Friday, February 27, 2026
Solar
MQ-9B
Home Bharat Shakti Marathi Russia Ceasefire: रशियाच्या तीन दिवसीय युद्धबंदीमुळे युक्रेनला दिलासा

Russia Ceasefire: रशियाच्या तीन दिवसीय युद्धबंदीमुळे युक्रेनला दिलासा

0

रशियाने घोषित केलेल्या तीन दिवसीय युद्धविरामाला (Ceasefire) गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली असून, यामुळे सलग अनेक रात्रींच्या जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर युक्रेनमधील प्रमुख शहरांना काही काळासाठी दिलासा मिळाला आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, “क्रेमलिनने घोषित केलेल्या युद्धविरामाच्या प्रारंभानंतर रशियन लढाऊ विमानांनी उत्तरेकडील सुमी प्रदेशावर दोनदा टार्गेटेड बॉम्ब टाकले.”

हा युद्धविराम, दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीच्या पराभवाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करण्यात आला असून, मॉस्को वेळेनुसार काल मध्यरात्रीपासून तो लागू झाला.

या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, बीजिंगचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर नेत्यांचे मॉस्कोमध्ये स्वागत करत आहेत. 9 मे रोजी, मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर लष्करी संचलनाचे पुनरावलोकन करणार आहेत.

युक्रेनने युद्धविरामाला ‘चालबाजी’ म्हणत फेटाळले

युक्रेनने रशियाच्या युद्धविरामाचे पालन करण्यास नकार दिला आहे. पुतिन यांनी युद्ध संपवायचे असल्याचे खोटे चित्र निर्माण करण्यासाठी ही ‘चालबाजी’ केली आहे, असा युक्रेनचा आरोप आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाने युक्रेनवर संपूर्ण आक्रमण केल्याने युद्धाला सुरुवात झाली होती. पुतिन मात्र शांततेबाबत कटिबद्ध असल्याचे म्हणत आहेत.

या आठवड्यात युक्रेनने मॉस्कोवर सलग ड्रोन हल्ले केले, ज्यामुळे राजधानीतील विमानतळ बंद करावे लागले आणि विमानांची वाहतूक थांबवावी लागली.

युक्रेनच्या हवाई दलाच्या माहितीनुसार, दोन मार्गदर्शित बॉम्ब टाकल्याव्यतिरिक्त, गुरुवारी सकाळी रशियन लांब पल्ल्याचे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ले झाल्याची कोणतीही नोंद नव्हती.

स्थानिक वेळेनुसार पहाटे 3:45 (00:45 GMT) पर्यंत, युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर शांत होते, मात्र 24 तासांपूर्वी तेथे रशियन हल्ल्यांच्या स्फोटांनी आणि युक्रेनी हवाई संरक्षणाच्या गोळीबाराने ते पूर्णत: हादरले.

रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमधील आघाडीवरची ही लढाई थांबली आहे की नाही, हे लगेच स्पष्ट झाले नाही. मात्र पूर्व युक्रेनमधील आघाडीजवळच्या एका माध्यमकर्मीने गुरुवारी पहाटे सांगितले की, ‘त्याला लढाईचा कोणताही आवाज ऐकू आला नाही.’

युक्रेनचा 30 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितले की, ‘रशियासोबतच्या युद्धामध्ये 30 दिवसांचा युद्धविराम पाळण्याच्या त्यांच्या देशाच्या प्रस्तावावर ते ठाम आहेत.’

“हा प्रस्ताव आम्ही मागे घेतलेला नाही. या प्रस्तावामुळे कदाचित राजनैतिक प्रयत्नांना संधी मिळू शकेल,” असे त्यांनी रात्रीच्या भाषणात सांगितले.

‘रशियाने मात्र या प्रस्तावावर कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही, त्याऐवजी नव्या हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली,’ असे झेलेन्स्की यांनी सांगितले.

“यावरुन या युद्धाचा मुख्य स्रोत कोण आहे हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.

झेलेन्स्की यांनी हेही कबूल केले की, “द्वितीय महायुद्धाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियन शहरांवर, विशेषतः मॉस्कोवर ड्रोन हल्ले वाढले आहेत.”

मॉस्कोचे महापौर सर्जी सोब्यानिन, यांनी टेलिग्राम अ‍ॅपवर पाच तासांमध्ये केलेल्या विविध पोस्टमध्ये सांगितले की, “राजधानीकडे येणारे 14 ड्रोन नष्ट करण्यात आले. हे सर्व युद्धविराम लागू होण्यापूर्वी झाले.”

अमेरिकेने मार्च महिन्यात 30 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता आणि युक्रेनने त्याला मान्यता दिली होती. मात्र, रशियाने असे म्हटले की, युद्धविराम लागू करण्याआधी त्याचे पालन आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणारे यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध लवकर संपवण्याचा दबाव आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हे सर्वात मोठे युद्ध आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी, अमेरिकेचे प्रतिनिधी कीथ केलॉग यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “पुतिन युद्धविराम अडवत आहेत.”

“यातील खरा अडथळा म्हणजे कीव आहे, जो करारांचे उल्लंघन करत आहे आणि दीर्घकालीन युद्धविरामाच्या अटींवर गांभीर्याने चर्चा करायला तयार नाही,” असे झाखारोव्हा म्हणाल्या.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअथेन्सच्या प्रदर्शनात कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचा स्टॉल
Next articleराष्ट्रीय सुरक्षा: मोदी-डोवाल या जोडीच्या यशाचे नेमके गुपित काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here