सन 2018पासून प्रथमच एलओसीवर तुलनेत बऱ्यापैकी शांतता पाहायला मिळत आहे. शिवाय, जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण देखील स्थिर आहे. अतिरेकी कारवायांमध्ये घट झाली असून 2018मध्ये 417 अतिरेकी कारवाया झाल्या तर, 2021मध्ये 229 कारवायांची नोंद झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते.
सन 2020-2021मध्ये घुसखोरीचे 176 प्रयत्न झाले. त्यापैकी 2020मध्ये घुसखोरीचे 99 प्रयत्न झाले. त्यात 19 अतिरेकी ठार झाले. तर, 2021मध्ये 77 प्रयत्न झाले आणि त्यात 12 अतिरेक्यांचा खात्मा तर, एका अतिरेक्याला अटक करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तशी माहिती संसदेत देण्यात आली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, 2021मध्ये एलओसीवरून 31 अतिरेक्यांनी घुसखोरी केली आहे. यावरून जम्मू आणि काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना फूस लावण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरूच आहे, हे यावरून स्पष्ट होते. 2021मध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये 171 अतिरेकी ठार झाले. त्यात 147 स्थानिक तर 24 पाकिस्तानी अतिरेकी होते. श्रीनगर, पूंछ, पुलवामा, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला या भागांमध्ये या चकमकी झाल्या आणि लष्कर ए तैयबा व जैश ए मोहम्मद या संघटनेशी सबंधित हे अतिरेकी होते.
पूर्वी शांत आणि दहशतवादमुक्त समजल्या जाणाऱ्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये अतिरेकी कारवाया वाढत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 13 चकमकी झाल्या आणि एलओसीजवळ लष्कराने घुसखोरीचे सुमारे 6 प्रयत्न उधळून लावले. घुसखोरीसाठी जम्मूकडील एलओसी आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेचा वापर करण्यास अतिरेक्यांनी सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
घुसखोरीची तयारी
एलओसीवर शस्त्रसंधीचे पालन बऱ्यापैकी होत असले तरी, घुसखोरीच्या तयारीत अतिरेकी संघटना आहेत. अतिरेक्यांचे सीमेलगतचे लाँचपॅड भरले असून काश्मीर तसेच जम्मूमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती संरक्षण खात्याशी संबंधित सूत्रांनी दिली.
सुमारे 135 अतिरेकी लाँच पॅडवर असून कारेन, तंगधर, उरी क्षेत्रांतून काश्मीरमध्ये आणि पूंछ, कृष्णा घाटी, भिंबर गली, नौशेरा आणि हिरानगर या भागांतून जम्मूत घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. सुमारे 150 ते 200 प्रशिक्षित अतिरेकी अद्याप सक्रिय असून त्यापैकी सुमारे 45 टक्के अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक आहेत, असा भारतीय लष्कराचा अंदाज आहे.
पाकिस्तानचे नवे धोरण
काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तान कायम प्रयत्नशील असतो, म्हणूनच शस्त्रसंधी असूनही सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. अतिरेक्यांऐवजी अधिकाधिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा भारतीय हद्दीत पाठविण्याचे नवे धोरण पाकिस्तानी लष्कराने अवलंबल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सापडली आहे. ती पाहून भारतीय सुरक्षा दलांनाही धक्का बसला.
अफगाणिस्तानमध्ये जी हायटेक शस्त्रास्त्रे ठेवून अमेरिका बाहेर पडली, ती शस्त्रास्त्रे पाकपुरस्कृत अतिरेकी वापरत असल्याचे गेल्या महिन्यात उघड झाले. ही शस्त्रास्त्रे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेमार्फत अतिरेक्यांकडे येतात. गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात तालिबानने ताबा घेतल्यानंतर अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्रे ते वापरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
हिंसाचारात वाढ
अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. या अतिरेक्यांच्या सुरक्षा दलाबरोबर जवळपास अर्धा डझन चकमकी झाल्या. ताज्या आकडेवारीनुसार, सुरक्षा दलांबरोबर झालेल्या तीन चकमकींमध्ये जैश ए मोहम्मदच्या पाकिस्तानी कमांडरसह चार अतिरेक्यांचा खात्मा झाला आणि एका अतिरेक्याला अटक करण्यात आली.
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा, गंदेरबल आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये 12 मार्च रोजी या चकमकी झाल्या. 16 मार्चला श्रीनगर जिल्ह्यातील नौगाम येथे तीन अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्यात आले. श्रीनगरच्या खान्मोह परिसरात सरपंचाच्या हत्येमध्ये या तिघांचाही सहभाग होता. लष्कर ए तैयबाशी संबंधित दी रेझिस्टन्स फ्रंटशी हे तिघेही निगडीत होते.
या वर्षी सुरक्षा दलांनी आतापर्यंत 10 विदेशींसह (पाकिस्तानी) 39 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. तर, 24 अतिरेकी किंवा त्यांचे साथीदार, अतिरेक्यांना विविध प्रकारची मदत पुरविणारे तसेच त्यांचे खबरे अशा जवळपास 100 जणांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. काश्मीर भागातून 18 तरूण विविध अतिरेकी संघटनांशी जोडले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांत पूंछ, उरी आणि नौशेरा या भागांमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 घुसखोर ठार झाले. तर, चार भारतीय जवान शहीद झाले; जानेवारी महिन्यात तीन आणि फेब्रुवारीमध्ये एका जवानाला वीरमरण आले. या कारवायांपैकी उरी येथील कारवाई नऊ दिवस चालली. या कालावधीत केलेल्या दोन कारवायांमध्ये सात घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आणि एका अतिरेक्याला सुरक्षा दलाने ताब्यात घेतले.
(अनुवाद : मनोज जोशी)
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.