व्हेनेझुएलाच्या ड्रग्जवाहू जहाजावरील दुसऱ्या हल्ल्याची, ट्रम्प यांच्याकडून पुष्टी

0
ट्रम्प
15 सप्टेंबर 2025 रोजी, द व्हाईट हाऊसच्या X अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील दोन स्क्रीनवरील प्रतिमा दिसत आहेत, ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या लष्कराने अमेरिकेकडे येणाऱ्या व्हेनेझुएलाच्या ड्रग कार्टेल जहाजावर हल्ला केला होता, अलिकडच्या आठवड्यात संशयित ड्रग्ज जहाजावर केलेला हा दुसरा हल्ला आहे. सौजन्य: व्हाईट हाऊस/हँडआउट द्वारे REUTERS.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतरित्या जाहीर केले की, ‘अमेरिकेच्या लष्कराने व्हेनेझुएलाच्या कथित ड्रग्ज कार्टेल जहाजावर हल्ला केला आहे.’ गेल्या काही आठवड्यांमधील हा दुसरा स्ट्राईक असून, हे संशयित जहाज अमेरिकेच्या दिशेने येत होते.

“या हल्ल्यात 3 लोक ठार झाले असून, आंतरराष्ट्रीय समुद्रात हा स्ट्राईक करण्यात आला,” असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, जहाजामध्ये ड्रग्ज असल्याच्या त्यांच्या दाव्याला खरा ठरवणारा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही.

‘हिंसक ड्रग्ज तस्करी करणारे कार्टेल्स’

ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “सोमवारी सकाळी माझ्या आदेशानुसार, अमेरिकेच्या लष्करी दलांनी साउथकॉम (SOUTHCOM) क्षेत्रातील, एका अत्यंत हिंसक ड्रग्ज तस्करी करणारी कार्टेल्स आणि नार्कोटेररिस्ट्स यांच्याविरुद्ध दुसरा हल्ला केला.”

ट्रम्प पुढे म्हणाले की, “हे अत्यंत हिंसक ड्रग्ज तस्करी करणारी कार्टेल्स अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि महत्त्वाच्या अमेरिकन हितांसाठी धोकादायक आहेत.” युएस सदर्न कमांड (SOUTHCOM) हे लष्कराचे एक लढाऊ कमांड आहे, ज्यामध्ये दक्षिण आणि मध्य अमेरिका तसेच कॅरिबियनमधील 31 देशांचा समावेश आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये, जवळपास 30-सेकंदांचा एक व्हिडिओ देखील होता, ज्याच्या वर ‘Unclassified’ (वर्गीकृत नाही) असे लिहिलेले होते. व्हिडिओमध्ये एक जहाज समुद्रात स्फोट होऊन जळताना दिसत आहे.

‘आमच्याकडे पुरावा आहे’

त्यानंतर ट्रम्प म्हणाले की, “आमच्याकडे पुरावा आहे. तुम्ही समुद्रात सर्वत्र विखुरलेल्या सामानाकडे पाहा, त्यामध्ये कोकेन आणि फेंटानिलच्या मोठ्या बॅग्ज दिसतील.”

रॉयटर्सने AI डिटेक्शन टूलच्या मदतीने या व्हिडिओची तपासणी केली, पण व्हिडिओ अंशतः अस्पष्ट असल्यामुळे कोणत्याही ठोस निर्णयावर येणे त्यांना कठीण गेले.

मात्र, याची सखोल तपासणी अजूनही सुरू आहे आणि अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर रॉयटर्स या फुटेजचा आढावा घेत राहील.

यावर व्हेनेझुएलाच्या संचार मंत्रालयाने तात्काळ कोणत्याही प्रतिक्रीया दिलेली नाही.

जहाजावरील हा दुसरा हल्ला, कॅरिबियनमधील अमेरिकेच्या मोठ्या लष्करी बळाच्या तैनातीदरम्यान झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने 10 स्टील्थ फायटर्सना या मोहिमेत सामील होण्याचे आदेश दिल्यानंतर, शनिवारी 5 अमेरिकन F-35 विमाने पोर्तो रिकोमध्ये उतरताना दिसली.

या भागात किमान 7 अमेरिकन युद्धनौका आणि एक अणु-शक्तीवर चालणारी पाणबुडी देखील आहे.

सातत्यपूर्ण मोहीम?

सोमवारी, पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “ड्रग्ज तस्कर जर जमिनीवरून आले, तर तेव्हागी आम्ही त्यांना त्याचप्रकारे थांबवू, जसे आम्ही जहाजांना अडवले. मात्र याची शक्यता फार कमी आहे.”

या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पोर्तो रिकोच्या किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकेवरील खलाशी आणि मरीन सैनिकांना सांगितले की, “त्यांना प्रशिक्षणासाठी नव्हे, तर महत्त्वाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या पहिल्या फेरीसाठी पाठवण्यात आले आहे.”

सोमवारी, हेगसेथ यांनी X वरील एका पोस्टमध्ये- ड्रग्ज तस्करांविरुद्ध अमेरिकेच्या लष्करी मोहिमेची व्याप्ती वाढवण्याचे संकेत दिले: “आम्ही त्यांचा मागोवा घेऊ, त्यांना मारू आणि आमच्या निवडलेल्या वेळी आणि ठिकाणी आमच्या संपूर्ण गोलार्धातील त्यांची जाळे नष्ट करू,” असे त्यांनी नमूद केले.

ट्रम्प यांनी संरक्षण विभागाचे नाव बदलून, ‘युद्ध विभाग’ (Department of War) ठेवण्याचे आदेश दिले आहेत, ज्यासाठी काँग्रेसच्या कारवाईची आवश्यकता असेल. नवीन नाव हेगसेथ यांच्यावरही लागू होईल आणि त्यांचे पदही बदलून ‘युद्ध सचिव’ (Secretary of War) असे होईल.

आक्रमक कृत्य

ट्रम्प यांच्या पोस्टच्या काही तास आधी, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो म्हणाले की, “त्यांच्या देशात आणि अमेरिकेत नुकत्याच घडलेल्या घटना अमेरिकेचे ‘आक्रमण’ आहे आणि दोन्ही सरकारांमधील संवाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला आहे.”

2 सप्टेंबरच्या पहिल्या हल्ल्याबाबत अमेरिकेच्या खासदारांनी कारवाईचे कारण विचारले असूनही, ट्रम्प प्रशासनाने फारशी माहिती दिली नाही. त्यांनी आरोप केला होता की, त्या जहाजावरील लोक व्हेनेझुएलाच्या ‘ट्रेन दे अरागुआ’ (Tren de Aragua) टोळीचे सदस्य होते आणि त्यातील 11 लोक ठार झाले.

पेंटागॉनने सार्वजनिकपणे हे सांगितले नाही की, त्या बोटीवर कोणत्या प्रकारचे ड्रग्ज होते किंवा किती प्रमाणात होते, किंवा हल्ल्यासाठी कोणत्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला गेला.

आपल्या नावाचा खुलासा न करण्याच्या अटीवर, अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, “2 सप्टेंबर रोजी हल्ला झालेली बोट मागे फिरत असल्याचे दिसत होते, ज्यामुळे काही कायदेशीर तज्ञांनी या हल्ल्याच्या वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.”

पहिल्या हल्ल्याच्यावेळी ट्रम्प यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात समुद्रात एक स्पीडबोट स्फोट होताना दिसत होती. नंतर, एका व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्याने असा दावा केला की, हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) तयार केला आहे.

रॉयटर्सच्या त्या व्हिज्युअल घटकांच्या तपासणीमध्ये, हेराफेरी झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

व्हेनेझुएला सरकारने, ज्यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी हजारो सैनिक तैनात केल्याचे म्हटले आहे, असे सांगितले की: “पहिल्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांपैकी कोणीही ‘ट्रेन दे अरागुआ’ टोळीचा नव्हता.”

मादुरो यांनी वारंवार आरोप केला आहे की अमेरिका त्यांना सत्तेतून हटवू इच्छित आहे.

असामान्य पाऊल

गेल्या महिन्यात, अमेरिकेने मादुरो यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्याला मिळणारे बक्षीस दुप्पट करून ते 50 दशलक्ष डॉलर केले, त्यांच्यावर ड्रग्ज तस्करी आणि गुन्हेगारी गटांशी संबंध असल्याचा आरोप ठेवला.

संशयित ड्रग्जच्या जहाजावर हल्ला करून ते जप्त न करता किंवा चालक दलाला अटक न करणे, हे अत्यंत असामान्य आहे.

राज्यघटनेनुसार, युद्ध घोषित करण्याचा अधिकार काँग्रेसला आहे, परंतु राष्ट्राध्यक्ष हे सशस्त्र दलांचे सरसेनापती (commander-in-chief) आहेत आणि दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसच्या परवानगीशिवाय परदेशात लष्करी हल्ले केले आहेत.

कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅटिक सेनेटर ॲडम शिफ यांनी सोमवारी संध्याकाळी सांगितले की, “ते एक ठराव तयार करत आहेत, ज्यामुळे ‘वॉर पॉवर्स ॲक्ट’ (War Powers Act) अंतर्गत मतदान होईल. या मतदानाने अमेरिकेच्या सशस्त्र दलांना काँग्रेसने अधिकृत करेपर्यंत, गैर-राज्य संस्थांविरुद्ध शत्रुत्व पत्करण्यास त्यांना सक्त मनाई केली जाईल.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनेपाळमधील जेन झीचे लक्ष आता नवीन अंतरिम नेत्यांच्या निवडीकडे
Next articleजपान: सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करण्यास कोइझुमी आणि हयाशीही इच्छुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here