एलटीटीई संघर्षात बळजबरीने बेपत्ता करण्यात आलेल्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धादरम्यान बळजबरीने बेपत्ता झालेल्या हजारो गुन्हेगारांना मान्यता देण्यात आणि त्यांना जबाबदार धरण्यात श्रीलंका सरकार अपयशी ठरल्याबद्दल या अहवालात टीका करण्यात आली आहे.
सशस्त्र संघर्ष संपुष्टात येऊन जवळजवळ 15 वर्षे उलटली आहेत. तरीही त्यावेळी “बळजबरीने बेपत्ता होण्याच्या सुरुवातीच्या काळात” झालेल्या प्रकारांसाठी श्रीलंकेचे अधिकारी अजूनही जबाबदारी निश्चित करण्यात अपयशी ठरले आहेत,” असे या अहवालात म्हटले आहे.
सिंहली वर्चस्व असलेले सरकार आणि तामीळ टायगर्स यांच्यातील गृहयुद्ध 1983 ते 2009 दरम्यान लढले गेले. मात्र 1970च्या दशकापासून 2009 मधील युद्धाच्या समाप्तीपर्यंत, “श्रीलंकेची सुरक्षा दले आणि संलग्न निमलष्करी दलांनी मोठ्या प्रमाणात अनेक गुन्हेगारांना जबरदस्तीने बेपत्ता केले ज्यांचा वापर “कथित विरोधकांना धमकावण्यासाठी आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी एक साधन म्हणून करण्यात आला,” असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.
या अहवालाच्या लेखकांनी लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम अनेक “अपहरणांमध्ये गुंतले” असल्याचा आरोपही केला आहे.
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालय ओएचसीएचआरकडून अधिकृतपणे अहवाल जाहीर करण्याच्या एकतर्फी कृतीवर आणि विशेषतः त्याच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करेल. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांना पत्र लिहिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी 18 मे 2009 रोजी 26 वर्षांच्या युद्धाचा अंत झाल्याची घोषणा केली. या युद्धात 1लाखांहून अधिक लोक मारले गेले आणि लाखो श्रीलंकन नागरिक मुख्यतः अल्पसंख्याक तामिळ, देशात आणि परदेशात निर्वासित म्हणून विस्थापित झाले.
या युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामुळे अहवाल प्रसिद्धीच्या वेळेबद्दलही श्रीलंकेने नाराजी व्यक्त केली आहे.
बंदी घातण्यात आलेल्या एलटीटीईबरोबरच्या या गृहयुद्धाला शनिवारी 18 मे रोजी 15 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने श्रीलंकेच्या तामीळ वर्चस्व असलेल्या उत्तर आणि पूर्व भागात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.
तामीळ गटांनी दावा केला आहे की अंतिम लढाईत मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले. 1983 मध्ये हे गृहयुद्ध सुरू झाले आणि सुमारे तीन दशकांनंतर 2009 मध्ये ते संपुष्टात आले. लष्कराने एलटीटीईच्या प्रमुख नेत्यांचा खात्मा केल्याने ते संपले असे मानले जाते. त्यानंतर 18 मे 2009 रोजी, लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलमचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याला श्रीलंकेच्या सैन्याने 2009 मध्ये लष्करी कारवाईदरम्यान ठार मारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.
आराधना जोशी
(विविध वृत्तसंस्था)