राजनाथसिंह यांची माहिती: २३-२४ च्या आर्थिक वर्षात २१ हजार ८३ कोटींची निर्यात
दि. ०२ एप्रिल: नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या निर्यातीत विक्रमी वाढ झाली असून, निर्यातीने प्रथमच २१ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारताकडून यावर्षी २१हजार ८३ कोटींची संरक्षण उत्पादनाची निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे. मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनांचे हे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीला चालना मिळावी उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने विविध पावले उचलली होती, याचा परिणाम या वाढीत दिसून येत आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खासगी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनीही या आर्थिक वर्षांत उत्तम कामगिरी केल्याचे सिद्ध झाले आहे,’ असेही राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी व ते अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार काही उपाययोजना केल्या होत्या त्यामुळेच ही असाधारण वाढ दिसून येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
निर्यातीत वाढ
संरक्षण साहित्याच्या निर्यातीत वाढ व्हावी या उद्देशाने सरकारने अनेक उपाय केले होते. या क्षेत्राला तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यावरही भर देण्यात आला होता. त्यामुळे खासगी व सरकारी कंपन्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचे परिणाम या निर्यात वाढीत दिसून येत आहेत. खासगी आणि सरकारी क्षेत्रातील सुमरे ५० कंपन्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे निर्यातीत ही वाढ नोंदविण्यात आली आहे. सुमारे शंभर कंपन्यांकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र, १५५ मिमी तोफा यांच्यासह अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्यात इतर देशांना केली जात आहे. या कंपन्यांनी नावोन्मेश, संशोधन व विकास, उत्तम गुणवत्ता आणि कार्यक्षमता यांच्या एकत्रिकरणातून हे यश मिळविले आहे. भारताची ही निर्यात ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून जगभरातील विविध देशांना संरक्षण उत्पादनाची निर्यात करण्यात आली आहे. इटली, मालदीव, रशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात (युएई), पोलंड, फिलिपिन्स, सौदी अरेबिया, इजिप्त, इस्त्राईल, स्पेन व चिली या देशांना भारताने संरक्षण उत्पादने निर्यात केली आहेत. या जागतिक स्तरावरील निर्यातीमुळे भारताच्या संरक्षण उत्पादनाला जागतिक स्तरावर असलेली मागणी व जगभरातील विविध देशांच्या संरक्षण विषयक गरजा भागविण्याची भारताची क्षमता सिद्ध होते.
भारताने केलेल्या संरक्षण साहित्याच्या निर्यातीत वैविध्य दिसून येते. यात वैयक्तिक सुरक्षा साधने, किनारपट्टीवर गस्ती घालण्यासाठी उपयुक्त वाहने, अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर, किनारपट्टीची टेहेळणी करण्यासाठी उपयुक्त यंत्रणा अशा उच्च तंत्रज्ञानाने निर्मित उत्पादनांचा यात समावेश आहे.
रविशंकर