26/11, 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी- तहव्वूर राणाने, आपली प्रत्यर्पणाविरोधातील याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र ही याचिका फेटाळण्यासाठी अमेरिकेने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाने, अमेरिकच्या सर्वोच्च न्यायालयात दिलेली याचिका फेटाळण्याची शिफारस, अमेरिकन सरकारने केली आहे. तहव्वूर राणाने, भारतात प्रत्यर्पण करण्याची मंजुरी देणाऱ्या ‘लोअर कोर्टच्या’ निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अहवालांनुसार, सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ प्रेलोगर यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून राणा याची याचिका फेटाळली जावी, अशी विनंती केली आहे.
आरोपी तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडिअन नागरिक आहे. त्याने भारतात प्रत्यर्पित (हस्तांतरित) होण्यापासून वाचण्यासाठी, लोअर कोर्टच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयापुढे केलेली याचिका ही त्याची भारतात प्रत्यर्पित होण्यापासून वाचण्याची अंतिम कायदेशीर संधी आहे.
आरोपीच्या याचिकेमध्ये नक्की काय आहे?
26/11, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून, अमेरिकेच्या लोअर कोर्टने, राणा याच्यावर खटला चालवला आणि निकालाअंती त्याला निर्दोष ठरवले, असा दावा राणाने केला आहे. त्याने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या याचिकेत म्हटले आहे, की “निर्दोष सिद्ध होऊनही भारत देश, त्याला समान न्यायालयीन कारवाईसाठी प्रत्यर्पित करण्याची मागणी करत आहे.” याच मागणीचा विरोध करण्यासाठी त्याने ही याचिका दाखल केली आहे.
मात्र ही याचिका फेटळण्याची शिफारस करणाऱ्या सॉलिसिटर जनरल- एलिझाबेथ प्रेलोगर, यांचे म्हणणे आहे, की ‘भारताने केलेले आरोप पूर्णत: वेगळे असून, राणा याच्यावर भारताने ‘फर्जी व्यवहाराचे’ आरोप भारताने लावले आहेत. राणाने भारतात इमिग्रेशन लॉ सेंटर उघडण्याचा बनाव रचत, त्यासंबंधींची रिझर्व बँकेकडे फर्जी माहिती सादर केली होती. दरम्यान, भारताला आशा होती की राणा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच भारतात येऊ शकतो. मात्र आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत, राणाच्या प्रत्यर्पण प्रक्रियेत अधिक विलंब होऊ शकतो.
राणाचे हल्ल्याशी असलेले संबंध
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यामध्ये मदत केल्याचा मुख्य आरोप राणा याच्यावर करण्यात आला होता. परंतु US कोर्टाने राणाला याप्रकरणी खटल्याअंती निर्दोष ठरवले होते. मात्र नंतर ‘लष्कर-ए-तोयबा’ या कुविख्यात दहशतवादी संघटनेला भौतिक समर्थन दिल्याबद्दल आणि डेन्मार्कमधील दहशतवादी कटात मदत केल्याबद्दल राणाला दोषी ठरवण्यात आले होते.
दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख व्यक्तींपैकी एक, डेव्हिड कोलमन हेडली याने राणाविरुद्ध साक्ष देत, राणा हा पाकिस्तानातील दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे हेडलीने सांगितले होते.
याशिवाय पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) शी देखील संबंध असल्याचा आरोप राणावर झाला. पाकिस्तानी लष्कराचे वर्चस्व असलेल्या एजन्सीमध्ये भरती, प्रशिक्षण यामध्ये सक्रीय सहभाग आणि भारतात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्याचा आरोपही त्याच्यावर केला गेला.
दरम्यान अहवालात म्हटल्याप्रमाणे, भारतीय तपास एजन्सी आणि कायदेशीर तज्ञांनी, ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील त्यांच्या समकक्षांची भेट घेतली. यावेळी राणाला भारतात आणण्याबाबत आणि त्याच्याशी संबंधित पुढील कारवाईबाबतचा आढावा घेतला गेला.