अपघातग्रस्त सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानातील प्रवासी अखेर बुधवारी बँकॉकहून पर्यायी विमानाने सिंगापूरला पोहोचले आहेत. बोईंग 777-300 ईआर लंडन-सिंगापूर विमानाला उड्डाणात धक्के बसल्यामुळे (टर्ब्युलन्स) ते तातडीने बँकॉकला वळवण्यात आले होते. वादळी हवामानात धक्के बसू लागल्याने हे विमान तीन मिनिटांमध्ये 31 हजार फूट खाली घसरले. यामुळे 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले. तर एका 73 वर्षीय ब्रिटीश प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवासी, सामान छताला धडकले
या विमानातील प्रवासी डझाफ्रान अझमिर म्हणाले की, धक्के बसू लागल्याने प्रवासी छतावर आदळू लागले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दुखापयी झाल्याचे त्याने पाहिले आहे. “मी माझ्या रांगेत बाहेरच्या बाजूला बसलो होतो. माझ्यापलीकडील रांगेमधील प्रवासी पूर्णपणे आडवे होताना पाहिले, ते छताला आदळले आणि जखमी स्थितीत परत खाली आले. त्यामुळे अनेकांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या, मेंदूला मार लागला.”
विमानाच्या आतील भागांच्या काढलेल्या छायाचित्रांवरून तो काय म्हणत होता हे समजून येते. वरच्या केबिन पॅनेलमध्ये गॅस, ऑक्सिजन मुखवटे आणि छतावर लटकलेले पॅनेल आणि सामान सर्वत्र विखुरलेले होते. आणखी एका प्रवाशाने सांगितले की काही लोकांची डोकी आसनांच्या वरच्या दिव्यांना जाऊन धडकली होती.
सिंगापूर एअरलाइन्सचे पर्यायी विमान
सिंगापूर एअरलाइन्सने बँकॉकहून 131 प्रवासी आणि 12 कर्मचारी यांच्यासाठी पर्यायी विमान उपलब्ध करून दिले. हे विमान सकाळी 5 वाजण्याच्या (2100 जीएमटी) सुमारास सिंगापूरला पोहोचले. आधीच्या विमानात अनेक ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश आणि सिंगापूरच्या नागरिकांसह 211 प्रवासी आणि 18 कर्मचारी होते. जखमी प्रवासी आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य सध्या बँकॉकमध्ये आहेत.
विमान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले सांत्वन
सिंगापूर एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोह चुन फोंग यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मृत्यू पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबीय आणि प्रियजनांशी संपर्क साधत त्यांचे सांत्वन केले. सिंगापूरचे परिवहन मंत्री ची हाँग टाट यांनी फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंगापूरच्या परिवहन सुरक्षा तपास विभागाचे अधिकारी मंगळवारी रात्री बँकॉकमध्ये पोहोचले आहेत. यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) एक मान्यताप्राप्त अधिकारी आणि चार तांत्रिक सल्लागार पाठवत आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)