संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाच्या प्रश्नावर भारतीय हवाई दल केंद्र सरकारबरोबर पूर्ण समन्वयाने काम करत आहे, असे सांगत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी देशातील उत्पादन क्षमतेला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
90व्या हवाई दलदिनाच्या (8 ऑक्टोबर) पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना हवाईदल प्रमुख म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून आम्ही स्वदेशीकरणावर जोर देत आहोत. आम्हाला भारतीय उद्योगातून 62,000 सुटे भाग मिळतात आणि आतापर्यंत त्यांचा कधीही तुटवडा भासला झाला नाही किंवा पुरवठा खंडित झाला नाही. पुढील काही वर्षांमध्ये आम्हाला एलसीएच एमके 1A, HTT-40 ट्रेनर्स, स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि विविध रडार मिळतील, अशी आशा आहे. एलसीएच प्रचंड सोमवारीच (3 ऑक्टोबर) भारतीय हवाई दलामध्ये समाविष्ट झाले आहे आणि मला खात्री आहे की, हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची क्षमता वाढवेल. आम्ही एलसीएच एमके-2 आणि एएमसीएच्या विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. सी-295 एअरक्राफ्टचा समावेश हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे भारतीय एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला बळ मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय हवाई दलाला एरोस्पेस फोर्समध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकून हवाईदल प्रमुख म्हणाले, “आम्ही अंतराळाकडे हवाई क्षेत्राचे नैसर्गिक विस्तारीत रुप म्हणून पाहतो आणि त्याचा वापर राष्ट्रीय हितासाठी करण्याची गरज असून ते महत्त्वाचेही आहे. स्पेस बेस्ड असेट्स, हवाई क्षेत्रातील आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवतात. हवाई आणि अंतराळ क्षमता पूर्णपणे एकत्रित करून एक सक्षम एरोस्पेस क्षेत्र उभे करणे, हे आमचे ध्येय आहे.
थिएट्रिकल कमांड : भारतीय हवाई दलाच्या सैद्धांतिक पैलूंशी कोणतीही तडजोड नाही
भारतीय हवाई दल तीन सेवांच्या ‘थिएटरायझेशन’ योजनेच्या विरोधात नाही. तथापि, प्रस्तावित संरचनेमुळे, हवाई दलाच्या सैद्धांतिक पैलूंबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे एअर चीफ मार्शल (ACM) व्ही. आर. चौधरी यांनी स्पष्ट केले. भारतीय हवाई दलाने अलीकडेच आपले सिद्धांत काळानुरूप सुसंगत ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करून ते अद्ययावत केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोणतेही एकच दल स्वबळावर युद्ध जिंकू शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि तीन सेवांच्या प्रस्तावित एकीकरण प्रक्रियेच्या काही मुद्यांबाबत हवाई दलात शंका असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी, तीन सेवांमधील समन्वय सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेला त्यांनी व्यापकपणे समर्थन दिले आहे.
एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, “स्वतंत्र धोरणात्मक मोहिमा तसेच अन्य दले आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या विविध विभागांबरोबरच्या मोहिमा राबविण्याची अद्वितीय क्षमता हवाई दलात आहे. भविष्यातील संभाव्य युद्धांमधील एकत्रितपणाने केलेले नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीची अत्यावश्यकता आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यादृष्टीने तिन्ही सेवा एकत्रित करण्याच्या प्रयत्नांमागची भूमिका समजली आहे. आमचा विश्वास आहे की, स्वीकारलेला एकीकृत आराखडा भविष्यासाठी तयार असायला हवा, निर्णय घेण्याचे टप्पे कमी केले पाहिजे, आणि तीन सेवांच्या शक्तीचा योग्य वापर केला पाहिजे. भारतीय परिस्थिती आणि आपल्या भू-राजकीय गरजांशी सुसंगत अशी संघटनात्मक रचना असायला हवी, असे मत त्यांनी मांडले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून अनिल चौहान यांनी आता सूत्रे स्वीकारली असल्याने तिन्ही सैन्य दलांच्या थिएटरायझेशनला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. तथापि, हवाई दलाने मांडलेल्या भूमिकेचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
हवाई दलातील विमानांची संख्या 2035-36पर्यंत 35वर पोहोचेल
हवाई दल लढाऊ विमानांची गुणवत्ता आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष देत असले तरीही संख्याबळही महत्त्वाचे आहे, असे एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले. लढाऊ विमानांच्या संख्येत घट होऊन ती सध्या 30 झाली असली तरी 42 विमानांच्या ताफ्याला मिळालेल्या मंजुरीचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवाई दलाने आधीच 83 एलसीए तेजस एमके 1एची ऑर्डर दिली आहे. शिवाय, तेजस एमके 2 बरोबरच स्वदेशी बनावटीच्या 5व्या जनरेशनच्या लढाऊ विमानांसाठी देखील ऑर्डर देण्याचा विचार आहे; मात्र या दोन्ही विमानांची अद्याप फक्त डिझाइन तयार करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. 114 मीडियम रोल फायटर एअरक्राफ्टसाठीही (MRFA) भारतीय हवाई दल उत्सुक आहे. त्याबाबतच्या तांत्रिक गरजा पूर्ण केल्या जात असून त्यानंतर रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) पाठवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जर सर्वकाही नियोजनबद्धरीत्या आणि कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहिले तर, मंजूर 42 विमान ताफ्यांपैकी 35 विमाने 2035-36पर्यंत समाविष्ट होतील, असे त्यांनी नमूद केले.
(अनुवाद – आराधना जोशी)