‘युएन मिलिटरी जेंडर ॲडवोकेट ऑफ द इयर’ सन्मानाने होणार गौरव
दि. २९ मे: संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या पथकाचे नेतृत्त्व करणाऱ्या मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठेचा ‘युएन मिलिटरी जेंडर ॲडवोकेट ऑफ द इयर’ हा सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अन्तोनिओ गुतेर्रेस यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात उद्या (३०मे) आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीदूतदिनी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. काँगो या यादवीने ग्रस्त देशात त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. मेजर सेन या हा प्रतिष्ठेचा सन्माना प्राप्त होणाऱ्या दुसऱ्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत. या पूर्वी २०१९ मध्ये दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मेजर सुमन गवानी यांना हा सन्मान मिळाला होता.
यादवीने ग्रस्त असलेल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या पथकात मेजर सेन या मार्च-२०२३ ते एप्रिल-२०२४ दरम्यान कार्यरत होत्या. त्यांनी या काळात ‘इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियन’चे प्लाटून कमांडर म्हणून काम पहिले. या काळात काँगोमधील यादवीग्रस्त पश्चिम भागात हिंसक संघर्षात अडकलेल्या महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षित सुटकेसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी त्यांनी त्वरेने कारवाई करीत या सर्वांची सुटका केली होती. त्यांच्या पथकात महिला आणि पुरुष अशा दोन्ही सैनिकांचा समावेश होता. अशा संयुक्त पथकाचे नेतृत्त्व करताना त्यांनी दाखविलेले नेतृत्त्व गुण आणि निर्णयक्षमता या मुळे त्यांना या कामगिरीत यश मिळाले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल मेजर सेन यांना गौरविण्यात येणार आहे. ‘मेजर सेन या एक खऱ्या नेत्या आणि आदर्श आहेत. त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्राचा उद्देश स्पष्ट करणारे आहे,’ असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अन्तोनिओ गुतेर्रेस यांनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशच्या असणाऱ्या मेजर सेन २०१६ मध्ये लष्करात दाखल झाल्या होत्या. त्यांनी जैव अभियांत्रिकीमधील पदवी घेतली आहे. मुंबई आयआयटीमध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याबद्दल मेजर सेन यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान म्हणजे शांतीसेनेतील सर्व शांतीदुतानी केलेल्या सेवेची आणि कष्टांची पावती आहे; म्हणून हा सन्मान माझ्यासाठी खूप विशेष आहे,’ अशी प्रतिक्रिया मेजर सेन यांनी दिली.
संयुक्त राष्ट्राच्या महिला, शांतता आणि सुरक्षा या विषयावर मंजूर केलेल्या (१३२५) ठरावानुसार शांतीसेनेत काम करताना महिलांची सुरक्षा आणि शांततेसाठी विशेष योगदान देणाऱ्या शांतीदुताला हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती.
विनय चाटी
(वृत्तसंस्था)