ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्याला प्रारंभ; व्यापार, संरक्षण चर्चांसाठी जपानला रवाना

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सोमवारी टोकियोला रवाना झाले, जिथे ते जपानचे सम्राट आणि नवनिर्वाचित पंतप्रधान साने ताकाईची यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकींच्या मालिकेचा प्रारंभ केला.

ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्याच्या विस्तृत आराखड्यात जपान भेटीचा समावेश आहे, ज्याचा उद्देश द्विपक्षीय व्यापार करार मजबूत करणे, गुंतवणूक वाढवणे, आणि जपानने आपला संरक्षण खर्च वाढवावा यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

जानेवारी महिन्यात पदभार स्विकारल्यानंतर, ट्रम्प यांचा हा सर्वात मोठा परदेश दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी मलेशियातील त्यांच्या पहिल्या थांब्यादरम्यान, आग्नेय आशियाई देशांसोबत अनेक करारांची घोषणा केली आणि थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली.

गुरुवारी, दक्षिण कोरियामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या शिखर परिषदेतील बैठकीनंतर, ट्रम्प यांचा हा दौरा संपणे अपेक्षित आहे. या शिखर परिषदेत, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ट्रम्प यांनी, आधीच जपानकडून 550 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या आश्वासनाची घोषणा केली आहे, जी अमेरिकेने जपानी वस्तूंवरील कठोर आयात शुल्कांमध्ये सवलत देण्याच्या बदल्यात मिळाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान ताकाईची या अमेरिकन पिकअप ट्रक्स, सोयाबीन आणि गॅस खरेदी करण्याचे आश्वासन देऊन, ट्रम्प यांना आणखी प्रभावित करण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांचा भर आहे.

महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी

मलेशियातून प्रस्थान करण्यापूर्वी, ट्रम्प यांनी Truth Social मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “मी सध्या मलेशियातून निघत आहेत, हा एक महान आणि उत्साही देश आहे. आम्ही महत्त्वाचे व्यापार आणि दुर्मिळ खनिज करार केले, आणि काल सर्वात महत्त्वाच्या थायलंड आणि कंबोडियामधील शांतता करारावर स्वाक्षरी केली. कोणताही युद्ध होणार नाही! लाखो लोकांचे जीव वाचले,“ 

“ही अतिशय सन्मानाची बाब आहे, आता जपानकडे रवाना होत आहे!!!”

ताकाईची, ज्या मागील आठवड्यात जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या, त्यांनी ट्रम्प यांना फोन कॉलदरम्यान सांगितले की, “दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे.”

ट्रम्प यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी, जपानच्या राजधानीत हजारो पोलिस तैनात केले गेले आहेत. शुक्रवारी, अमेरिकन दूतावासाबाहेर चाकू घेऊन उभा राहिलेल्या संशयित व्यक्तीची अटक आणि शिन्जुकू मधील शहर केंद्रात आयोजित असलेला ट्रम्प-विरोधी निषेध मोहिमुळे, तणाव अधिक वाढला आहे.

जुलैमध्ये झालेल्या टॅरिफ कराराचे शिल्पकार, वाणीज्य सेक्रेटरी हॉवर्ड लूटनिक आणि त्यांचे जपानी समकक्ष र्योसेई अकाझावा, सोमवारी एकत्र वर्किंग लंचचा आस्वाद घेतील.

ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट, जे डोनाल्ड ट्रम्प आणि स्टेट सेक्रेटरी मार्को रुबियो यांच्यासोबत प्रवास करत आहेत, त्यांचे नवीन समकक्ष सात्सुकी काटायामा यांची भेट घेण्याची अपेक्षा आहे.

ट्रम्प यांचे शाही स्वागत

ट्रम्प सर्वप्रथम, टोकियोच्या मध्यभागी असलेल्या इम्पेरियल पॅलेसमध्ये जाऊन, सम्राट नारुहितो यांची भेट घेतील.

2019 मध्ये, सम्राट म्हणून पदभार स्विकारल्यानंतर नारुहितो यांना भेटणारे ट्रम्प हे पहिले परदेशी नेते होते, त्यांनी जगातील सर्वात जुनी वंशपरंपरागत राजेशाही असल्याचा दावा करणारी शाही वंशपरंपरा पुढे चालू ठेवली. तथापि, नारुहितो यांची भूमिका केवळ प्रतिकात्मक आहे आणि खऱ्या अर्थाने महत्त्वाची मुत्सद्देगिरी मंगळवारी ताकाईची यांच्यासोबत होईल.

ताकाईची या जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंझो आबे यांच्या निकटवर्ती सहकारी होत्या. आबे यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ मैदानावर तासनतास वेळ घालवून त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण केले होते. ताकाईची यांनीही अमेरिकेच्या अध्यक्षांना आधीच प्रभावित केल्याचे दिसते.

“ताकाईची या उत्तम व्यक्ती आहेत, त्यांचा स्वभाव मैत्रीपूर्ण आहे, आम्ही लवकरच त्यांना भेटणार आहोत,” असे ट्रम्प यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. “त्या पंतप्रधान आबे यांच्या खूप जवळच्या सहकारी आणि मैत्रीण होत्या आणि आबे हे माझ्या आवडत्या नैतांपैकी एक होते,” असेही त्यांनी सांगितले.

ते दोघेही अकासाका पॅलेसमध्ये भेटणार आहेत, जिथे ट्रम्प सहा वर्षांपूर्वी आबे यांना भेटले होते. तिथे ट्रम्प यांचे लष्करी सन्मान रक्षकांद्वारे स्वागत केले जाईल.

गुंतवणुकीच्या आश्वासनांव्यतिरिक्त, ताकाईची ट्रम्प यांना हे आश्वासन देतील अशी अपेक्षा आहे की, सुरक्षेच्या बाबतीत टोकियो अधिक योगदान देण्यास तयार आहे. कारण त्यांनी शुक्रवारीच कायदेकर्त्यांना सांगितले होते की, त्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानच्या संरक्षण बांधणील जलदगतीने पुढे नेतील.

संरक्षण खर्चात अधिक गुंतवणूक

जपानमध्ये अमेरिकेच्या सैनिकांची सर्वात मोठे तळ आहेत आणि अधिकाधिक आक्रमक होत असलेल्या चीनपासून आपल्या बेटांचे संरक्षण करण्यासाठी टोकियो पुरेसा खर्च करत नाही, अशी तक्रार ट्रम्प यांनी यापूर्वी केली आहे.

“बळजबरीने किंवा जबरदस्तीने या प्रदेशातील स्थिती बदलण्याच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याबाबत काही प्रकारचे विधान उपयुक्त ठरेल,” असे वॉशिंग्टनमधील NMV कन्सल्टिंगमधील जपान तज्ज्ञ आणि माजी अमेरिकन राजनयिक केविन माहेर म्हणाले.

ताकाईची यांनी संरक्षण खर्च सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) 2% पर्यंत वाढवण्याची योजना जलदगतीने पुढे नेणार असल्याचे सांगितले असले तरी, ट्रम्प यांनी मागणी केलेल्या कोणत्याही पुढील वाढीसाठी जपानला बांधिलकी देणे त्यांना कठीण जाऊ शकते, कारण संसदेत त्यांच्या सत्ताधारी युतीकडे बहुमत नाही.

बुधवारी, ट्रम्प ग्योंगजू येथे रवाना होतील, जिथे सर्वप्रथम ते दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्यासोबत चर्चा करतील. तथापि, ली यांच्या सल्लागार ओह ह्यून-जू यांनी सांगितले की, “ते दीर्घकाळापासून अपेक्षित असलेला व्यापार करार अंतिम करण्याची शक्यता कमी आहे.”

वॉशिंग्टन आणि बीजिंगने एकमेकांच्या निर्यातीवर टॅरिफ वाढवल्यानंतर, तसेच महत्वाची खनिजे  आणि तंत्रज्ञान असलेल्या व्यापाराला थांबवण्याची धमकी दिल्यानंतर, गुरुवारी शी जिनपिंग यांच्यासोबत ही बैठक होणार आहे.

ट्रम्प पुन्हा सत्तेत येण्यापूर्वी, अस्तित्वात असलेल्या व्यापाराच्या अटी पुनर्संचयित करण्याची अपेक्षा दोन्ही देशांनी नाही. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प चीनला भेट देणार आहेत आणि त्या भेटीच्या तयारीसाठी दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चर्चांमध्ये, मतभेद व्यवस्थापित करण्यावर आणि किरकोळ सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleChina’ Covets Tawang For Its Strategic Location
Next articleडिसप्युटेड III: चीनचा संपूर्ण अरुणाचल प्रदेशावर दावा, मात्र तवांगवर नजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here