पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्रिकेटपटूंसह 8 जणांचा मृत्यू

0

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात पाकिस्तानी हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंसह किमान आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

 

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, कबीर, सिबगतुल्ला आणि हारून हे खेळाडू उर्गुनहून पाकिस्तान सीमेजवळील शरण येथे मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी होण्यासाठी गेले होते.

स्थानिक मेळाव्यात “उर्गुनला घरी परतल्यानंतर” खेळाडूंना लक्ष्य करण्यात आले असे सांगत एसीबीने या घटनेचे वर्णन “पाकिस्तानी राजवटीने केलेला भ्याड हल्ला” असे केले. तीन क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, इतर पाच नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. बोर्डाने या हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिली नाही.

हल्ल्याला प्रतिसाद म्हणून, अफगाणिस्तानने पुढील महिन्यात होणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबतच्या त्रिकोणी क्रिकेट मालिकेतून माघार घेण्याची घोषणा केली. “पीडितांच्या प्रति आदर दाखविण्याचे संकेत” म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात आज संध्याकाळी लक्ष्य करण्यात आलेल्या पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या दुःखद हौतात्म्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड तीव्र दुःख आणि संवेदना व्यक्त करते,” असे एसीबीने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

क्रिकेटपटूंकडून संताप व्यक्त

अफगाणिस्तानच्या T-20 संघाचा कर्णधार रशीद खानने या हवाई हल्ल्याचा निषेध केला असून, निष्पाप जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच आगामी सामन्यांमधून माघार घेण्याच्या एसीबीच्या निर्णयालाही पाठिंबा दर्शविला.

“अफगाणिस्तानवर अलिकडेच करण्यात आलेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यातील नागरिकांच्या मृत्युमुळे मला खूप दुःख झाले आहे – ही एक शोकांतिका आहे ज्यामध्ये महिला, मुले आणि राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण क्रिकेटपटूंचा बळी गेला,” असे खानने एक्सवर लिहिले.

हा हल्ला “अनैतिक आणि क्रूर” असल्याचे त्याने वर्णन केले असून असे म्हटले आहे की नागरिकांना लक्ष्य करणे हे “मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे ज्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.”

“निरपराध जीव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर, मी एसीबीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमधून माघार घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. आपली राष्ट्रीय प्रतिष्ठा नेहमीच प्रथम असली पाहिजे,” असे ते पुढे म्हणाले.

दुसरा अफगाण आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहम्मद नबी याने या हल्ल्याला “राष्ट्रीय शोकांतिका” संबोधत हे केवळ पाकटिकासाठीच नाही तर संपूर्ण अफगाण क्रिकेट समुदायाचे नुकसान आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

त्याचप्रमाणे, वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी याने फेसबुकवर या हत्येचा निषेध करत लिहिले की, “या अत्याचारींनी निष्पाप नागरिकांचा आणि आमच्या स्थानिक क्रिकेट खेळाडूंचा केलेला नरसंहार हा एक घृणास्पद आणि अक्षम्य गुन्हा आहे.”

सीमा तणावात वाढ

अफगाणिस्तान मधील माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने शुक्रवारी पक्तिका प्रांतात अनेक हवाई हल्ले केले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील नाजूक युद्धबंदी कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.

स्थानिक सूत्रांचा हवाला देत टोलो न्यूजने वृत्त दिले की, या हल्ल्यांमध्ये उर्गुन आणि बारमल जिल्ह्यातील निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला.

सीमेपलीकडून होणाऱ्या प्राणघातक चकमकींनंतर तणाव कमी करण्यासाठी 48 तासांच्या युद्धबंदीनंतरही हा हल्ला झाला.

यापूर्वी, पाकिस्तानने शत्रुत्व कमी करण्यासाठी आणि सीमा वाद सोडवण्यासाठी सुरू असलेल्या दोहा वाटाघाटी पूर्ण होईपर्यंत युद्धबंदी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. काबुलने या मुदतवाढीला सहमती दर्शविली आहे, दोन्ही बाजूंमधील औपचारिक चर्चा शनिवारी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleघटती कर्मचारीसंख्या लक्षात घेऊन चीनने नागरी सेवेसाठी नियुक्तीचे वय वाढवले
Next articleChina’s Nuclear Arsenal Expanding Rapidly, Could Rival US and Russia by 2030: SIPRI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here