भारत अमेरिकेदरम्यान संयुक्त लष्करी सराव

0
टायगर ट्रायम्फ-२०२४ या भारत आणि अमेरिकी सैन्यदलांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय लष्करी सरावाचे छायाचित्र. छायाचित्र: भारतीय नौदलाचे संकेतस्थळ

टायगर ट्रायम्फ: भारतीय लष्कर, अमेरिकी नौदल कमांडो  व नॅशनल गार्ड्स सहभागी

दि. २४ मार्च: संयुक्त द्विपक्षीय लष्करी सहकार्याचा भाग म्हणून भारत आणि अमेरिकेदरम्यान टायगर ट्रायम्फ-२०२४  हा  द्विपक्षीय लष्करी सराव सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या लष्करी सरावात भारतीय लष्कर, अमेरिकी मरीन कमांडो व अमेरिकी लष्कराच्या नॅशनल गार्ड्स चा समावेश आहे. या सरावादरम्यान मानवीय सहायता व आपत्कालीन मदतीबद्दलची प्रात्याक्षिके व सराव करण्यात आला, अशी माहिती लष्कराने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) या ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर’ दिली आहे.

टायगर ट्रायम्फ-२०२४  हा भारत आणि अमेरिकी सैन्यदलांच्या दरम्यान होणारा द्विपक्षीय लष्करी सराव आहे. या लष्करी सरावात तिन्ही सैन्यदले सहभागी होत असतात. या सरावाची सुरुवात १९ मार्च रोजी विशाखापटनम येथे ‘आयएनएस जलाश्व’ या नौदलाच्या जहाजावर करण्यात आली. या सरावामुळे दोन्ही देशांमध्ये सामरिक भागीदारी वाढीस लागेल. या सरावादरम्यान लष्करी कारवाईप्रसंगी करावयाच्या विविध प्रक्रियेबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. त्याचबरोबर मानवीय सहाय्यता व आपत्तीकालीन मदत प्रक्रियेबाबतही उभय देशांनी माहितीचे आदानप्रदान केले. या सरावाचा  किनारपट्टीवरील टप्पा १८ ते २५ मार्चदरम्यान होत आहे. या टप्प्यात प्रत्यक्ष समुद्री कारवाई पूर्वी करावयाच्या तयारीबाबत  विषयतज्ञांनी मार्गदर्शन केले व याबाबत चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कारवायांचे  नियोजन प्रत्यक्ष कार्यवाही याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. उभय देशांच्या लष्करादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व कवायतींचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सहभागी देशाच्या लष्करात परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागली असे, संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या सरावाचा सागरी टप्पा २६  ते ३१ मार्चदरम्यान होणार असून, या कालावधीत दोन्ही देशांचे संघ संयुक्त निर्देश आणि नियंत्रण कक्ष व संयुक्त वैद्यकीय मदत कक्षही स्थापन करतील व त्या माध्यमातून मदत व बचावकार्य प्रात्यक्षिक राबविले जाईल. या सरावात भारतीय नौदलाच्या विविध तुकड्या व जहाजे सहभागी झाली आहेत. त्यात ‘लँडिंग शिप टॅंक,’ ‘लँडिंग क्राफ्ट,’ ‘हेलिकॉप्टर,’ क्षेपणास्त्र नौका, लांब पल्ल्याची नौदल टेहळणी विमाने आदींचा समावेश आहे. भारतीय लष्कराच्या पायदळाची एक बटालियन व यांत्रिक तुकडी या सरावात सहभागी झाली आहे. तर, हवाईदलाचे ‘मिडीयम लिफ्ट एअरक्राफ्ट,’ वाहतुकीची हेलिकॉप्टर व ‘रॅपिड ॲक्शन मेडिकल टीम,’ त्याचबरोबर तिन्ही दलाची ‘स्पेशल फॉर्सेस’ही या सरावात सहभागी आहेत. तर, अमेरिकेच्यावतीने अमेरिकी नौदलाची जहाजे, हेलिकॉप्टर, विनाशिका, सागरी टेहेळणी नौका या सरावात सहभागी आहेत.

 

विनय चाटी

स्त्रोत: वृत्तसंस्था


Spread the love
Previous articleIndian Navy Chief Warns of Volatility in Indian Ocean Region Amid Rising Attacks
Next articleAssam Rifles Remains Significant, With Expanded Role On China Border, Besides Traditional Duties

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here