशेष भेट होणार आहे.
२०१८ मध्ये ‘S-400 ट्रायम्फ’ क्षेपणास्त्राच्या खरेदी कराराला प्रस्ताव पूर्ण झाला होता. ज्याची तीन युनिट्स याआधीच वितरित केली गेली आहेत. भारताच्या धोरणात्मक संरक्षण सज्जतेसाठी उर्वरित सर्व युनिट्स वेळेवर वितरीत व्हावीत, या दृष्टीने या भेटीदरम्यान चर्चा केली जाईल.
INS Tushil च्या स्वागतासाठी भारत सज्ज
राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्याचे आणखी एक खास कारण आहे. ९ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाच्या सर्वात नवीन मल्टीरोल स्टेल्थ-गाइडेड मिसाईल फ्रिगेट असलेले ‘INS तुशील’चे रशियाकडून हस्तांतरण होणार आहेत. रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील शिपयार्डमध्ये ‘INS तुशील’ची निर्मीती करण्यात आली असून त्याचं भारतीय नौदलात सामील होणं, ही नौदलाच्या कक्षा आणि क्षमता रुंदीकरणासाठी खूप महत्वाची बाब ठरणार आहे. सोबतच भविष्यात दोन्ही देशातील संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीकोनातूनही हा खूप मोठा टप्पा असणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी देखील या हस्तांतरण समारंभात सामील होणार आहेत.
India आणि Russia या दोन्ही देशातील लष्करी संबंध मजबूत करण्याविषयी या चर्चा करण्यासोबतच, या कार्यक्रमामध्ये सिंग मॉस्कोतील अज्ञात सैनिकांच्या प्रतिष्ठित समाधीवर सोव्हिएत सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाईल. तसेच Rajnath Singh यावेळी रशियामधील भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि दोन्ही देशातील परस्पर संबंध दृढ करण्याबाबत आपले मत मांडतील.
संरक्षण मंत्री (Defence Minister of of India) राजनाथ सिंह यांचा हा दौरा, भारताचे रशियासोबतचे संरक्षणात्मक आणि धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी तसेत दोन्हीकडील सशस्त्र नौदलांचे निरंतर आधुनिकीकरण सुनिश्चित करण्यासाठी आणि दोन्ही देशातील लष्करी व औद्योगिक क्षेत्रांमधील संबंध भविष्याच्या दृष्टीने अधिक मजबूत करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
टीम भारतशक्ती
अनुवाद – वेद बर्वे