घटती कर्मचारीसंख्या लक्षात घेऊन चीनने नागरी सेवेसाठी नियुक्तीचे वय वाढवले

0

गेल्या तीन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच चीनने काही नागरी सेवा पदांसाठीचे कमाल भरती वय वाढवले ​​असून कमाल मर्यादा 35 वर्षांवरून 38 वर्षांपर्यंत वाढवली आहे. घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे ज्येष्ठ  नागरिकांची वाढती संख्या आणि कठोर कामगार नियमांना तोंड देण्यासाठी उचलण्यात आलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे.

 

राज्य नागरी सेवा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले की 2026 च्या राष्ट्रीय नागरी सेवा परीक्षेसाठी अर्जदारांचे वय आता 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर किंवा डॉक्टरेट पदवी असलेल्या उमेदवारांसाठी आतापर्यंत 40 वर्ष वयोगटाची कमाल मर्यादा आता 43 वर्षे  करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेमुळे देशभरात 38 हजार 100 नवीन नागरी कर्मचाऱ्यांची भरती करता येईल.

राज्य माध्यम ग्लोबल टाईम्सने हा निर्णय म्हणजे “कायदेशीर निवृत्तीचे वय पुढे ढकलण्याच्या चीनच्या प्रगतीशील दृष्टिकोनाशी सुसंगत” असे म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, बीजिंगने कामगार दलात अधिक कुशल कर्मचारी टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून निवृत्तीच्या वयोमर्यादेत हळूहळू वाढ करण्यास सुरुवात केली.

धोरणातील बदल ’35 वर्षांचा शाप’ या वाक्प्रचारालादेखील लक्ष्य करणारा आहे, जो चिनी सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असून 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यास किंवा कायम करण्यास नाखूश मालकांच्या अनिच्छेचे वर्णन करणारा आहे. अनेक उद्योगांमध्ये, विशेषतः तंत्रज्ञान, वित्त आणि माध्यमांमध्ये, अनुभवाची पर्वा न करता, कर्मचाऱ्याने वयाची मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांना कामावरून कमी करणे किंवा नवीन नोकरीसाठी नकाराचा सामना करावा लागतो.

चीनची लोकसंख्या झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत आहे, 2035 पर्यंत एकूण लोकसंख्येच्या 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची किमान 40 टक्के लोकसंख्या असेल, म्हणजेच 40 कोटींहून अधिक लोकसंख्या त्यात समाविष्ट असेल अशी अपेक्षा आहे, जी अमेरिका आणि ब्रिटनच्या एकत्रित लोकसंख्येच्या जवळपास बरोबरीची आहे.

नोकऱ्यांमध्ये वयानुसार होणारा भेदभाव दूर करण्यासाठी, चीनने पुरुषांसाठी निवृत्तीचे वय 60 वरून 63 वर्षे केले आहे, तर व्हाईट कॉलर काम करणाऱ्या महिलांसाठी 55 वरून 58 वर्षे केले आहे. ब्लू कॉलर काम करणाऱ्या महिलांसाठी ते 50 वरून 55 वर्षे केले आहे.

नागरी सेवेतील वयोमर्यादा शिथिल करून, बीजिंगला केवळ त्यांच्या प्रतिभेचा विस्तार करण्याचीच नाही तर कामाच्या ठिकाणी ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल अशी आशा आहे.

अनुकृती 

+ posts
Previous articleट्रम्प यांना चीनच्या टॅरिफ मर्यादा मान्य; जिनपिंग यांच्यासोबत बैठकीची तयारी
Next articleपाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 8 जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here