रशियन हल्ल्याचा खार्किवच्या प्रसूती रुग्णालयाला तडाखा, रुग्णांची पळापळ

0

शुक्रवारी, युक्रेनच्या खार्किव शहरावर झालेल्या रशियन ड्रोन हल्ल्याचा तडाखा एका प्रसूती रुग्णालयाला बसला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. या जोरदार हल्ल्यात रुग्णालयाच्या काचा फुटल्या आणि तिचे तुकडे थेट रुग्णांच्या खाटांवर पडले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नवजात बाळांना वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पळापळ सुरु केली.

खार्किवमधील प्रादेशिक अभियोजकांच्या माहितीनुसार, तीन महिला आणि तीन नवजात बाळांना या हल्ल्यामुळे तीव्र मानसिक धक्का बसला असून, त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले.

नुकतेच बाळंतपण झालेल्या ओलेक्सांद्रा लाव्रिनेनको या महिलेने सांगितले की, “झोपेतून उठल्यावर आम्हाला एक खूप मोठा शिट्टीसारखा आवाज ऐकू आला, मी आणि नवरा धावतच आमच्या बाळाकडे गेलो आणि त्याच क्षणी एक भयंतर स्फोट झाला आणि खिडक्यांच्या काचा फुटून सर्वदूर पसरल्या.”

त्यांनतर त्यांनी आपल्या एक दिवसाच्या बाळाला- मॅक्सिमला घेऊन ताबडतोब भूमिगत बंकरमध्ये आसरा घेतला.

लाव्रिनेनको म्हणाल्या की, “तो खूपच भीतीदायक क्षण होता. अ‍ॅड्रेनालिन इतके वाढले होते की माझ्या नुकत्याच शस्त्रक्रियेचे दुखणेही त्यावेळी विसरले होते. आता हळूहळू मी या धक्क्यातून सावरते आहे.”

“सध्या सुरु असलेल्या तणावपूर्ण परस्थितीत, प्रसूती होणे देखील खूप अवघड आणि भीतीदायक झाले आहे,” असेही त्या म्हणाल्या.

रुग्णालयाच्या फर्शीवर आणि खाटांवर काचांचे तुकडे पडले होते, त्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांना तातडीने स्थलांतरित होण्याशिवाय पर्यात नव्हता.

रशियन हवाई हल्ल्यांचा वाढता जोर 

डॉक्टर ओलेक्सांद्र कोंद्रियात्स्की यांनी सांगितले की, “हल्ल्यामुळे इमारतीचा तो भाग नुकसानग्रस्त झाला आहे, जिथे प्रसूती आणि शस्त्रक्रियेच्या खोल्या होत्या.”

“कर्मचारी आणि सर्व महिलांवर मोठा मानसिक ताण आला असून, काही महिलांचे अगदी थोड्या दिवसांपूर्वीच बाळंतपण झाले होते,” अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनवरील हवाई हल्ल्यांचा जोर वाढवला असून, युक्रेनभर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत.

रशियाने 2022 मध्ये, पूर्ण ताकदनीशी आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहर असलेल्या खार्किवला सातत्याने लक्ष्य केले आहे. हे शहर देशाच्या ईशान्य भागात आहे.

या हल्ल्यात, खार्किवमध्ये 9 जण जखमी झाले असून एका इमारतीचेही नुकसान झाले आहे. प्रादेशिक राज्यपाल ओलेह सिनीहुबोव्ह यांच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत विविध रशियन हल्ल्यांमुळे एक व्यक्ती ठार झाली आहे तर, किमान पाच जण जखमी झाले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प प्रशासनाने परराष्ट्र खात्याच्या पुनर्रचनेत 1 हजार 350 कर्मचाऱ्यांना कमी केले
Next articleAI Crash प्राथमिक अहवाल: कॉकपिटमधील इंजिन स्विचबाबतचा गोंधळ उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here