
“माझ्या आदेशावरून अमेरिकेचे हवाई दल जगातील पहिल्या सहाव्या पिढीतील लढाऊ विमानासह पुढे जात आहे, जगातील कोणतीही गोष्ट त्याच्या अगदी जवळ जाणारी नाही आणि ते एफ-47 म्हणून ओळखले जाईल,” असे ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि हवाई दलाचे प्रमुख जनरल डेव्हिड ऑल्विन यांच्यासमवेत जाहीर केले.
“अमेरिकेच्या काही आघाडीच्या एरोस्पेस कंपन्यांमधील चुरशीच्या स्पर्धेनंतर, हवाई दल बोईंगला नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स प्लॅटफॉर्मचे कंत्राट देणार आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
गेल्या वर्षी नॉर्थ्रॉप ग्रुमॅन बाहेर पडल्यानंतर एनजीएडी कराराचा एकमेव प्रतिस्पर्धी असलेल्या लॉकहीड मार्टिनला बोईंगने धक्का दिला.
“आम्ही बऱ्याच गोष्टींची ऑर्डर दिली आहे. आम्ही तुम्हाला किंमत सांगू शकत नाही,” असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले.
अमेरिकन कंपनीने लॉकहीड मार्टिन एलएमटीएनला या करारासाठी हरवल्यानंतर बोईंगचे समभाग 5 टक्क्यांनी वाढले. तर लॉकहीडचे समभाग जवळपास 7 टक्क्यांनी घसरले.
परदेशी विक्री हा एक पर्याय असू शकतो असे म्हणत ट्रम्प पुढे म्हणाले, “आमचे सहयोगी सातत्याने फोन करत आहेत. “त्यांनाही ते विकत घ्यायचे आहेत.”
बोईंगसाठी, हा विजय आपल्या व्यावसायिक आणि संरक्षण अशा दोन्ही बाजूंनी संघर्ष करणाऱ्या कंपनीसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे दर्शवितो. सेंट लुईस, मिसूरी येथील त्यांच्या लढाऊ विमान उत्पादन व्यवसायाला ही मोठी चालना आहे.
नौदलाचे पुढील पिढीचे वाहक-आधारित स्टील्थ लढाऊ विमान तयार करण्याच्या स्पर्धेतून बाद केल्रानंतर आणि एफ-35 लढाऊ विमानाच्या अद्ययावतीकरणास विलंब होत असल्यामुळे पेंटागॉनकडून वाढणाऱ्या असंतोषाच्या दरम्यान, लॉकहीडसाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे.
तीन स्त्रोतांनुसार, अलीकडच्या आठवड्यात, ट्रम्प यांनी एफ-35 वर चर्चा करण्यासाठी लॉकहीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम टायक्लेट यांची भेट घेतली.
अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास करार 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा आहे. बोईंगच्या विजयाचा अर्थ असा आहे की ते जेट लढाऊ विमान बनवेल आणि अनेक दशकांसाठी करण्यात आलेल्या या करारामुळे शेकडो अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर्स बोईंगला मिळतील.
बोईंगच्या संरक्षण व्यवसायाचे नेतृत्व करणारे स्टीव्ह पार्कर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेच्या हवाई दलासाठी सहाव्या पिढीची लढाऊ क्षमतेवर काम करणे, तयार करणे आणि वितरित करण्याचे महत्त्व आम्ही जाणतो. या मोहिमेच्या तयारीसाठी, आम्ही आमच्या संरक्षण व्यवसायाच्या इतिहासातील सर्वात लक्षणीय गुंतवणूक केली आहे.”
विमानाच्या रचनेबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. अर्थात त्यात चटकन दिसून न येणारे प्रगत सेन्सर्स आणि अत्याधुनिक इंजिनांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
हवाई दलाचे प्रमुख जनरल डेव्हिड ऑल्विन म्हणाले, “एफ-22 च्या तुलनेत एफ-47 ची किंमत कमी असेल आणि भविष्यातील धोक्यांशी अधिक जुळवून घेण्याजोगी असेल-आणि आमच्या साठ्यात एफ-47 अधिक असतील.”
चीन आणि रशियासारख्या विरोधकांचा सामना करण्यासाठी सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या भोवती केंद्रित असलेल्या ‘प्रणालींचे कुटुंब’ म्हणून एनजीएडीची कल्पना करण्यात आली होती.
ऑल्विन यांनी सांगितले की एफ-47 मध्ये लक्षणीयरीत्या लांब पल्ल्याची, अधिक प्रगत गुप्तता असेल आणि एफ-22 पेक्षा अधिक सहजपणे समर्थित केले जाईल.
मोठा विजय
बोईंगच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 737 मॅक्स जेट विमानांचे उत्पादन पूर्ण गतीने परत मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या व्यावसायिक व्यवहारांना संघर्ष करावा लागला आहे, तर हवेतच इंधन भरण्याचे टँकर, ड्रोन आणि प्रशिक्षण विमानांसाठी कमी कामगिरी करणाऱ्या करारांमुळे त्याच्या संरक्षण कार्याचे महत्त्व कमी झाले आहे.
टी. डी. कोवेन येथील विश्लेषक रोमन श्वीझर म्हणाले, “खर्चात वाढ, वेळापत्रकात विलंब आणि संरक्षण विभागाच्या इतर कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करणाऱ्या कंपनीसाठी हा विजय म्हणजे एक मोठी चालना आहे.”
अलिकडच्या वर्षांत के. सी.-46 मिड-एअर रिफ्युअलिंग टँकर प्रोग्राममधील खर्चाने 7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, तर दोन एअर फोर्स वन विमानांच्या अद्ययावतीकरणाच्या आणखी एका निश्चित किंमतीच्या करारामुळे टॉप-5 अमेरिकन संरक्षण कंत्राटदाराचे 2 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
प्रवासी विमाने बनवणाऱ्या बोईंगच्या युनिटला जानेवारी 2024 मध्ये नवीन अलास्का एअरलाइन्स 737 मॅक्स 9 मधील चार प्रमुख बोल्ट गहाळ झाल्याने ऐन उड्डाणात निर्माण झालेल्या हवाई आणीबाणीबरोबरच इतरही अनेक संकटांमुळे तीव्र छाननीला सामोरे जावे लागले आहे. जानेवारीमध्ये, बोईंगने त्याच्या प्रमुख युनिटमधील समस्यांमुळे, तसेच त्याच्या बहुतेक विमानांचे उत्पादन बंद करणाऱ्या संपामुळे झालेल्या परिणामांमुळे, 11.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा वार्षिक तोटा सहन केला. जो 2020 नंतरचा सर्वात मोठा तोटा म्हणून नोंदवला गेला.
“या निर्णयामुळे निराश होऊनही आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्पर्धात्मक तोडगा काढला आहे,” असे लॉकहीडने एका निवेदनात म्हटले आहे. “आम्ही अमेरिकी हवाई दलाशी पुढील चर्चेची प्रतीक्षा करू.”
लॉकहीड अजूनही बोईंगला सरकारने दिलेल्या कराराचा निषेध करू शकत असताना, ट्रम्प यांनी एकामोठ्या पत्रकार परिषदेत या कराराची घोषणा केली ही वस्तुस्थिती मेरीलँड स्थित संरक्षण कंपनी बेथेस्डाकडून कराराच्या विरोधात युक्तिवाद सार्वजनिकपणे प्रसारित करण्याची शक्यता कमी करू शकते.
बोईंगला मिळालेल्या या कराराचे डेमोक्रॅटिक सेनेटर मार्क केली यांनी अभिनंदन केले परंतु त्यांनी इशारा दिलाः “या आकाराच्या आणि गुंतागुंतीच्या कार्यक्रमासाठी तो मागे पडत नाही किंवा खर्चात वाढ होत नाही याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक त्यावर देखरेख करणे आवश्यक आहे.”
तर दुसरीकडे अब्जाधीश आणि राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार एलोन मस्क यांनी चालक दलातील उच्च दर्जाच्या लढाऊ विमानांच्या परिणामकारकतेबद्दल शंका व्यक्त केली आहे आणि स्वस्त ड्रोन हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)