बुधवारी रशिया आणि युक्रेनने, एकमेकांच्या राजधानी शहरांवर रात्रीच्या वेळेस हवाई हल्ले केले. या हल्ल्यांदरम्यान युक्रेनच्या कीव शहरात दोन जणांचा मृत्यू झाला, तर मॉस्कोच्या दिशेने गेलेल्या अनेक ड्रोन्सचा नाश करण्यात आला.
कीवमधील तीन जिल्ह्यांमध्ये पाडण्यात आलेले ड्रोन्स, इमारतींवर आणि अपार्टमेंटवर कोसळल्याने तिथे भीषण आग लागली. यामध्ये कीवच्या गजबजलेल्या शेवचेंकिवस्की जिल्ह्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी टेलिग्रामवर दिली.
कीवच्या महापौर विताली क्लित्शको यांनी सांगितले की, “हवाई हल्ल्याच्या काही तास आधीच रशियाने मिसाइल हल्ला केला होता. त्या पाठोपाठ झालेल्या ड्रोन हल्ल्यात सात जण जखमी झाले, यामध्ये चार लहान मुलांचाही समावेश आहे.”
कीवच्या दिनिप्रोव्हस्की जिल्ह्यात पाच लोक जखमी झाल्याची माहिती, कीवच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमूर त्काचेंको यांनी दिली.
मॉस्कोमधील महत्त्वाची विमानतळे रात्री बराच वेळ बंद होती, कारण महापौर सेर्गेई सोब्यानिन यांच्या म्हणण्यानुसार, “मंगळवारी रात्री १० वाजल्यानंतर रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी किमान १४ युक्रेनियन ड्रोनचा नाश केला, ज्यात सुदैवाने कोणतीही हानी झाल्याची नोंद नाही.”
नेत्यांची महत्वपूर्ण बैठक
युक्रेनने सलग तिसऱ्या रात्री मॉस्कोवर ड्रोन हल्ला केला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा रशियन राजधानी मोठ्या हॉलिडेची आणि ९ मे रोजी, दुसऱ्या महायुद्धातील सोव्हिएत युनियनच्या विजयाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या परेडची तयारी करत आहे.
रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, हे या परेडमध्ये अनेक देशांच्या नेत्यांचे स्वागत करणार असून, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचाही यात समावेश असेल. यात पार्श्वभूमीवर पुतिन यांनी, ८ ते १० मे दरम्यान युद्धविरामाचे आवाहन केले आहे, जे युद्ध रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर चालू केले होते.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी, हा युद्धविराम निरर्थक असल्याचे म्हटले आणि अमेरिकेच्या मार्चमध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार, किमान ३० दिवसांसाठी बिनशर्त युद्धविराम लागून करण्याचा प्रस्ताव मांडला.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या हल्ल्याबाबत रशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रण संस्थेने (रोसावियात्सिया) सांगितले की, “हवाई सुरक्षेच्या कारणास्तव सलग तिसऱ्या रात्री, मॉस्कोमधील चारही विमानतळांवर काही तासांसाठी उड्डाणे थांबवण्यात आली तसेच काही प्रादेशिक शहरांतील विमानतळेही बंद ठेवण्यात आली.”
रोसावियात्सियाच्या माहितीनुसार, मॉस्कोमधील शेरेमेत्येवो, व्हनुकोवो आणि डोमोदेदोवो या विमानतळांवर, २०२४ मध्ये एकत्रितपणे ७.६ कोटी प्रवासी हाताळले गेले आहेत. याचा अर्थ दररोज सरासरी २ लाख प्रवाशांना हातळण्यात आले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)