ब्रिटनमधील 130हून अधिक खासदारांनी एका पत्राद्वारे इस्रायलला केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याची सरकारला विनंती केली आहे. परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून यांना पाठवलेल्या पत्रात कॅनडासारख्या ज्या इतर देशांनी तेल अवीवला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवली आहे त्यांच्या कृतीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
लेबर पक्षाच्या खासदार जराह सुलताना यांनी या पत्रासाठी पुढाकार घेतला असून 107 खासदार आणि 27 सहकाऱ्यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
इस्रायली सरकारने शस्त्रसंधीची शक्यता आधीच फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर, इस्रायलला होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी ब्रिटीश सरकारवरील दबाव अधिकच वाढत आहे.
पत्रात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की ब्रिटनकडून इस्रायलला होणाऱ्या शस्त्रास्त्र पुरवठ्यामागे असणारा “नेहमीचा व्यवसाय” “पूर्णपणे अमान्य” आहे. ब्रिटनने तयार केलेल्या सुट्या भागांच्या मदतीने बनवलेल्या F-16 या लढाऊ विमानातून गाझामधील ब्रिटिश डॉक्टरांवर बॉम्बहल्ले झाले असावेत, असे या पत्रात म्हटले आहे.
यापूर्वीही ब्रिटिश सरकारकडून इस्रायलला शस्त्रास्त्रांची विक्री स्थगित केल्याची उदाहरणे असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
“इस्रायली सैन्याने केलेला हिंसाचार खूपच जास्त प्राणघातक आहे, मात्र त्याबद्दल कारवाई करण्यात ब्रिटन सरकार अपयशी ठरले आहे,” असेही पत्रात म्हटले आहे.
याशिवाय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावामुळे अमेरिका – इस्रायलमधील दरी आणखी रुंदावली आहे. गाझामधील सर्व ओलिसांची सुटका तसेच युद्धबंदीची मागणी करणाऱ्या ठरावावर मतदान करण्यापासून अमेरिका तटस्थ राहिला.
प्रत्युत्तरादाखल, नेतान्याहू यांनी इस्रायली अधिकाऱ्यांचा वॉशिंग्टनचा नियोजित दौरा रद्द केला, ज्यामध्ये रफाहमधील जमिनीवरील हल्ल्यासाठी पर्याय प्रस्तावित करण्यासाठी तयार असलेल्या अमेरिकेबरोबर चर्चा होणे अपेक्षित होते.
या निर्णयामुळे इस्रायली माध्यमांनी टीका केली की नेतान्याहू त्यांच्या सत्ताधारी आघाडीतील कट्टर नेत्यांना शांत करण्यासाठी इस्रायलच्या सर्वात महत्त्वाच्या युतीवर दबाव आणत आहेत
“अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी अमेरिकेबरोबरच्या इस्रायलच्या संबंधांचा त्याग करण्यास ते तयार आहेत. त्यांनी हे संबंध पूर्णपणे गमावले आहेत,” असे इस्रायली वृत्तपत्र मारीव्हमधील प्रमुख स्तंभलेखक असलेल्या बेन कॅस्पिट यांनी लिहिले आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत इस्रायलने 32हजारहून अधिक पॅलेस्टिनींची हत्या केली आहे, ज्यापैकी सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुले आहेत . संयुक्त राष्ट्रांच्या मते, तेथील 23 लाख लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.
पिनाकी चक्रवर्ती
एपीकडून मिळालेल्या इनपुट्सह