पारंपरिक पद्धतीने सुरू असणारी दोन युद्धे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये प्रचंड रक्तरंजित कथांना जन्म देत आहेत. युक्रेन युद्धाला जवळपास दोन वर्षं होत आली आहेत, तर गाझामधील युद्ध सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. एक हजार मैलांपेक्षा जास्त अंतरावर सुरू असलेली आणि आता चिघळलेली गाझामधील लढाई युक्रेन युद्धावर परिणाम करू शकते. आतापर्यंत युक्रेनला अमेरिका, नाटो आणि इतर अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या देशांचे लक्ष हळूहळू गाझाकडे वळत असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत.
गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे सैन्य याला प्रत्युत्तर देत असले तरी, दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या तीव्र स्वरूपाच्या युद्धात इतक्या मोठ्या संख्येने कोणतेही सैन्य सहभागी झालेले नाही. 9 डिसेंबर 2023च्या रॉयटर्सच्या अहवालानुसार मृतांची संख्या 17,487 गाझन नागरिकांची आहे, तर 7 ऑक्टोबरला हमासने अचानक केलेल्या हल्ल्यात इस्रायली मृतांची संख्या 1,200 होती. मात्र, रॉयटर्सच्या अहवालात असेही नमूद केले आहे की, ही आकडेवारी ढोबळ स्वरुपाची आहे.
युक्रेन युद्धात दोन्ही सैन्यांकडून अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. हिवाळ्याला सुरूवात झाली असून, आघाडीवर स्थिती जैसे थेच ठेवण्यासाठी सैन्याला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. ही गरज सतत भरून काढली नाही तर, रशियन सैन्य या परिस्थितीचा मर्यादित स्वरूपात धोरणात्मक फायदा मिळवण्यासाठी आक्रमण सुरू करू शकतात.
हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या भीषण हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सगळ्यात आधी एक गोष्ट केली ती म्हणजे ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयाला दिलेली पहिली भेट. त्यांची ही खेळी बरोबर होती, कारण इस्रायलबद्दल त्यांना अत्यंत सहानुभूती होती. त्यावेळी नाटोचे सरचिटणीस झेंस स्टॉल्टनबर्ग पाठराखण करताना म्हणाले होते, “तुमचा लढा हाच आमचा लढा आहे, तुमची सुरक्षा हीच आमची सुरक्षा आहे आणि तुमची मूल्ये आमची मूल्ये आहेत.”
स्टॉल्टनबर्ग यांचे शब्द कानाला खूप आश्वासक वाटले तरी, हमासकडून अचानक झालेला हल्ला आणि इस्रायलमधील प्रचंड जीवितहानी यामुळे सगळ्यांचे लक्ष गाझाकडे वळले आहे. गाझा कारवाईसाठी आवश्यक निधी आणि साधनसामग्री यांच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या अमेरिकेचे तेवढेच लक्ष आता युक्रेनकडे राहील का? अशी शंका युक्रेन डिफेन्स कॉन्टॅक्ट ग्रुप मीटमधील काही सदस्यांनी खासगीत व्यक्त केली आहे.
गाझामधील कारवाई लवकरच संपण्याची शक्यता नाही, कारण तिथले हमासचे अतिरेकी त्वेषाने लढा देणे आणि नव्याने उभे राहणे यासाठी पुरेसे कट्टर बनले आहेत. आपली यातून सुटका होणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांच्यासमोर आता फारसे पर्याय उरलेले नाहीत. प्राणपणाने शेवटपर्यंत लढणे किंवा शरणागती पत्करणे, एवढेच पर्याय त्यांच्यासमोर आहे. इस्रायलने त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे आणि काहीजण आत्मसमर्पण करत असल्याची माहिती आहे.
पाश्चात्य जगातील काही देश युक्रेनियन युद्धाला पाठिंबा देऊन आता थकले आहेत. आता इस्रायलला पाठिंबा दर्शवून त्यांना आवश्यक असणाऱ्या निधीचा अतिरिक्त बोजा या देशांना उचलावा लागणार आहे. युक्रेनियन लोकांना पाठिंबा देण्याची किंमत आधीच सामान्य माणसाने महागाईच्या झळा सोसून चुकती केली आहे. त्यातच अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणूक देखील होणार आहे आणि झेलेन्स्कीला पाठिंबा देण्याच्या बायडेन यांच्या प्रयत्नांना रिपब्लिकन पक्षाकडून फारसे सहकार्य मिळत नाही. सिनेटर जोश हॉले यांनी पूर्वीचे ट्विटर आणि आताच्या एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “इस्रायलला आपले अस्तित्व टिकवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे युक्रेनसाठी मंजूर झालेला कोणताही निधी ताबडतोब इस्रायलकडे वळवला पाहिजे.” कदाचित हेच अनेकांचे मत असू शकते.
अमेरिकेमध्ये, रिपब्लिकन सिनेटर्स युक्रेनसाठी सीमेपलीकडील स्थलांतर कडक करण्यासाठी कठोर उपायांसह मदत उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. युक्रेन (61.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स) आणि इस्रायलसाठी इतर राष्ट्रीय सुरक्षा प्राधान्यांसह युद्धकाळातील निधी 110 अब्ज अमेरिकन डॉलर्स पॅकेजच्या एकत्रित मंजुरीसाठी बायडेन संमती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षांमधील समन्वयाबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता मिळाली नसली, तरी काही सिनेटर्स याबद्दल आशावादी आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी टेलिव्हिजनवर सांगितले की, “युक्रेनसाठी आमच्याकडे निधीची कमतरता आहे.”
मानवतावादी दृष्टीने मदत पुरवणे आणि एकमेकांकडे असलेल्या कैद्यांना मायदेशी पाठविण्यासाठी गाझामध्ये तात्पुरता युद्धविराम घेण्यात आला. गाझामध्ये दुसरा युद्धविराम व्हावा आणि या परिस्थितीवर तोडगा निघण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रगती व्हावी, अशीच झेलेन्स्की यांना अपेक्षा आहे. गाझामध्ये युद्धविराम व्हावा ही जागतिक स्तरावरील अपेक्षा आहे. 11 डिसेंबरला नेतन्याहू यांनी हमासच्या सैनिकांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करताना म्हटले की ही “शेवटाची सुरुवात” आहे. मात्र हमासचा अंत हे उद्दिष्ट साध्य करणे दिवास्वप्नच आहे. द्वि-राष्ट्र संकल्पना स्वीकारल्याने परत एकदा शांतता प्रस्थापित होऊ शकते, मात्र हा उपाय क्षणभंगुर ठरण्याची शक्यता अधिक आहे.
बायडेन यांच्या आमंत्रणावरून हताश झेलेन्स्की 12 डिसेंबरला वॉशिंग्टनला पोहोचले आणि अमेरिकन खासदारांना, विशेषत: रिपब्लिकनांना आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात, 2022 मध्ये जितक्या जोशात त्यांचे अमेरिकेत स्वागत झाले, तो उत्साह यावेळी नव्हता किंवा सिनेटर्सशी झालेल्या संवादानंतरही अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. वरवर पाहता, बायडेन स्थलांतराच्या मुद्द्यावर काहीतरी तडजोड करून मार्ग काढण्यास सक्षम असावे.
अशा काळात, युक्रेनची स्थिती अधिक बिकट होऊ नये यासाठी, झेलेन्स्कींनी आता फार दबाव न टाकणेच योग्य ठरेल. रशियन सैन्याला परत एकदा हल्ल्याचा मोठा प्रयत्न करण्याची संधी मिळू नये, यासाठी झेलेन्स्कींना आपल्या देशाचे उत्पन्न आणि सैन्य यांचे जतन करणे आवश्यक आहे. येणारा हिवाळा अधिक कडक असेल आणि युक्रेनियन लोकांनीही मनोबल कायम ठेवण्याची आवश्यकता असेल.
युक्रेनचा जर पराजय झाला तर, रशिया आपल्या दारात येऊन ठेपणार आहे, हे नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी लक्षात घ्यायला हवे. युक्रेनियन लढत असलेल्या युद्धाला समर्थन देताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा ही खूप मोठी जोखीम ठरू शकतो. त्यांना युक्रेनियन युद्ध सुरू ठेवण्यासाठी निधीचा बंदोबस्त करावा लागेल. गाझा युद्धामुळे इस्रायलकडे निधी वळवण्याच्या दृष्टीने त्यांना त्यावरून लक्ष विचलित करता येणार नाही. दोन भिन्न खंडांमध्ये सुरू असणारी ही दोन वेगळी युद्धे आहेत आणि एक युद्ध सुरू राहण्यासाठी दुसऱ्या युद्धाच्या खर्च तिथे वळवणे योग्यही होणार नाही. त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या निधीच्या तुलनेत युक्रेनियन लोकांनी फार वाईट कामगिरी केलेले नाही. अमेरिकन काँग्रेसकडे आलेल्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच रशियाकडे असलेल्या सक्रिय सैन्याच्या एकूण संख्येपैकी तब्बल 87 टक्के सैन्य आणि एकूण रणगाड्यांपैकी दोन तृतीयांश रणगाडे गमावले आहेत.
जगातील एकमात्र महासत्ता म्हणून आपली ओळख टिकून राहावी यासाठी आपण किती टोकापर्यंत जाऊ शकतो, याचा अंदाज अमेरिकन लोकांना आला पाहिजे. युद्धखोर चिन पूर्वेकडील भागात आपला दबदबा असावा, यासाठी जोमाने पाठपुरावा करत आहेत. दक्षिण चिनी समुद्रामध्ये जर लवकरच भडका उडाला तर, अमेरिकेसमोर कठीण परिस्थिती निर्माण होईल. दक्षिण चीनी समुद्रात एम/के कलयाना हे फिलिपिन्सचे जहाज चिनी तटरक्षक जहाजाने तोफांच्या साहाय्याने उडवण्याची धक्कादायक घटना घडली. फिलिपिन्सचा हवाला देत रॉयटर्सच्या बातमीत असे नमूद केले आहे की, “चीनच्या ज्या जहाजांनी हल्ला केला, त्यावर त्यांचे लष्कर प्रमुख उपस्थित होते.”
गाझामधील युद्ध इस्रायलच्या शेजारी देशांनाही घेरणारे असून त्याचा वाईट परिणाम पश्चिम आशिया आणि युक्रेनवर होऊ शकतो. लेबनॉनमधून इस्रायलवर होणाऱ्या हिजबुल्लाहच्या शक्तिशाली हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर देऊ शकू का? याबद्दल इस्रायलचे उच्चाधिकारी साशंक आहेत. इस्रायलच्या शेजारील आणखी काही देशांमध्ये युद्ध पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, इराणी लोक त्यांच्या साधनसामग्रीचा वापर अधिक धाडसाने करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युक्रेनबाबतची कोणतीही हयगय अमेरिकेची पकड कमी करू शकते. युरोपियन युनियनचा आधीच कमी होत चाललेला प्रभाव अजूनच कमी होईल. चीनला दक्षिण चीनी समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकच प्रोत्साहन मिळेल. एकही गोळी न चालवता चीनला याचा फायदा होईल. युक्रेनचा पराभव झाला तर, चीन अधिक आक्रमक होईल. सन त्झूच्या म्हणण्यानुसार, ‘युद्धातली सर्वोच्च कला म्हणजे लढाई न करता शत्रूला वश करणे’ हे चीनच्या संदर्भात खरे ठरण्याची शक्यता आहे. युक्रेनवर लावलेला पैसा जास्त आहेत आणि म्हणूनच देशांतर्गत तसेच आर्थिक समस्यांच्या पलीकडे जाऊन त्याला प्राधान्य दिले पाहिजे.
ब्रिगेडियर एस.के.चॅटर्जी (निवृत्त)
(अनुवाद : आराधना जोशी)